Wednesday, February 4, 2026
spot_img

दादा कोंडके

दादा कोंडके हे मराठी चित्रपटसृष्टीला आणि महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्न होते. स्वप्न अशासाठी की, त्यांनी फार काळाच्या पुढचे विषय मांडले होते. अत्यंत मिश्कीलपणे आणि व्यंगात्मक पद्धतीने त्यांनी आपल्या चित्रपटांतून फटकारे मारलेले होते. दादा कोंडके हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणारे कलाकार होते. त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत शिवसैनिक म्हणून काम केले, पण चित्रपटातूनही राजकीय फटकारे मारणे सोडले नव्हते. त्यांच्या सगळ्याच चित्रपटातून तत्कालीन परिस्थितीवर भाष्य केले जात होते.

‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ या चित्रपटांमधून तर त्यांनी काँग्रेसवर तुफान फटकेबाजी केलेली होती. कारण शिवसेनेचा नंबर एकचा विरोधक काँग्रेस होता. दादा कोंडके यांचे विनोदाचे टायमिंग चांगले होते. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्यातून काम केल्याने त्यांची राजकीय निरीक्षण शक्ती आणि तुफान असे ऐनवेळचे फटकारे मारणे सर्वांनी पाहिले होते. हेच दादा आपल्याला मराठी चित्रपटातून दिसले पाहिजेत, ही प्रेक्षकांची अपेक्षा त्यांनी आपल्या चित्रपटातून पूर्ण केलेली होती.

‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’मध्ये मेहुणीबाई म्हणून कराटे खेळणारी पद्मा चव्हाण गावात आलेली असते. या मेहुणीबाईचा तडाखा दादांना पण खावा लागतो. त्यामुळे दादांना मारहाण करणाºया बाईला गावातून बाहेर काढा असे सांगत काही महिला दादांची आये रत्नमालाकडे येतात. तेव्हाचा संवाद अतिशय मिश्कील आहे. रत्नमाला म्हणते, कुणाला हुसकावून लावायचं आहे? सगळ्या गावातल्या बायका म्हणतात, त्या मेहुणीबाईला. त्यावर रत्नमाला म्हणते, इतक्या साध्या कामाला मला बोलावता व्हंय? अगं दिल्ली हालवायची असेल, तिथली बाई हुसकावून लावायची असेल तर मला सांगा, गल्लीतल्या बाईला तुम्हीच बाहेर काढा.

हा डायलॉग आल्यावर चित्रपटगृह अक्षरश: दणाणून हासायचे. हा टोला अर्थातच इंदिरा गांधींना आहे हे प्रेक्षकांना सहज समजायचे. काँग्रेसवर टीका करण्याची संधी दादांनी सोडलीच नाही. ‘ज्याला आय नाय त्याला काय नाय’ असे म्हणून ज्याच्यावर आयची कृपा आहे तो राजकारणात मोठा होतो, हा टोला ते सहज पोहोचवायचे. कारण काँग्रेसच्या राजकारणात जनतेने निवडून देण्याच्या नेतृत्वाला काहीच किंमत नसायची. ज्याच्यावर इंदिरा गांधींची कृपा आहे त्यालाच संधी मिळायची नाही. त्यावेळी काँग्रेसचे नाव आय काँग्रेस म्हणून होते. त्यामुळे आयचे ऐकले तर सगळं काही मिळते. ज्याला आय नाय त्याला काय नाही असे म्हटल्यावर चित्रपटगृहात शिट्ट्या वाजायच्या.

‘आली अंगावर’ या चित्रपटात ‘आडला नारायण धरी गाढवाचं पाय हो…’ हे एक गीत आहे. या गीतात ‘पुरुषाच्या जागेवर बसली ती बाय हो…’ अशी एक ओळ आहे. ही ओळ चित्रीत करताना इंदिरा गांधींसारखी बॉबकटची हेअरस्टाइल असलेली बाई पाठमोरी खुर्चीत बसलेली दाखवली आहे आणि हातात छडी घेऊन तिच्या समोर डोक्यावर गांधी टोपी असलेल्या माणसाला उठाबश्या काढताना दाखवले आहे. इंदिरा गांधी यशवंतरावांना कशा उठाबश्या काढायला लावतात हे त्यातून दादांनी दाखवले होते. याचे कारण त्या काळात काँग्रेसमधून १९७७ च्या पराभवातून बाहेर पडलेले यशवंतराव चव्हाण पुन्हा स्वगृही परतण्यासाठी इंदिरा गांधींकडे आले होते. त्यांना खूप वेळ इंदिरा गांधींनी कुंपणावरच ठेवल्याचे त्यावेळी खूप गाजले होते. ही नस पकडून दादांनी ‘आडला नारायण धरी गाढवाचे पाय हो…’ या गाण्यात त्यावर कटाक्ष टाकला होता.

पोलिसांची घरे हा नेहमी चर्चेत राहणारा विषय. आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनीही पोलिसांठी लवकरच १० हजार घरे बांधणार हे पाचगणीत जाहीर केले होते. त्यानंतर प्रत्येक गृहमंत्र्याने अशा घोषणा केल्या होत्या. अलीकडेच पाटणमध्ये गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनीही पोलिसांच्या घरांबाबत भाष्य केले होते, पण गेली ५० वर्षं हा प्रश्न रेंगाळलेलाच आहे. पांडू हवालदारमध्ये दादांनी पोलिसांची होणारी ससेहोलपट दाखवली होती. चित्रपटाच्या शेवटी दादांनी ‘पांडू हवालदार’ने चांगली कामगिरी केली म्हणून सरकार त्यांना बक्षीस देणार, असे मंत्री जाहीर करतात असा सीन आहे. यामध्ये पांडू हवालदार सांगतो की, मला काही नको पण इतक्या मोठ्या पोलीस कॉलनीत फक्त दोनच संडास आहेत. आम्हाला बक्षीस म्हणून चार-पाच संडास बांधून द्या, असे सांगतो. लोक खळखळून हसतात या डायलॉगला. पण त्यामागे जे पोलीस अहोरात्र आपले रक्षण करतात त्यांना किती अडचणींना सामोरे जावे लागते ही भीषणता त्यांनी मांडलेली होती.

‘राम राम गंगाराम’मध्ये काळा पैसा कसा बाथरूममध्ये, सीलिंगमध्ये लपवला जातो आणि तो कसा राजकीय नेत्यांपर्यंत जात असतो, यावर कटाक्ष टाकलेला होता. दादांनी आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत मराठी चित्रपटसृष्टीला अनमोल असा ठेवा दिला. सर्व सुपरहिट चित्रपट देताना त्यांनी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली होती हे विशेष, पण त्यांचे चित्रपट हे काळाच्या पुढचे होते. दादा कोंडके हा विषय एका लेखात पूर्ण होणे शक्य नसल्याने, दादांच्या विविध दृष्टिकोन आणि बाजू आपण आगामी लेखात पाहणार आहोत.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी