Saturday, July 12, 2025
spot_img

गाढवाचं लग्न

दादू इंदुरीकर हे नाव घेतल्यावर आठवते ते ‘गाढवाचे लग्न’ हे वगनाट्य. महाराष्ट्रात क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल की, ज्याने गाढवाच्या लग्नाचा आनंद घेतला नसेल. ‘गाढवाचं लग्न’ तीन कलाकारांनी अप्रतिम सादर केले. यात पहिला क्रमांक दादू इंदुरीकरांचा लागतो. त्यांना या नाटकाला राष्ट्रपती पदक प्राप्त झाले होते. त्यानंतर शेवटपर्यंत प्रकाश इनामदार यांनी जितके दिवस ‘गाढवाचे लग्न’चे शेकडो प्रयोग केले त्याची जाहीरात राष्ट्रपती पदक विजेते वगनाट्य अशीच केलेली होती. तो काळ टेपरेकॉर्डचा होता. त्यामुळे ‘गाढवाचे लग्न’च्या कॅसेटही विक्रमी खपल्या होत्या, मात्र त्या दादू इंदुरीकरांच्या होत्या. कीर्तनकार इंदुरीकर महाराज जितका हशा घेत नाहीत त्याच्या कितीतरी पटीने दादू इंदुरीकरांनी हशा मिळवला होता. दादू इंदुरीकरांच्या निधनानंतर दीर्घकाळ प्रकाश इनामदार यांनी हे वगनाट्य केले. त्यानंतर काही म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पण दर्जेदार प्रयोग मोहन जोशी यांनी केले, पण गाढवाचं लग्न म्हटलं की, पहिलं नाव येतं ते दादू इंदुरीकर यांचेच.

इंदुरीकर यांचे मूळ नाव गजानन राघु सरोदे. पुणे जिल्ह्यामधील मावळ तालुक्यातील इंदुरी नावाच्या गावात दादू इंदुरीकरांचा जन्म झाला. दादूंचे वडील राघु इंदुरीकर हे भेदिक कवने रचणारे व गाणारे नामांकित तमासगीर होते. त्यामुळे लहानपणीच दादूंचा लोककलेशी परिचय झाला व त्यांच्या मनात लोकनाट्य आणि रंगभूमीविषयी आवड निर्माण झाली. पुढे व्हर्न्याक्युलर फायनल म्हणजेच सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर दादूंनी नोकरी न करता तमासगीर होण्याचा निर्णय घेतला. त्या काळात व्हफा झालेला शिक्षक म्हणून मिरवत असताना दादू इंदुरीकर यांनी तमाशा निवडला ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल. सुरुवातीला प्रसिद्ध तमासगीर बाबुराव पुणेकरांच्या फडबारीत काम करताना दादूंना विनोदाचा सूर सापडला. त्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी गावकºयांच्या मदतीने दादू मारुती इंदुरीकर या नावाने स्वत:चा फड उभा केला. विविध लोकनाट्यांतून कामे करण्यास सुरुवात केली. सहज-साधा मुद्राभिनय, शारीरिक लवचिकता, शब्दांची अचूक फेक, साध्या-साध्या शब्दांतून विनोद निर्माण करण्याची विलक्षण हातोटी, दर प्रयोगाला नवीन नवीन कोट्या करण्याची सवय, हजरजबाबीपणा या गुणांमुळे दादू इंदुरीकर लवकरच कसदार सोंगाड्या म्हणून नावारूपास आले.

त्यांनी गाढवाचं लग्नच नाही, तर हरिश्चंद्र तारामती, मल्हारराव होळकर, मराठशाहीची बोलती पगडी, मिठ्ठाराणी या वगनाट्यांतील आणि काळ्या माणसाची बतावणी, रंगीचा हिसका पाटलाला धसका, काय पाव्हणं बोला मेव्हणं या फार्सांतील त्यांच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या. मराठी दूरदर्शन वाहिनीवरून सर्वप्रथम प्रसारित झालेल्या येड्या बाळ्याचा फार्स या फार्समध्येही इंदुरीकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पण दादू इंदुरीकरांमुळे गाढवाचं लग्न हे वगनाट्य महाराष्ट्रभर गाजले. त्याचे हजारो प्रयोग झाले. गाढवाचं लग्नमधील तुफान विनोदी भूमिकेमुळे दादूंना अमाप लोकप्रियता मिळाली. पु. ल. देशपांडेंनी इंदुरीकरांना महाराष्ट्राचा पॉलमुनी म्हटले, तर शंकर घाणेकरांनी त्यांना वगसम्राट अशी पदवी दिली. गाढवाचं लग्नच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा भाग असलेली तमाशा कला दादूंनी शहरी भागातील पांढरपेशा वर्गामध्ये सुप्रसिद्ध केली, हे फार महत्त्वाचे होते.

दादूंचा पोट धरून हसायला लावणारा विनोद ग्रामीण-शहरी अशा दोन्हीकडच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यामुळे तमाशाला वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली. तमाशा परिषदेकडून सोंगाड्याच्या भूमिकेसाठी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दादूंना मिळाले. १९६९ ते १९७३ या काळात तमाशा परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये त्यांच्या फडबारीला प्रत्येक वर्षी पहिल्या क्रमांकाचा मान मिळाला. राष्ट्रीय संगीत नाट्य अकादमीकडून दिला जाणारा पारंपारिक लोककलेचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. तेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते दादूंचा सन्मान करण्यात आला. पुढे तमाशा परिषदेने दादूंना विनोदमूर्ती हा बहुमान बहाल केला. जनता दादूंना सोंगाड्यादादांचा दादा म्हणून नावाजू लागली.

विशेष म्हणजे दादूंनी लोककलेची जोपासना करताना सामाजिक भानही राखले. गाढवाचं लग्नच्या प्रयोगांतून प्राप्त झालेल्या धनाचा काही भाग त्यांनी मंदिरे, शाळा, अनाथ मुला-मुलींसाठीचे वसतिगृह यांच्या उभारणीसाठी खर्च केला. प्रसिद्ध सिनेअभिनेते दादा कोंडके यांनी सोंगाड्या या चित्रपटासाठी दादूंचे मार्गदर्शन घेतले होते, पण दादूंची देशभरात ओळख झाली ती गाढवाच्या लग्न या वगनाट्यामुळेच.

गाढवाचं लग्न हे हरिभाऊ वडगावकर यांनी लिहिलेले मराठी भाषेतील प्रसिद्ध वगनाट्य आहे, पण त्याच्याशी नाव जोडले गेले ते इंदुरीकरांचेच. या वगनाट्याचे सादरीकरण दादू इंदुरीकर यांनी केले होते, तर वगातील प्रमुख भूमिका राजा शंकरराव शिवणेकर, वसंत अवसरीकर, प्रभाताई शिवणेकर यांनी रंगवल्या होत्या. या वगनाट्यात प्रभाताई शिवणेकर गंगीची भूमिका करायच्या. गाढवाचं लग्नचे प्रयोग महाराष्ट्रात खेडोपाडी झाले होते. या प्रयोगांसाठी दादू इंदुरीकरांना जेवढी वाहवा मिळायची तेवढीच शाबासकी प्रभा शिवणेकर यांना मिळाली.

त्यानंतर इंदुरीकर यांच्या निधनानंतर प्रकाश इनामदार यांनी या वगनाट्याला आणखी उंचीवर नेऊन ठेवले. प्रकाश इनामदार आणि जयमाला काळे यांनी गाढवाचं लग्नमध्ये केलेला सावळ्या कुंभार आणि गंगीला प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली. या गाढवाच्या लग्नामुळेच प्रकाश इनामदार यांचे जयमाला काळे यांच्याशी लग्न झाले आणि तर््ंया जयमाला इनामदार बनल्या, पण प्रकाश इनामदार यांनीही याचे हजारो प्रयोग केले. पण या वगनाट्यामुळे पांढरपेशी सर्वसामान्य माणूस वगनाट्याकडे वळला होता. गाढवाचं लग्न, विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यांना महिला व पुरुष प्रेक्षकांची तोबा गर्दी असायची. प्रेक्षक खो-खो हसतच प्रेक्षागृहातून बाहेर पडायचे हे या वगनाट्यांचे वैशिष्ट्य होते. तमाशा किंवा लोकनाट्य, वगनाट्य म्हटले की, त्यातील विनोद पांचट असतात, पण तीच त्याची खरी मजा असते. प्रत्येकाच्या मनातील दडलेला चावट माणूस बाहेर काढण्याचे काम या वगनाट्यांनी केले, म्हणून त्यांना लोकप्रियता लाभली. त्यामुळेच एखादे घरचे, मित्रपरिवाराचे लग्न अनेकांनी चुकवले असेल, पण गाढवाचे लग्न मात्र कोणी चुकवले नव्हते.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा

9152448055

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी