Wednesday, February 4, 2026
spot_img

नाटककार प्र. ल. मयेकर

१९८० चे दशक आपल्या नव्या दमाच्या आणि वेगळ्या पठडीतील नाटकांनी गाजवले ते आणखी एक नाटककार म्हणजे प्रभाकर लक्ष्मण मयेकर. अनेक वेळा नाटकाचा प्रयोग सादर करण्यापूर्वी श्रेयनामावलीत कधी प्र. ल. मयेकर असे म्हणत, तर कधी संपूर्ण नावानिशी त्यांचा उल्लेख प्रभाकर लक्ष्मण मयेकर असा केला जायचा, पण त्यांनी आपल्या शैलीने दमदार नाटके त्या काळात दिली आणि रंगभूमीच्या आपल्या सांस्कृतिक ठेव्यात आपल्या नावाची नोंद केली.

मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शनचे तुफान गाजलेले अजरामर नाटक म्हणजे ‘पांडगो इलो रे..’ मच्छिंद्र कांबळी, सखाराम भावे यांच्या भूमिका आणि अरुण नलावडे यांचे दिग्दर्शन याने प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचे हे नाटक तुफान गाजले होते. मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषेला एका उंचीवर नेऊन लोकप्रिय केले. त्यातील पहिले नाटक वस्त्रहरण होते, पण त्यापाठोपाठ आलेले तुफान लोकप्रिय झालेले नाटक म्हणजे पांडगो इलो रे.. हे नाटक. या नाटकाचे मालवणीबरोबरच मराठीतही लिखाण केलेले होते. पांडुरंग आला रे आला… पण मालवणीतील गोडवा, त्याची लज्जत प्रेक्षकांना लागल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात किंवा अन्य भागांतही पांडुरंग आलाचे प्रयोग लावले, तर प्रेक्षक आम्हाला मालवणी भाषेत हे नाटक बघायला आवडेल हे सांगून ‘पांडगो इलो रे इलो’चा प्रयोग करायला लावायचे. या नाटकाने प्र. ल. मयेकरांना खूपच प्रसिद्धी मिळाली होती, पण मयेकर एका पठडीत अडकून पडले नाहीत. फक्त विनोदी नाटक करायचे या फंदात न पडता त्यांनी विविध विषयांवर नाटके लिहिली.

मयेकरांचे आणखी एक गाजलेले नाटक म्हणजे ‘रातराणी’. रातराणी हे प्रभाकर लक्ष्मण मयेकरांचे नाटक भद्रकाली या संस्थेने २२ जानेवारी १९८७ रोजी प्रकाशित केले. भक्ती बर्वे, अरुण नलावडे, उदय म्हैसकर आणि सतीश पुळेकर या दमदार कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी या नाटकातून पहायला मिळते. या नाटकात मयेकरांची प्रतिभा खºया अर्थाने खुलताना दिसते. त्यांच्यातील लेखक जाणवतो. कारण एखाद्या पाश्चात्त्य नाटकाच्या कथेवर आधारित किंवा रूपांतरित वाटावे असे हे नाटक होते, पण प्र. ल. मयेकरांचे हे स्वत:चे असे स्वतंत्र नाटक आहे. नाटक पाश्चात्त्य वाटण्याचे कारण यातील पात्रे. अ‍ॅना स्मिथ ही अँग्लो इंडियन पियानोवादक स्त्री आहे. भक्ती बर्वे-इनामदारने ती रंगवली होती. याशिवाय सॅली स्मिथ (अरुण नलावडे) हा व्हायोलिनवादक तिचा नवरा, डॉ. जिमी क्रॉफर्ड म्हणजे उदय म्हैसकर हा अ‍ॅनाचा डॉक्टर मित्र आणि देवेन माहिमकर म्हणजे सतीश पुळेकर हा कॉलेजमध्ये शिकणारा व्हायोलिनवादक, अशी चार-पाच पात्रे. त्यातील पात्रांमुळेच यातला माहौल परकीय वाटावा अशी परिस्थिती. प्र. ल. मयेकरांनी लिहिलेल्या संहितेत प्रचंड ताकद दिसून येते. या नाटकात स्त्री-पुरुष संबंध पियानो-व्हायोलिनच्या नात्याच्या माध्यमातून प्रकट होताना दिसतात. रातराणी जशी उत्तररात्री फुलते तशीच पन्नाशी उलटलेल्या अ‍ॅना स्मिथची गोष्ट आहे ही. या नाटकात अ‍ॅनाची वेगवेगळी रूपे दिसतात. यात ती प्रियकराची प्रेयसी आहे, नवºयाची बायको आहे, मुलाची आई आहे, एका सज्जन माणसाची मैत्रीण आहे, तरुण मुलाची वयस्कर मैत्रीण आहे. अशी विविधरंगी भूमिका, शिवाय अँग्लो इंडियन वाटेल अशी अभिनेत्री म्हणून त्यावेळी एकच नाव समोर आले ते भक्ती बर्वे-इनामदार! तिने मयेकरांच्या या संहितेचे सोने केले होते.

मयेकरांचे आणखी एक गाजलेले नाटक म्हणजे रानभूल. मयेकरांच्या लेखणीला विनय आपटे यांचे दिग्दर्शन आणि संजय मोनेंसारखा कलाकार असल्यावर ते किती छान असणार हे सांगण्याची काही गरज नाही, पण व्यावसायिकदृष्ट्या हे नाटक तुफान यशस्वी झाले होते.

प्र. ल. मयेकर हे खरे तर राज्य नाट्य स्पर्धेने रंगभूमीला दिलेले वरदान म्हणावे लागेल. राज्य नाट्य स्पर्धांतून जसे नवनवे कलाकार मिळतात तसेच चांगले लेखकही मिळतात. असेच मिळालेले हे लखक. एकेकाळी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया राज्य नाट्य स्पर्धेत दोन नाटकांनी मयेकरांना सर्वोत्कृष्ट लेखनाची बक्षिसे मिळवून दिली, हे ते यश. यापैकी अथं मनुस जगन हं आणि मा अस साबरिन या त्या दोन नाटकांतून मयेकरांनी माणुसकीबद्दलचे जे चिंतन रंगभूमीवर आणले होते, ते त्यांनी व्यावसायिक केले नाही. राज्य नाट्य स्पर्धा, एसटीच्या नाट्य स्पर्धा, एमएसएबीच्या नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा यांतून हे नाटक तुफान गाजले. या नाटकांनीच तर व्यावसायिक नाटककार म्हणून क्षमता असलेला मी नाटककार आहे, हे मयेकरांनी दाखवून दिले.

व्यावसायिक रंगभूमीवरचे मोठे नाव म्हणजे चंद्रलेखा ही नाट्य संस्था आणि मोहन वाघ. त्यांनी दीपस्तंभ, रमले मी, गोडीगुलाबी अशी पाठोपाठ नाटके मयेकरांची आणली. चंद्रलेखाचे हुकमी नाटककार म्हणून वसंत कानेटकरांचे नाव जोडले होते. त्या नावाबरोबर एक नाव जोडले गेले ते प्रभाकर लक्ष्मण मयेकर. संवाद व घटना यांतून उभ्या राहणाºया नाट्यपूर्ण प्रसंगांची रेलचेल त्यांच्या व्यावसायिक नाटकांमध्ये असे. त्याआधी, स्पर्धेसाठी केलेल्या नाटकांतही नाट्यमयता होतीच, पण अथं मनुस जगन हं मधली आदिवासींची अगम्य भाषा खुद्द मयेकरांनीच निर्माण केलेली होती! मनुस.. किंवा? साबरिन..सारखी निराळ्याच संस्कृतीतली, परंतु माणूसपण दाखवून देणारी नाटके प्रेक्षकांना रुचणार नाहीत, हे त्यांनी ओळखले होते. त्यामुळे प्रेक्षकांना काय लागते आणि स्पर्धकांना काय लागते याचा विचार करत लिखाण करणारे जाणकार नाटककार होते. स्पर्धेची नाटके ही प्रेक्षकांना आवडोत न आवडोत ती परीक्षकांना आवडणे महत्त्वाचे असते. व्यावसायिक नाटक टाळ्यांसाठी हवे असते. हे नेमके मर्म जाणत लिहिणारे ते नाटककार होते. प्रेक्षकांना विषय ओळखीचा नि आपला वाटेल अशी काळजी घेऊनच लिहू लागले. प्रत्येक व्यक्तिरेखा ठसठशीत असल्याने गुंतवून ठेवी. पुढे, नाटकाची कथा आजच्या काळातली हवी, हा संकेत झुगारून त्यांनी लिहिलेले तक्षकयाग काहीसे हिंदुत्ववादी विचार मांडणारे होते. रमले मी या नाटकात वंदना गुप्ते आणि संजय मोने यांचा मस्त अभिनय बघायला मिळायचा. हे नाटक बºयापैकी ती फुलराणीची आठवण करून देणारे होते, पण प्रेक्षकांना त्या नाटकाने रमवून टाकले होते. वंदना गुप्तेंनी त्यातील भूमिका अफलातून केली होती.

दीपस्तंभ या नाटकाने खºया अर्थाने डॉ. गिरीष ओक यांना ओळख दिली होती. सुजाता कानगो आणि गिरीष ओक यांचे हे नाटक तुफान चालले होते. प्र. ल. मयेकरांच्या या नाटकाने गिरीश ओक यांच्यातील खलनायक बाहेर काढला होता. त्यामुळेच गिरीश ओक यांना अनेक नकारात्मक भूमिका मिळत गेल्या, पण व्यावसायिक रंगभूमीवरील यशस्वी आणि नव्या कलाकारांना नावारूपाला आणणारी दमदार नाटके प्र. ल. मयेकरांनी लिहिली होती आणि ती कायम स्मरणात राहतील अशीच आहेत.

तिसरी घंटा/ प्रफुल्ल फडके

9152448055

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी