Monday, February 2, 2026
spot_img

रंगभूमीवरचा अविष्कार ‘तमाशा’

रंगभूमीवर सादर केला जाणारा एक अफलातून लोककलेचा अविष्कार म्हणजे तमाशा. मराठी रंगभूमीचा तो एक अविभाज्य भाग आहे. नाटक आणि तमाशा यात बºयाच वेळा फरक केला जात असला, तरी नाटक आणि तमाशात गुप्त असे नातेही आहे. ते म्हणजे अनेक नाटके तमाशाप्रधान आहेत, तर प्रत्येक तमाशात एक नाट्य असते.

खरंतर तमाशा हा गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक अविष्कार आहे. तमाशा हा शब्द मूळ अरबी आहे. त्याचा अर्थ दृश्य, खेळ वा नाट्यप्रयोग असा आहे. तमाशाचे खेळ (प्रयोग) गावोगाव भरणाºया जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. त्यामुळे प्रयोगाला फारसे नेपथ्य लागत नाही. तमाशात काम करणारी पुरुषपात्रे नेहमीच्याच वेशात असतात, तर स्त्रीपात्रांची वेशभूषा शक्य तितकी आकर्षक व उद्दीपक असते. तमाशातले गायक, वादक, सुरत्ये (सुरत्या= गायनात सूर देऊन साथ करणारा) व नर्तकी सदैव मंचावरच असतात. या मंचाला तमाशाच्या भाषेत बोर्ड म्हटले जाते. गायनाला ढोलकी, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रँगल यांची साथ असते. तमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते.

तमाशा हा एक लोकनाट्याचा प्रकार महाराष्ट्रात परंपरेने प्रचंड लोकप्रिय असून, त्यातली लावणी गायन आणि लावणी नृत्य विशेष लोकप्रिय आहेत. तमाशातले महत्त्वाची वाद्य म्हणजे ढोलकी आणि तुणतुणे.

तमाशाची सुरुवात गणाने होते. गण म्हणजे गणपतीला केलेले आवाहन. तमाशाचा खेळ निर्विघ्न पार पडावा म्हणून तमाशाचा सरदार म्हणजे मालक हे आवाहन करतो, सर्व साथीदार चढ्या आवाजात ध्रुपद आळवतात आणि सुरत्ये ध्रुपदाचा अंतिम सूर झेलून उंचावर नेतात.

गण संपल्यावर काही काळ ढोलकी व कडे यांचे वादन होते. ढोलक्याची लय पुरेशी अंगात भिनल्यावर तमाशातील स्त्रियांचे नृत्य होते आणि मग गौळण. गौळणींचा विषय असतो श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीला. नर्तकी या गोपी होतात आणि त्यांच्यामध्ये वयस्कर असणारी एक मावशी असते. या गोपी मथुरेला दूध, दही, लोणी वगैरे घेऊन जात असतात आणि वाटेत श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी किंवा पेंद्या त्यांना अडवतो. या पेंद्याचे काम करणारा बहुधा सोंगाड्या (हास्य कलाकार) असतो. या वेळेस या दोन पक्षांमध्ये जे विनोदी संवाद होतात ते ऐकून प्रेक्षक खदखदून हसतात. पौराणिक काळाला आधुनिक संदर्भ देऊन केलेला या गौळणी हास्य व शृंगार रसाने ठासून भरलेल्या असतात.

एकेकाळी ग्रामीण भागातील मनोरंजनाचा हुकमी एक्का असलेला तमाशा व त्यातील गण, गौळण, बतावणी आणि फार्स काळाच्या पडद्याआड जाण्यापूर्वी त्यांचे दस्ताऐवजीकरण करण्याचे मोलाचे काम सोपान खुडे यांनी तमाशातील फार्सा हे पुस्तक लिहून केले आहे. तमाशातील फार्साविषयीची त्यांनी दुर्मीळ अशी माहिती जुन्या जाणत्या तमाशा कलावंतांच्या मुलाखती घेऊन मिळवली आहे. या पुस्तकामध्ये फार्साबरोबरच लेखकाने गण, गौळण, रंगबाजी, मुजरा, बतावणी आणि वगाविषयी माहिती देऊन, शाहीर पठ्ठे बापुराव, रामा-नामा लबळेकर, सखाराम कोºहाळकर, दत्तोबा तांबे, तुकाराम खेडकर, जगताप पाटील-पिंपळेकर, काळू-बाळू कोल्हापूरकर, दादू इंदुरीकर, किसन कुसगावकर, दगडोबा कोºहाळकर आणि विठाबाई नारायणगावकर यांच्या अल्प परिचयाबरोबरच त्यांनी त्यांच्या तमाशात सादर केलेल्या बतावणी फार्साचे काही नमुनेही पुस्तकात दिलेले आहेत.

मंचावर जर दोन फडांचे (तमाशा मंडळांचे) तमासगीर एकाच वेळी असतील, तर त्यांच्यांतील सरस-नीरस ठरवण्यासाठी त्यांच्यामध्ये आपापसात सवाल-जवाब होतात. बहुधा पौराणिक कथांवर आधारलेले कूटप्रश्न एकमेकांना काव्यांतून विचारून त्यांची उत्तरे ओळखण्याचा हा कार्यक्रम असतो. मंचावर होणारे शृंगारिक लावण्यांचे सादरीकरण म्हणजेच रंगबाजी. मंचावर एकापेक्षा अधिक फडांचे तमासगीर असतील तर त्या रंगबाजीला संगीतबारी म्हणतात. याबरोबरच गायक विविध प्रकारची लोकगीते सादर करतात.

यानंतर असतो तो वग. वग म्हणजे नाट्यरूपाने सादर केलेली कथा. या कथा पौराणिक, ऐतिहासिक किंवा लोककथा असतात. या कथांमधील संवाद लिखित नसून पात्रांनी ते केवळ स्वत:च्या बुद्धीने म्हणायचे असतात. अधूनमधून समयसूचकतेने शेरे मारणारा सोंगाड्या इथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. सोंगाड्यामुळेच वगाद्वारे सांगितल्या जाणाºया कथावस्तूला चांगली रंगत येते. सोंगाड्या हा उत्कृष्ट नकलाकार असतो. तो हजरजबाबी असावा लागतो. तो प्रेक्षकांची करमणूक तर करतोच पण त्याचबरोबर समोर घडणारे प्रसंग ही खरेखुरे नसून नाटकी आहेत याची जाणीव करून देणे, त्या प्रसंगाची आधुनिक काळाशी सांगड घालणे, सद्य जीवनावर भाष्य करणे, प्रतिष्ठितांचा दंभस्फोट करणे आणि प्रसंगी सादर होत असलेल्या नाटकाचे विडंबन करणे ही कामेही तो करीत असतो. दादा कोंडके यांना उत्तम सोंगाड्या म्हणून महाराष्ट्राने पसंती दिली होती.

मराठी रंगभूमीवर लोकप्रिय तमाशा मंडळे किंवा पार्टी म्हणून ओळख असलेल्या संस्थांमध्ये आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ, दत्ता महाडिक लोकनाट्य तमाशा मंडळ, पांडुरंग मुळे यांच्यासह आविष्कार मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, भिका-भीमा लोकनाट्य तमाशा मंडळ, मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळ, मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ, रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ, शिवराम बोरगावकर यांच्यासह बाबुराव बोरगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ, हरिभाऊ बडे-नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांनी या लोककलेत आपले नाव सतत गाजवले आहे.

– प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा

9152448055\\

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी