Thursday, February 5, 2026
spot_img

याहू…..शम्मी कपूर

राजकपूर, देवानंद आणि दिलीपकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टी व्यापून टाकलेली असताना आपली वेगळी वाट काढून स्वतंत्र प्रतिमा निर्माण करणारा अभिनेता म्हणजे शम्मी कपूर. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेला हा अभिनेता आपल्या वेगळेपणामुळे दीर्घकाळ कार्यरत राहिला. हिरो किंवा नायक म्हणून जेवढी कारकीर्द गजवली तेवढीच चरीत्र अभिनेता म्हणून दीर्घकाळ कामगिरी त्यांनी केली. तरीही शम्मी कपूर म्हटले की त्याचा तो याहू…. असा ओरडणारा अभिनेता समोर दिसतो.  21 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस.
शम्मीचा जन्म मुंबईत झाला तेव्हा त्याचे नामकरण शमशेर राज कपूर असे झाले होते. त्याकाळातील नाटक तसेच सिनेमाचे प्रसिद्ध कलावंत पृथ्वीराज कपूर यांच्या तीन मुलांपैकी शम्मी हे दुसरे अपत्य  राज कपूर आणि शशी कपूर ही त्याची भावंडे. तीनही भावंडांनी आपल्या वडिलांप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत अपार यश संपादन केले. यात शम्मी कपूर हा जंपींग जॅक म्हणून गाजला.
शम्मीने अनेक विनोदी, खेळकर, तसेच रोमांचक प्रेमकथांवर आधारित चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. 1960 च्या दशकात आपल्या आगळ्या नृत्यशैली, तसेच लकबी आणि दिमाखदार व्यक्तिमत्त्वासाठी शम्मी कपूरला बरेच जण भारताचा एल्विस प्रिसली  असे कौतुकाने म्हणत.
खरं तर शम्मीने अभिनयाची सुरूवात गंभीर भूमिकांपासूनच केली. पण प्रेक्षकांनी त्याला त्या काळात एवढे गंभीरपणे घेतले नाही. कारण गंभीर, दु:खी भूमिका करण्याचा ठेका दिलीपकुमारकडे सोपवला होता. त्यामुळेच शम्मीला आपली वेगळी वाट निवडावी लागली. फिल्मिस्तानच्या नासिर हुसेन – दिग्दर्शित तुमसा नही देखा (1957 अमितासोबत) आणि दिल देके देखो ( 1959 आशा पारेखसोबत), ह्या चित्रपटांनंतर शम्मीची एका खेळकर प्लेबॉयची प्रतिमा तयार झाली. त्यानंतर जंगली ( 1961) मुळे ही प्रतिमा वृद्धिंगत होत गेली आणि नंतरचे बहुतेक चित्रपट ह्याच धर्तीवर आधारित होते.
शम्मी कपूर हे आपले पार्श्वगायक म्हणून नेहमी मोहम्मद रफीची निवड करीत. मोहम्मद रफी आणि शम्मी कपूर अतिशय चांगले मित्र होते. आपल्या यशाचे श्रेय मोठ्या प्रमाणात मोहम्मद रफीकडे असल्याचे प्रांजळ मत शम्मी कपूर व्यक्त करत. शम्मीचे बहुतेक चित्रपट हे गाण्यावर विशेषत: रफीच्या गाण्यावर गाजले. पण हे कबूल करण्याचे मोठेपण शम्मी कपूरमध्य होते हे विशेष: विशेषत: जंगली मधील याहू !!! चाहे कोई मुझे जंगली कहे हे सिनेमात शम्मी कपूरच्या धुम-धडाका आणि माकडउड्यांनी तुफान लोकप्रिय झालेले गाणे रफींच्याच आवाजात आहे. मधल्या  काही काळात शम्मीला प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबर दुय्यम दर्जाच्या भूमिका पत्कराव्या लागल्या (उदा. मधुबालासोबत रेलका डिब्बा). तरी  1960 च्या दशकात निर्माते त्याची जोडी मोठ्या नायिका – विशेषत: आशा पारेख, सायरा बानू आणि शर्मिला टागोर बरोबर बनवीत असत. आपल्या सर्व नायिकांपैकी शर्मिला टागोर, राजश्री आणि आशा पारेख बरोबर सहज काम जमायचे असे ते म्हणत. शम्मी कपूर आणि आशा पारेख ची जोडी चार चित्रपटांमध्ये एकत्र दिसली, त्यापैकी तीसरी मंजिल (1966) हा विजय आनंददिग्दर्शित आणि राहुल देव बर्मन यांचे बहारदार संगीत असलेला थरारक रहस्यपट सर्वात जास्त गाजला.
पण तीसरी मंजिलच्या चित्रीकरणादरम्यान गीता बाली या शम्मीच्या पहिल्या पत्नीचे ’देवी’च्या आजारामुळे निधन झाले आणि वैयक्तिक जीवनात शम्मीला आणि त्यांच्या दोन मुलांना एका खरोखरच्या शोकांतिकेचा सामना करावा लागला. त्यानंतर शम्मीचा मुमताझ (ब्रम्हचारी 1968) च्या सहनायिका))हिच्याबरोबर संबंध जुळले, पण तेही फार काळ टिकले नाहीत. पुढे 1969 साली शम्मीने ’नीला’ हिच्याबरोबर दुसरे लग्न केले. त्यांची ’रोमँटिक हीरो’ची कारकिर्द  1970 च्या दशकात शरीराच्या वाढत्या स्थूलपणामुळे संपुष्टात आली.   अंदाज (1971) हा शम्मीचा नायक म्हणून शेवटचा गाजलेला चित्रपट ठरला. ’70 च्या दशकात ते यशस्वी चरित्र-अभिनेता म्हणून काम करू लागले. जंगली (1961) आणि ब्लफ मास्टर (1964) मध्ये ज्या सायरा बानू बरोबर नायकाचे काम केले होते तिच्याच जमीर (1975) मध्ये त्यांनी त्याच सायराच्या वडिलांचे काम पत्करले. शम्मीने मनोरंजन (1974)(इंग्रजी इर्मा ल दूस वर आधारित) आणि बंडलबाज़ (1976) चे दिग्दर्शन केले. ’मनोरंजन’मध्ये स्वतः चरित्र अभिनयही केला. पुढे 1980 आणि 1990 च्या दशकांत त्यांनी चरित्र-कलाकार म्हणून काम सुरू ठेवले आणि विधाता (1982)मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला.  1990 आणि 2000 ह्या दशकांमधल्या कालावधीत हळूहळू त्यांनी चित्रपटांमधले काम कमी केले. 2006 सालचा सँडविच हा त्यांचा अखेरचा प्रदर्शित चित्रपट होय.
शम्मी कपूरचे नाव भारतातील इंटरनेट वापरणार्‍या सुरुवातीच्या व्यक्तींमध्ये गणले जाते. ते इंटरनेट यूझर्स कम्युनिटी ऑफ इंडिया (आययूसीआय) या संस्थेचे संस्थापक-चालक होते आणि एथिकल हॅकर्स असोशिएशन यांसारख्या इंटरनेट संस्थांमध्ये कार्यरत होते.
मूत्रपिंडांच्या विकारामुळे 7 ऑगस्ट, 2011 रोजी शम्मी कपूरला मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि  14 ऑगस्ट ला निधन झाले.
पण आपली कारकीर्द त्यांनी हसरी आणि करमणूकप्रधान ठेवली होती.  1962 – फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारसाठी नामांकन मिळाले होते. 1968 – फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार ब्रम्हचारीसाठी त्याला मिळाला होता. 1982 – फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार विधातासाठी पुरस्कार मिळाला होता. 1995 – फिल्मफेअर लाइफटाइम अचीवमेंट पुरस्काराने गौरवण्यात आले. 2008 लाइफटाइम अचीवमेंट अ‍ॅवॉर्ड – भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी देण्यात आले.
पण साध्या साध्या कामगिरी करणार्‍या अनेकांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले होते, तो मान काही या कलाकाराला मिळाला नाही हे विशेष म्हणावे लागेल. कारण त्याचाही एक खास असा प्रेक्षक होता. सुवर्णकाळाचा साक्षीदार आणि त्यात भरपूर योगदान असलेला तो कलाकार होता. अर्थात पुरस्कारावरून कोणाच्या यशाअपयशाचा आलेख कधीच मोजू नये पण शम्मी हा आनंद देणारा कलाकार होता हे नक्की.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी