Friday, July 11, 2025
spot_img

शन्नांच्या नाटकाचा हक्काचा प्लॅटफॉर्म ‘अभिजात’

मराठी रंगभूमीचे जे काही टप्पे आहेत त्यामध्ये संगीत रंगभूमी, गद्य नाटके, विनोदी नाटके, फार्स असे जे टप्पे आहेत त्याप्रमाणे नाटकांसाठी वाहून घेतलेल्या संस्था हे पण फार मोठे टप्पे आहेत. संगीत नाटके असताना त्या काळात मंडळी असत. किर्लोस्कर मंडळी, खाडीलकर मंडळी, शिलेदार, गंधर्व वगैरे, पण नाटके जसजशी गद्य आणि बॉक्ससेटमधील बंदिस्त अवस्थेत आली तशा काही नाट्यसंस्था या नावारूपाला आल्या. यातील नाट्यसंपदा, अत्रे थिएटर्स, धी गोवा हिंदू असोसिएशन, चंद्रलेखा, प्रतिपदा या नामांकित संस्थांबरोबरच गेल्या पन्नास वर्षांत नावारूपाला आलेली संस्था म्हणजे अभिजात ही एक नाट्यसंस्था.

या संस्थेला नुकतीच ५१ वर्ष पूर्ण झालेली आहेत, पण या संस्थने सत्तर ते २००० पर्यंतची तीन दशके चांगली दर्जेदार नाटके दिली आणि नाट्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता. अभिजातचा नाट्यदौरा असे तेव्हा तो हंगाम हाऊस फुल नाटकांचा असायचा. याचे कारण त्यांची कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांची जंत्रीच फार मोठी नामांकित अशी होती.

निर्माते अनंत काणे यांनी १३ आॅक्टोबर १९६९ रोजी अभिजात या संस्थेची स्थापना केली. अभिजात या संस्थेतर्फे मन पाखरू पाखरू, धुक्यात हरवली वाट, सुरुंग, सूर राहू दे, गुंतता हृदय हे, हसत हसत फसवुनी, मला भेट हवी हो, गहिरे रंग, गुलाम, वर्षाव, रेशीम धागे- यासारख्या दर्जेदार व लोकप्रिय नाटकांची निर्मिती केली. या सर्वच नाटकांचे लेखक शं. ना. नवरे होते, तर दिग्दर्शन नंदकुमार रावते यांनी केले होते. त्याचप्रमाणे सर्वच नाटकांचे नेपथ्य व प्रकाश योजना बाबा पार्सेकर यांची होती आणि पार्श्वसंगीत अरविंद मयेकर यांचे होते.

अभिजातच्या या नाटकांत श्रीकांत मोघे, डॉ. काशिनाथ घाणेकर, आत्माराम भेंडे, बबन प्रभु, कमलाकर सोनटक्के, सतीश दुभाषी, रमेश देव, कमलाकर सारंग, यशवंत दत्त, राजा मयेकर, रवींद्र मंकणी, राजा बापट, शंकर घाणेकर, शशिकांत राजाध्यक्ष, गणेश सोळंकी, अशोक पाटोळे, सुमित राघवन, सुधीर दळवी, भाऊ बिवलकर, नाना पोळ, बाबा परुळेकर, दिनानाथ टाकळकर, शशिकांत महाडिक, प्रभाकर मोने, प्रवीण पाटील, विठ्ठल पणदुरकर, पंढरीनाथ बेर्डे, राजू सावंत, जयवंत बाइंग, छोटू सावंत, वामन शेळकर, कमलाकर टाकळकर, सतीश रणदिवे, गणा प्रधान, सुधीर बावकर, विजय खानविलकर, चंदू डेगवेकर, अनंत मिराशी, तसेच पद्मा चव्हाण, आशा काळे, आशालता, शांता जोग, पुष्पा भोसले, आशू, लता अरुण, संजीवनी बिडकर, नीना कुळकर्णी, रजनी जोशी, सुमन धर्माधिकारी, सुनीती जोशी, शालिनी सावंत, मालती पेंढारकर, भावना, सुहास जोशी यांसारख्या त्यावेळेच्या प्रथितयश व लोकप्रिय कलाकारांनी अभिनय केला होता. अभिजात संस्थेच्या नाटकांचे पश्चिम महाराष्ट्रातील दौरे विशेष गाजले होते. याचे कारण मुंबई-पुण्यातील प्रथितयश नाटके पहायला मिळणे हे तेथील प्रेक्षकांच्या आवडीचे होते. त्यामुळे गणेशोत्सव, साखर कारखान्यांवरील प्रयोग यात या नाटाकांचे दौरे हमखास असायचे. सातारच्या शाहू कलामंदिर, सांगलीचे दीनानाथ आणि विष्णुदास भावे आणि कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात या नाटकांनी कायम हाऊसफुलचा फलक पाहिला होता. किर्लोस्करवाडी, रेठरे, कोरेगांव अशा भागांत ओपन एअरमध्ये झालेल्या प्रयोगांनाही प्रचंड गर्दी असायची. त्यामुळे अभिजातच्या नाटकांचा एक दबदबा होता. एरव्ही पडद्यावर दिसणारे कलाकार रंगमंचावर पाहण्यासाठी प्रेक्षक येत असत.

अभिजात ही खºया अर्थाने अभिजात कलेवर प्रेम करणाºया मंडळींची संस्था होती. त्यामुळे अभिजातचा वर्धापनदिन पण उत्साहाच्या वातावरणात दिमाखदारपणे साजरा होत असे. अभिजात या संस्थेचे व्यवस्थापक म्हणून ज्यांनी दीर्घकाळ रंगभूमीची सेवा केली ते दीपक सावंत या संस्थेबद्दल अगदी भरभरून सांगत असतात. या संस्थेच्या सोनेरी दिवसांबाबत बोलताना ते अत्यंत भावुक होतात आणि समोरच्याला जुन्या काळात घेऊन जातात. त्यांचे डोळे अजूनही त्या कलाकारांमध्ये, त्यांच्या आठवणींमध्ये, तिकीट विंडोवर होणारी गर्दी, तो फुल्याफुल्यांनी भरत चाललेला प्लॅन, तिसरी घंटा, ती कलाकारांची लगबग, त्या धुपाच्या सुवासामध्ये रमून जाते. अभिजातच्या वर्धापनदिनाला शास्त्रीय संगीत क्षेत्रातील बुजुर्ग व मान्यवरांच्या गायनाची मैफल आयोजित केली जात असे. या मैफलीत पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, अजय पोहनकर, छोटा गंधर्व, परवीन सुलताना, प्रभाकर कारेकर, शोभा गुर्टु यांसारख्या बुजुर्ग कलाकारांनी हजेरी लावली होती.

अभिजातच्या एका वर्धापनदिनाला शं. ना. नवरे लिखीत व नंदकुमार रावते दिग्दर्शित दिवसेंदिवस या नाटकाचा प्रयोग सादर केला होता. ५ तास चाललेल्या या नाटकात एकूण १६ प्रवेश होते. आशा काळे व अशोक पाटोळे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकात त्यावेळेच्या ५० लोकप्रिय कलाकारांचा सहभाग होता. या नाटकांचा फक्त एकच प्रयोग झाला.

मराठी नाटकांबरोबर ‘गुलाम’, ‘सो टचनु सोनु’ आणि ‘केवारे मळेला मनना मेळ’ या गुजराती नाटकांची निर्मितीही अभिजाततर्फे करण्यात आली होती. ‘केवारे मळेला मनना मेळ’ या गुजराती नाटकात प्रथमच आशालता यांनी काम केले होते. या नाटकाचे दिग्दर्शन निर्माते अनंत काणे यांनी केले होते. २००१ मध्ये निर्माते अनंत काणे यांचे निधन झाले आणि अभिजात संस्था बंद झाली. तीन दशके अत्यंत यशस्वीपणे संस्था चालवलेल्या अनंत काणे यांच्या मागे ही संस्था बंद झाली असली, तरी त्या संस्थेवर प्रेम करणारे त्या संस्थेतून पुढे आलेले कलाकार, पडद्यामागचे कलाकार, व्यवस्थापक असे अनेकजण अजूनही त्या भावविश्वात श्रद्धेने वावरताना दिसतात. हेच रंगभूमीसाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

प्रफुल्ल फडके/तिसरी घंटा

9152448055

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी