Saturday, January 31, 2026
spot_img

मालिकांमधील सासवा

अस्सं माहेर सुरेख बाई खायाला मिळतं

अस्स सासर द्वाड बाई कोंडुनी मारीत, असे एक भोंडल्यातील लोकगीत होते. सासुरवास हा मुलींना कोणत्याही काळात सहन करावाच लागतो. त्यामुळे चार चार तास संध्याकाळी विविध वाहिन्यांसमोर बसायचं म्हणजे कोणती सासू जास्त छान छळते आणि कोणती सून जास्त सोशिक आहे हे पाहण्यात वेळ घालवायचा, पण या मालिकांमधील सासवा जेव्हा सासुरवास किंवा छळ करतात तेव्हा खूप ते विनोदी वाटते किंवा काही मालिकांमध्ये सासवा इतक्या आपल्या सुनेवर प्रेम करतात की ते पाहूनही हसू येते.

या सासवा-सुनांच्या कुरघोड्यांच्या मालिका कधी सुरू झाल्या, कशा सुरू झाल्या आणि त्याशिवाय दुसरे काही कथानक मिळतच नाही का, असा प्रश्न पडतो. काहीतरी वेगळे करायला जाणारे निर्माते पुन्हा तसलाच आचरटपणा करतात. म्हणजे ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत जान्हवीला पाच पाच सासवा दाखवल्या आहेत, तर आता ‘माझा होशील ना’मध्ये तेच कथानक पाच सासवांच्या जागी चार सासरे घेतले आहेत. प्रत्येकाची मनं जिंकत जिंकत नवºयाचे मन जिंकायचे हाच प्लॉट. यापलीकडे काहीच नाही.

ती रमाबाई पेशवेंच्या जीवनावर ‘स्वामिनी’ नावाची मालिका होती, ती तर अत्यंत दिव्य होती. त्या रमाबाईला छळण्यासाठी ती चुलत सासू आनंदीबाई काय काय खटाटोपी करते हे पाहणे हास्यास्पद होते. बागा काय जाळते, विंचू काय चावून घेते, स्वयंपाक काय बिघडवते. हे पाहिल्यावर हसू आणि संताप यायचा. राज्यकर्ते असलेल्या पेशव्यांच्या बायका पाचशे पाचशे माणसांचा स्वयंपाक करणाºया स्वैपाकिणी होत्या का? वड्यांचा आळू कुठला आणि खाजरा आळू कुठला यावरून रमेला छळण्याचे दाखवलेले प्रकार हे अतर्क्य होते. इतिहासाला कल्पनेची जोड देण्यास हरकत नाही, पण ती अळू आणि खाज यात का अडकली गेली? माधवराव पेशवे आणि रमाबाई यांचे रुसणे, अबोला, भांडण यापलीकडे पेशवे काहीच करत नव्हते का? पेशव्यांचे राजकारण हे फक्त सासवा आणि सुनांची भांडणे याबाबत दाखवण्याचा आचरटपणा केला होता.

या उलट झी मराठीवरची ‘अग्गं बाई सासुबाई’मधली सासू म्हणजे अग्गोबाई रडुबाई आहे. निवेदिता जोशी या जाणत्या कलाकाराने असली फालतू भूमिका का करावी हेच समजत नाही. म्हणजे धड सासू म्हणून सासुरवास नाही करता येत. सुनेशी मैत्री करायची आणि मुलाकडून छळून घ्यायचे. फावल्या वेळात नव्या नवºयाशी प्रेमप्रकरण करायचे. नाव सासुबाई आणि सुनेला छळायचे नाही तर रडत बसायचे. सगळा सासुरवास करतो तो बबड्याच फक्त.

‘माझ्या नवºयाची बायको’मध्ये मात्र राधिका भाग्यवान. म्हणजे पतीसुख नसले तरी तिच्या वाट्याला सासूसुख मात्र चांगले आहे. पहिल्या नवºयाची आई आणि दुसºया नवºयाची आई दोघीही तिला चांगल्या सासवा मिळाल्या. नवरा-बायकोचीच इतकी भांडणं आणि कुरघोड्या या मालिकेत आहेत की भारत-पाक सारखे शत्रूदेशही परस्परांवर कुरघोड्या करत नाहीत, धडा शिकवायची भाषा करत नाहीत, इतक्या उचापती हे नवरा-बायको करतात. त्यामुळे सासूला बिचारीला कुठे सासुरवास करायचीच संधी मिळत नाही. मग ती आपली यांना जेवायला, चाय तरी मांडते, राहायलाच याना, असा खानाखजाना चालवते. दुसरी सासू सौमित्रशी लग्न झाल्यावर जी परागंदा झालेली आहे त्याचा काहीच पत्ता नाही, उल्लेख नाही.

त्या मानाने सुनेला छान छळण्याचे काम ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ या काही वर्षांपूर्वी असलेल्या मालिकेत आतिषा नाईकने चांगले केले होते. घरजावयाच्या मदतीने मस्तपैकी छळकाम तिने केले. २१ व्या शतकातील मुकाटपणे छळ सहन करणारी सुशिक्षित मुलगी लोकांना पटो ना पटो पण छळकाम छान केले होते. अर्थात ते विनोदीच वाटत होते.

२०१२ मध्ये ‘मला सासू हवी’ ही एक मालिका गाजली होती. विधूर वडील आणि त्याची लग्न झालेली तीन मुले. यातील धाकटी मीरा आपल्या सासºयाला बायको हवी म्हणून आणि मला सासू हवी म्हणून धडपडत असते. त्यातून ती आनंद अभ्यंकर आणि आसावरी जोशीला लग्न करून घेऊन येते. मग काय घरातील उर्वरित दोन सुना कॅश, अभिलाषा विरुद्ध ही सासू आणि मीरा यांच्या कुरघोड्यांचा सीलसीला सुरू होतो, पण तो नंतर इतका भरकटत जातो की, त्यात आता मला सासू कशाला हवी म्हणायची वेळ येते. डॅशिंग, मॉड आणि स्कूल व्हॅन चालवणारी आसावरी जोशी सासू म्हणून लग्न करून घरात आल्यावर इतकी सोज्ज्वळ कशी होते हा न उलगडलेल्या कथानकाचा भाग आहे. मग ती इतका सुनवास भोगते, कुठल्याशा लांबच्या नात्याच्या सासूकडून पाण्याच्या घागरी भरून झाडाला फेºया मारण्याची शिक्षा काय भोगते. अक्षरश: वीट आणला होता या मालिकेने. काही अपघातात मृत पावल्याने आणि काही कंटाळल्याने कलाकार या मालिकेला सोडून गेले आणि कशीबशी ही मालिका बंद झाली, पण सासूची पुरती वाट लावून संपली.

झी मराठीवर तत्कालीन अल्फा टीव्हीवर २० वर्षांपूर्वी अवंतिका ही एक चांगली मालिका होती. त्यात दाखवलेली सासू दीपा श्रीराम ही जहागीरदारीण बाई भन्नाट होती. सुनेवर कसलीही बंधने लादणारी नव्हती, पण मुलांचे बाहेर लफडं आहे हे म्हटल्यावर त्याला मला आवडलेल्या मुलीशी लग्न कर, हवं तर तू तुझ्या मैत्रिणीशी संबंध ठेवू शकतोस, असे सांगणारी सासू दाखवली आहे. कुठली आई आजकाल बाहेर लफडं कर, सांभाळ, पण बायकोशीही नीट रहा असे सांगेल? प्रेक्षक पाहतायत ना चालतंय सगळं.

‘उंच माझा झोका’ ही पण मालिका रमाबाई रानडे यांच्या जीवनावर गाजलेली मालिका. या मालिकेतही रमेला भरपूर जाच झालेला दाखवला आहे. तिथेही ताई काकू थोड्या छळतात, पण बाकीच्या प्रेमळ सासवा, पण सासू हा प्रत्येक मालिकेतील अविभाज्य घटक. कथानकात जसा हीरो-हिरोईन व्हिलन पाहिजे तशी मालिकांमध्ये सासू ही हवीच असते. कधी प्रेमळ तरी कधी खाष्ट, पण सासूशिवाय मालिका दाखवणे हे मालिकेच्या संकेताला सोडूनच. अगदी हॉररमधील मालिका असली तरी त्यात सासू छान लागतेच. ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये आपण पाहिले सासवा-सुनांचे प्रेमळ संबंध. यात वच्छी आणि शोभा या सासू-सुनेचे नाते खाष्ट आणि प्रेमळ असे दोन्ही प्रकारचे बघायला मिळते, तर सरिता आणि आण्णा नाईकाची बायको आई या दोघींतील नातेही सुंदर दाखवले आहे. या दोन्ही सासवा भाव खाऊन जातात.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी