Tuesday, February 3, 2026
spot_img

रिटर्न तिकीट!

 

 

तो आणि ती. त्यांना नावाची गरज नाही. अशी असंख्य तो आणि ती वेगवेगळ्या कारणांनी या लोकलचा आधार घेतात. ही जीवनवाहिनी त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी आधार वाटतो. त्यासाठी कधी तरी रिटर्न तिकीट काढणे आवश्यक असते. पुरेसा न मिळणारा वेळ, एकमेकांना देता न येणारा वेळ, मनातील खदखद व्यक्त करण्यासाठी हे रिटर्न तिकीट केवळ घराकडे परत घेऊन जात नाही, तर जीवनात आलेली नकारात्मकता झटकून पुन्हा नव्याने आनंद, संसाराकडे लक्ष देण्याचा संदेशही हे रिटर्न तिकीट देत असते.बोरिवली स्टेशनवर दोघे आले. तो असेल ३५ वर्षांचा आणि ती असेल साधारण ३२ वयाची. लग्न होऊन जेमतेम पाच एक वर्षे झाली असावीत. दोघांचाही नोकरी करणाºयांचा संसार. ती बोरिवली ते अंधेरी रोज अपडाऊन करत असे. तो बोरिवली ते सीएसएमटी जायचा, म्हणजे दादरला किंवा अंधेरीला लोकल चेंज करायला लागायची. दोघांच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या होत्या. त्याला यायला रोज १२ वाजायचे. तिला सकाळी लवकर जायचे असायचे. त्यामुळे संवाद हा होतच नव्हता. विकेंडला घरात काही ना काही कार्यक्रम, येणे-जाणे, शेजार, सोसायटीचे कार्यक्रम यात वेळ निघून जायचा. दोघांत संवादच होत नव्हता. सगळं काही असूनही काही तरी आपल्यात कमी आहे असं दोघांनाही वाटत होतं.ती संध्याकाळी कामावरून आली की, एकटीच जेवून घ्यायची किंवा सासू-सासºयांना वाढून मग त्यांच्याबरोबर बसायची. सासू-सासरे मालिकांमध्ये अडकलेले असायचे. एकटं एकटं वाटायचं. तो येईपर्यंत ती झोपून जायची. प्रत्येकाकडे लॅच की असल्याने रात्री उठून दार उघडायचाही प्रश्न नव्हता. पहाटे उठल्यावर लक्षात यायचं आपल्या शेजारी तो झोपला आहे. खूप दमून आल्यामुळे बहुधा न जेवताच झोपला असावा. त्याच्याकडे कौतुकाने पाहात ती उठायची आणि आपलं आवरून त्याला झोपवून सकाळी कामाला निघायची.तो सकाळी उठायचा, तो घरातील कामवाली फरशी पुसायला आली म्हणून जागा व्हायचा. फरशी पुसण्याअगोदर ती फॅन बंद करायची. मग काही क्षणात गरम व्हायला लागायचे. आपोआप जाग यायची. अंगात शर्ट, बनियनही नाही. समोर कामवाली. मग त्या उकाड्यातच चादर घेऊन ओढून बसणे आणि ती गेल्यावर उठून ब्रश करायला, फ्रेश व्हायला जायचे. फ्रेश होऊन बाहेर येऊन बसायचे आणि आईने दिलेले चहा-पोहे खायचे. तिने जाताना करून ठेवलेला टिफिन घ्यायचा आणि लगेच आॅफिसला जायचे. हे सगळं आयुष्य निरस आणि कंटाळवाणं होऊन गेलं होतं, म्हणूनच आज त्यानं ठरवलं होतं की, दोघांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे.त्याने तिला सांगितले, ‘उद्या एक सीएल टाक, मीही टाकतो आहे.’ ती म्हणाली, ‘इश्य… इयर एंडिंगची कामे आहेत, रविवारी बोलू’, पण त्याने आग्रह केला आणि तिने सीएल टाकली. रात्री तो नेहमीपेक्षा थोडा लवकरच आला. ‘सीएल टाकली आहे हे आई-बाबांना सांगितले नाही ना?’ ती म्हणाली, ‘अगंबाई, मी सांगायचंच विसरले, पण सकाळी सांगेन.’ तो म्हणाला, ‘नको सांगू. तू नेहमीप्रमाणे बाहेर पड, मी तुझ्याबरोबरच बाहेर पडतो. आपण फिरायला जायचंय.’ ती हसली आणि अंगावर पांघरूण ओढून घेतले.सकाळी तोही तिच्याबरोबरच उठला. त्यानेही आवरले. आईने विचारलेच, ‘अरे, आज लवकर उठलास?’ तो म्हणाला, ‘हो आई, मला आज जरा लवकर जायचं आहे. संध्याकाळीही लवकर येईन.’ आईला बरं वाटलं. ती म्हणाली, ‘रोजच अशी ड्युटी मिळते का पाहा ना. दोघांनाही एकदम जाता येईल म्हणजे. वेळेवर झोप होईल.’ तो हसला आणि म्हणाला, ‘आई, तसं नसतं गं. कॉर्पोरेट आॅफिसमध्ये अमेरिकन टायमिंगप्रमाणे असते.’ ‘मग आज अमेरिकेचा सूर्य काय लवकर उगवला का?’ तो हसला आणि बॅग घेऊन बाहेर पडला. ती म्हणाली, ‘अहो थांबा, मी पण येतेय स्टेशनला. रिक्षा करून जाऊ.’अशाप्रकारे दोघे स्टेशनवर उतरले आणि त्याने एटीव्हीएमवरून दोन तिकिटे काढली. रिटन्र् ितिकीट. हसत हसत तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला, ‘पुढची लोकल बोरिवलीतून सुटणारी आहे. दोन नंबरवरून, त्यात बसू.’ ती बघत राहिली. तिने विचारले, ‘कुठे जायचं आहे?’ ‘चर्चगेट.’‘तिथून कुठे जायचे आहे?’‘विरार.’‘काय?’‘हो, इथून चर्चगेट, तिथून चर्चगेट ते विरार. पुन्हा विरार ते चर्चगेट आणि मग पुन्हा चर्चगेट ते बोरिवली असा आपण आज टाइमपास करायचा आहे.’‘इडियट… हा काय प्लॅन आहे का फिरायचा?’‘बघ तर खरी मजा. आपण रोज प्रवास करतो या लोकलमधून, पण आज वेगळ्या अँगलने या लोकलकडे पहा. मग तुला खरा आनंद मिळेल बघ.’ती हसली. जाऊ दे, आज दिवसभर त्याच्यासोबत राहायला मिळणार आहे ना? मग कुठे का जायचे असो, जायचेच. एरव्ही आपल्याला कुठे वेळ मिळतो नाही तरी. दोघं लेकलमध्ये बसली. छानपैकी सीट मिळाली. तशी ती रोज लेडीज डब्यातून जायची. तो नेहमी बसायचा तो डबा हमखास गुज्जूभार्इंचा असायचा. त्यामुळे त्यांचे पत्ते, शेअर मार्केटची चर्चा याने, त्या हू. शू. छे ने तो वैतागायचा, पण आज मुद्दामच फर्स्टक्लासचे रिटर्न तिकीट काढले होते. त्यामुळे सरकून घ्या ही भानगड नव्हती. गाडी सुटली. तसा तिच्याकडे सरकत तो म्हणाला, ‘बोल काय बोलायचे आहे तुला? असा एकांत कुठेही मिळणार नाही बघ.’‘खच्चून भरलेली लोकल आहे ही, एकांत कसला डोंबलाचा?’‘आपण काहीही बोललो ना, तरी इथे कोणाला ऐकायला जायचं नाही.’‘कसं कायं? आपल्याला खाजगी बोलायचं आहे.’‘इथं प्रत्येकाच्या कानात हेडफोन आहे. नजर प्रत्येकाची मोबाइलमध्ये काही तरी पाहण्यात आहे. कोण बघणार आपल्याला?’तिला गंमत वाटली. आता आपण खरंच मोकळेपणानं बोलायचं. लाज वाटली, तर त्याला वाटू देत असंच तिला वाटलं. ती म्हणाली, ‘आई सारख्या विचारतात, उशीर का म्हणून?’‘कामं असतात.’‘बावळट आहेस…’‘आता काय केलं मी?’‘त्यांचं म्हणणं लग्नाला तीन वर्षे झाली… आता चान्स घ्यायला हवा…’आता तो लाजला. तिचं बोलणं कुणी ऐकलं नाही ना, त्याने इकडे-तिकडे पाहिले. तशी ती म्हणाली, ‘काळजी नको. रोबो आहेत सगळे. कोणी ऐकलं नाही. प्रत्येकाच्या कानात हेडफोन आहे.’ तसे दोघेही खळखळून हसले. खरंच चौपाटीवर जाऊन एकांतात वाळूवर बसून गप्पा मारण्यापेक्षा हे लई भारी आहे. तिथं तो गजरेवाला, फुटाणेवाला, चहावाला, नाही तर काही तरी विकणारा येऊन डिस्टर्ब करतो. इथे कोणीच डिस्टर्ब करत नाही. मस्त टाइमपास करायला रिटर्न तिकीट काढून पाच-सहा तासांत अगदी छान मनं मोकळी करता येतील. आता तो बोलला, ‘मलाही वाटतं गं…’ ‘हो…? पण आजकाल पिणंही वाढलं आहे. येऊन कधी झोपतोस कळतही नाही तुला. बाजूला मी आहे याचंही भान नसतं तुला.’‘मित्रांबरोबर बसतो कधी कधी… रोज पित नाही.’‘पण मित्रांबरोबरच बसत राहिलास, तर आणखी उशीर होईल ना?’‘तुझी इच्छा आहे का? आई म्हणते म्हणून नको, तुला हवं असेल तर हरकत नाही.’‘तुला नाही वाटत?’ तिने उलट प्रश्न केल्यावर तो भाऊक झाला. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘मित्रांबरोबर बसल्यावर प्रत्येक जण आपल्या पोरांचं कौतुक, त्रास असं काही बोलतात, तेव्हा वाटतं, आपल्याकडं असं सांगायला काहीच नाही. कुणाच्या अ‍ॅडमिशनचा प्रश्न, कुणाचं दुखणं, कुणी कुठे नंबर मिळवला, ही सगळी कौतुकं ऐकतो तेव्हा वाटतं आपण कधी हा आनंद घ्यायचा? पण घरी येईपर्यंत तू झोपून गेलेली असतेस. तुला डिस्टर्ब करावंसंच वाटत नाही.’‘शुद्धीत असतोस का? मी चांगली जागी असते. नाक दाबून तो वास सहन करते. कपड्यांचीही शुद्ध नसते कधी कधी. तसाच झोपतोस बॅग टाकून.’‘मुद्दाम नाही गं करत…’‘मला कळतंय, तुलाही हवंय, म्हणूनच तर आज सीएल टाकायला सांगितलीस ना?’‘हो, हे कधी तरी ठरवायलाच हवं होतं, पण वेळच मिळत नव्हता. शनिवार, रविवार इतका गडबडीत जातो की, एकांतच मिळत नाही, म्हणून आज मोकळेपणाने बोलण्यासाठी हे रिटर्न तिकीट काढलं. कुठं जायला नको. एकमेकांत डोकं खुपसून बसायचं, तर चौपाटीचा समुद्रकिनारा कशाला हवा? लाटांकडेच पाहायचे नाही, तर मरिन ड्राइव्हवर जाण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा लोकलमध्ये बरं.’खूप वेळ दोघांनी चर्चा केली. मनापासून गप्पा मारल्या. चर्चगेट कधी आलं आणि त्यांनी विरार लोकल कधी पकडली हेच कळलं नाही. आता मनातलं सगळं बोलून झालं होतं. आता सहप्रवाशांकडे पाहून आपलं सुख-दु:ख याची तुलना सुरू झाली.लोकल धावत होती. माणसं चढत होती. उतरत होती. कुठे भांडणं होत होती. अंधेरीला खूप गर्दी झाली. एक प्रेमीयुगूल दरवाजात उभं होतं. ती अगदी बाजूला उभी होती आणि गर्दीचा स्पर्श तिला होऊ नये म्हणून दोन हातांच्या पोकळीत तिला त्याने धरले होते. तो धक्के खात होता. त्याचा धक्का तिला लागत होता, पण दोघं दरवाजातून हलत नव्हती. दोघं एकमेकांत गुंतली होती. हे पाहून तिला खूप हसू आलं. तो म्हणाला, ‘धक्के मारणाºयांना तो शिव्या घालत नाहीये.’ ती हसली आणि म्हणाली, ‘खूप सहनशील आहे तो.’‘सहनशील नाही, त्याला तेच हवंय, म्हणून तो मनातल्या मनात थँक्स म्हणतोय.’ ती हसली आणि त्याला लटका फटका मारला. तसा तो म्हणाला, ‘त्यांनीही रिटर्न तिकीट काढलं आहे. एकांतात जाऊन गुजगोष्टी करणे आता सोपे राहिलेले नाही. कोणी गुंड येतील आणि गँगरेप करतील आणि त्याचे हात-पाय तोडतील सांगता येत नाही. त्यामुळे लोकलच्या दरवाजात बाहुपाशात घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी रिटर्न तिकीट काढणारे अनेक जण आहेत.’तिने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, ‘चल, उतरू आता. आज लवकर घरी आलो सांगू आणि लवकर झोपू जरा.’‘हो, आता उशीर नको करायला…’ तो म्हणाला, तशी ती लाजली. दोघे खाली उतरले. एकदम खूश होते. भेळ खाल्ली नाही, वडापाव, पावभाजी खाल्ली नाही की, हॉटेलिंगही केले नाही, पण तरीही दोघे तृप्त झाले होते. एका निर्णयापर्यंत आले होते.

आणखी वाचा

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी