Saturday, July 12, 2025
spot_img

नटसम्राट एक-नट अनेक

१९७० च्या दशकात ‘नटसम्राट’ हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक रंगभूमीवर आले. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोसिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला होता, पण मराठी रंगभूमीवरच्या अजरामर नाटकात त्या नाटकाचा समावेश झाला. विल्यम शेक्सपियरच्या किंग लियर या शोकांतिकेवरून काढलेली ही मराठीतील शोकांतिका होती, पण ती आजही तितकीच प्रेक्षकांना भावते हे या नाटकाचे बलस्थान आहे. तात्यासाहेब शिरवाडकरांची समृद्ध सिद्धहस्त लेखणी आणि वेगवेगळ्या संचात आलेली या संहितेची नाटके म्हणजे नटसम्राट एक म्हणजे एकमेवाद्वितीय, पण नट अनेक असे वर्णन करावे लागेल.

सर्वात प्रथम या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे आणि अलीकडेच मोहन जोशी यांनी ही भूमिका केली, तर त्यावर आधारित महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात नाना पाटेकर हेही नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर झाले होते.

नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले होते. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले तरी त्या कथानकांना वि. वा. शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.

या नाटकामध्ये अप्पा बेलवलकर यांच्या पत्नीची कावेरी ही भूमिका, ‘शांता जोग’ यांनी अतिशय प्रभावीपणे साकारली होती. कलेसाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या माणसासोबत संसार करताना कराव्या लागणाºया तडजोडी व ताण-तणावाच्या काळात प्रेमाने आणि संयमाने घर सावरणारी एक हळवी व खंबीर स्त्री ‘कावेरी’ या पात्रातून साकारली गेली. नटाची मुले देशोधडीला लागतात अशी त्यावेळी लोकांची समजूत असायची, पण ‘नटसम्राट’ नाटकामध्ये ‘कावेरी’ने मात्र मुलांना शिक्षण व विचारांनी समृद्ध बनवले. खरं तर हे नाटक समजायला, समजून घेण्यास खूप कठीण आहे. ते दिग्दर्शकाला जितके चांगले समजेल, कलाकाराला जेवढे समजेल तेवढे ते नाटक प्रभावी होते. कारण नटसम्राट हे नाटक अभिनयाचा अभ्यास करायला शिकवते व खूप गोष्टी शिकवून जाते. डॉक्टर लागूंनी या भूमिकेचा भरपूर अभ्यास केला होता, म्हणून नटसम्राट म्हटल्यावर डॉक्टर श्रीराम लागू यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेले नाटक म्हणता येईल, पण काही बाबतीत हीच भूमिका दत्ता भट यांनी इतकी सुंदर केली होती की, तो नटसम्राटही ताकदवान होता. चंद्रकांत गोखले यांनीदेखील ही भूमिका पेलली होती. यशवंत दत्त यांनाही या भूमिकेने प्रसिद्धी दिली होती. अर्थात या सर्वांचीच तुलना श्रीराम लागू आणि दत्ता भट या दोघांशी झाली. सतीश दुभाषी हे नट म्हणून खूप मोठे होते. अनेक चांगली नाटके त्यांनी केली, पण नटसम्राट ही भूमिका त्यांना शोभली नव्हती, हे तितकेच खरे. काही नाटके ही ठराविक कलाकारांसाठीच असतात की काय कोणास ठाऊक, पण नटसम्राट म्हणून खºया अर्थाने शोभले ते डॉ. श्रीराम लागू आणि दत्ता भट हे दोघेच. दोघांचीही ही भूमिका करण्याची शैली वेगळी होती, पण त्या दोन्ही भूमिका दमदार झाल्या हे निश्चित. बाकीच्यांनी तर फक्त पाठांतर केल्याप्रमाणे भूमिका केल्या. मधुसूदन कोल्हटकर यांची जीभ थोडी जड असल्यासारखी वाटायची, तर राजा गोसावी यांनी तर या शोकांतिकेचा फार्सच केला. प्रेक्षकांनी अजिबातच स्वीकारले नाही त्यांना. राजा गोसावी हे विनोदाचा बादशहा म्हणून जेवढे लोकप्रियतेच्या शिखरावर होते त्यांनी केलेले फार्स, विनोदी नाटके एकापेक्षा एक सुंदर होती, पण त्यांच्यावर टायमिंगचे विनोद, अ‍ॅडिशन घेण्याची सवय यामुळे नटसम्राटमध्ये ते पूर्णपणे ब्लॉक झाले असे दिसले. शिरवाडकरांची भाषा त्यांना पेलवणारी नव्हती असेच दिसून आले. प्रेक्षक त्यांना हसत होते ही शोकांतिका होती. एका विनोदी नटाची, विनोदाच्या बादशहाची ती शोकांतिका म्हणावी लागेल.

तोच प्रकार काही प्रमाणात अलीकडच्या काळात मोहन जोशी यांच्या बाबतीत झाला. त्यांनी हे नाटक २०१८ मध्ये केले. यात रोहिणी हट्टंगडी यांनी कावेरी केली, पण प्रेक्षकांना मोहन जोशींचा अप्पासाहेब बेलवलकर आवडलाच नाही. पुटपुटल्यासारखे संवाद म्हणत ती भूमिका मोहन जोशींनी कशीबशी केली. कशासाठी केली हा प्रश्नच आहे, पण लांब शब्दबंबाळ नाटक करण्याची, मोठी स्वगतं म्हणायची आपली क्षमता नाही हे मोहन जोशी यांनी दाखवून दिले. नटसम्राट एक नाटक असले तरी त्याचे नट अनेक झाले, पण लक्षात राहिले ते लागू आणि भट हे दोघेच.

विशेष म्हणजे या नाटकाच्या प्रयोगात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका करणाºया नटाला मानसिक थकवा येतो. असे असून २७ आॅगस्ट २०१३ या दिवशी सकाळी पावणेसहा वाजता सुरू झालेले आणि एकापाठोपाठ सलग चाललेले नटसम्राटचे एकाच नट संचातले एकूण आठ प्रयोग २८ आॅगस्टच्या दुपारी दीड वाजता संपले. हे प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात एकूण ३१ तास ४५ मिनिटे चालले होते. हा बहुधा जागतिक विक्रम असावा. तीर्थराज रंगमैत्री आणि दादा कोंडके फाऊंडेशन यांनी हे प्रयोग रंगमंचावर सादर केले होते. गिरीश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते व अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिकाही केली होती. हे काहीतरी गिरीश देशपांडे यांनी वेगळे करून दाखवले होते, पण बाकी कोणी काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला नाही.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी