Sunday, February 1, 2026
spot_img

सतीश आळेकरांची नाटके

मराठी रंगभूमीच्या इतिहासात जे वेगवेगळ्या नाटकांचे टप्पे आहेत त्यामध्ये सतीश आळेकर यांचे योगदान फार मोलाचे आणि वेगळे आहे. याचे कारण व्यावसायिक, प्रायोगिक आणि हौशी रंगभूमी या तिघांनाही आपलेसे वाटणारे लेखक, नाटककार म्हणून सतीश आळेकर यांचे योगदान मोठे आहे. ते कलाकार, दिग्दर्शक म्हणून महान आहेतच, पण हौशी रंगभूमीवरील कलाकारांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल अशा प्रकारच्या त्यांनी लिहिलेल्या संहिता फार महत्त्वाच्या आहेत.

नाटक, चित्रपट, टीव्ही अशा सर्व तंत्रज्ञानातून त्यांनी आपली हुकूमत दाखवली, पण वेगळेपणही जपले होते. १९७२ साली ते पुणे विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री हा विषय घेऊन एम.एस्‌सी. झाले. तत्पूर्वी फर्ग्युसन कॉलेजमधून ते बी.एस्‌सी. झाले होते. पुणे आणि नाटकाचे नाते हे जगमान्यता देण्यासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळेच प्रेक्षकांना काय हवे, काय नको याकडे लक्ष देत प्रेक्षकांना नेहमीच वेगळे काहीतरी हवे असते हे त्यांनी जाणले होते. त्याची प्रचिती त्यांच्या लेखनातून दिसून येते.

शाळकरी वयात ‘शांतता! कोर्ट चालू आहे’चा प्रयोग आळेकरांनी पाहिला आणि ते भारावून गेले. एका नाट्यप्रयोगाचा इतका खोल परिणाम होऊ शकतो, हे त्यांना नवीनच होते. आळेकरांनी नाटकांबद्दल गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली आणि ते पुढील जीवनात खरोखरच नाटककार झाले. फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील नाटकात बबन प्रभू यांच्या ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या फार्समध्ये दिनू ही भूमिका आळेकरांनी केली होती, पण त्यांना त्यांच्यातील दिग्दर्शक सापडला तो विजय तेंडुलकरांमुळे. सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ‘ओळख’, ‘काळोख’ या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनमध्ये आळेकर दाखल झाले आणि ‘घाशीराम कोतवाल’चे सहदिग्दर्शन त्यांनी केले.

‘घाशीराम कोतवाल’ या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्य व्यवसायातील कारकिर्दीची खºया अर्थाने सुरुवात केली. थिएटर अकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९८0 च्या सुमारास आलेले ‘महानिर्वाण’ हे नाटक अत्यंत सुंदर असे नाटक होते. एकाचवेळी ४५ कलाकार या नाटकात होते. या नाटकात स्वत: आळेकरांनी काम केले होतेच. माणूस आपल्या मृत्यूनंतर काय होते हे तटस्थपणे कसे बघतो हे अत्यंत व्यंगात्मक आणि मार्मिकतेने या नाटकात उभे राहते. कोणताही सेट नाही, काळ्या पडद्यावर पथनाट्याप्रमाणे होणारे सादरीकरण हे या नाटकाचे वैशिष्ट्य होते. यात चंद्रकांत काळे यांचे गायन ही जमेची बाजू होती. एकाचवेळी बरीच पात्र, समूह रंगमंचावर आणणे हे सतीश आळेकरांना आव्हानात्मक वाटले असावे. कदाचित ‘घाशीराम कोतवाल’चा मनावरचा परिणाम कायम असल्यामुळे घाशीराममध्ये ६५ पात्र रंगमंचावर होती, तर त्यानंतर ४५ पात्र ‘महानिर्वाण’मध्ये आली होती.

एकूणच सतीश आळेकरांनी नाट्यलेखन करताना ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची ‘महापूर’, ‘महानिर्वाण’ आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो.

सतीश आळेकर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले. कै. पंडित सत्यदेव दुबे यांच्यासारख्या रंगभूमीवरील महान व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.

आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केले आहे. प्ले-राइट्स डेव्हलपमेंट स्कीम आणि रिजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेंट या प्रकल्पांसाठी त्यांना फोर्ड फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे.

२९ ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे नाटककार सतीश आळेकर या विषयावर तीन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र झाले होते. त्याप्रसंगी सतीश आळेकर यांचा मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले आणि नाटककार दत्ता भगत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. आळेकरांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. अतुल पेठे दिग्दर्शित नाटककार सतीश आळेकर हा माहितीपट दाखवला गेला. हे तेव्हाच घडू शकते की, त्या कलाकारामध्ये अनेक पैलू असतात. ते ज्याला जसे दिसतील त्यावर त्याची चर्चा होते.

सतीश आळेकरांचे १९८९ मध्ये आलेले एक लक्षात राहणारे नाटक म्हणजे ‘दुसरा सामना’. सतीश आळेकरांचे लेखन, विक्रम गोखले, विनय आपटे, इला भाटे अशी स्टारकास्ट असल्यावर नाटक हे उत्तम होणारच, पण या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या चित्रपटाचा आपण सिक्वल काढतो, पण चित्रपटाचा सिक्वल म्हणून नाटक काढणे हा प्रथमच प्रयोग त्यांनी केलेला होता. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीतील ग्रामीण राजकारणावर अनेक चित्रपट झाले, पण ‘सामना’ हा चित्रपट एक वेगळा होता. नीळू फुले, श्रीराम लागू, स्मिता पाटील, मोहन आगाशे असे अनेक दिग्गज असलेला हा चित्रपट तुफान गाजला होता. यातील मारुती कांबळे हे पात्र खूप चर्चेत होते, पण त्याचे पुढे काय? तर ते उत्तर ‘दुसरा सामना’मधून आळेकरांनी दिलेले होते. साखर कारखान्यातील राजकारणाची काळी बाजू चित्रपटातून येते, तर जमेची बाजू नाटकातून येते. शासन-प्रशासन बरोबर असेल तर विकास होतोच. यासाठी आपल्याला पाहिजे तो कलेक्टर आणायचा. मारुती कांबळेच्या मुलाच्या शिक्षणाचा, त्याला मोठा करून कलेक्टर बनवले जाते. त्याचवेळी कारखान्याच्या चेअरमनचा मुलगा किती खंबीर आहे, हुशार आहे, धोरणी आहे यातून दाखवले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकार, कारखानदारी आणि विकास का झाला होता याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे नाटक. विनय आपटेंनी ग्रामीण भागातील चेअरमन पण शिकला सवरला असला तरी आपल्या भाषेचा टोन सांभाळत इंग्रजीवर असलेली कमांड दाखवणे, कारखान्यातील कामगारांना बोनस मिळाल्यावर टू व्हिलर खरेदीला शहरात गेल्यावर कामकाज थांबू नये यासाठी आरटीओलाच कारखान्यावर आणणे आणि कलेक्टरचा योग्य प्रकारे वापर करून घेणे या कल्पना अफलातून. हे दुसरा सामना नाटक खुप काळ चालले असते, तर साखर कारखानदारीच्या अनेक समस्या दूर झाल्या असत्या, पण भविष्यात ग्लोबलायझेशन होऊ शकते, कामं कशी करायची याची चुणूक दाखवणारे हे नाटक सर्वांगसुंदर होते.

सतीश आळेकरांची नाटके सर्वांनी पहावीत. पहायला मिळाली नाहीत तर ती वाचावीत. अगदी जरूर अभ्यास करावा अशी ती नाटके म्हणजे मराठी रंगभूमीचे वैभव आहे.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा

9152448055

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी