सासुरवाशिणीला सासरी त्रास देणारे कोण कोण असते? तर सासू खाष्ट असते. सासरा आखाड असतो. मोठा दीर, थोरली जाऊ, आजेसासू हे सगळं सारखं शिकवण्याच्या नादानं या छोट्या नव्या सुनेला जाच करत असतात. घरच्या वडीलधाºयांच्या वागण्यामुळे छोटी नणंदही तसेच वागू लागते आणि वहिनीला छळण्याचा प्रयत्न करते. या पूर्वीच्या काळात घराघरात घडणाºया गोष्टी आहेत. त्यामुळे याचा होणारा त्रास या भोंडला गीतातून व्यक्त होतो.
या गाण्याची दुसरी बाजू म्हणजे सारखी तक्रार करणारी, कुरकुरणारी सून, आपल्या भावना गाण्यातून व्यक्त करून सासरच्यांना झोडणाºया सुनेला एका छोट्या नणंदेने दिलेले हे उत्तर आहे. किंबहुना जी सासुरवाशिण सून आहे, ती कुठली तरी माहेरवाशिण आहे. तिच्या माहेरी ती भावाच्या बायकोला त्रास देणारीही आहे. सासरी छळ होतो, म्हणून कुरकुरणाºया सूनेचे माहेरी नक्की काय चालते, हे पण यातून नकळत दिसून येते, म्हणून या गाण्याचा दोन्ही बाजूंनी विचार करावा लागेल. यात बंडखोरीला दिलेले उत्तर आहे. काय आहे हे नेमके गाणे ते आधी पाहुया.
नणंदा-भावजया दोघी जणी।
घरात नव्हतं तिसरं कोणी।।
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी।
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं।।
आता माझा दादा येईल गं।
दादाच्या मांडीवर बसेन गं।।
दादा तुझी बायको चोरटी।
असेल माझी गोरटी।।
घे काठी घाल पाठी।
घराघराची लक्ष्मी मोठी।।
खरं तर तत्कालीन वाडा संस्कृती, एकत्र कुटुंब पद्धतीत घराला कुलूप लावण्याची प्रथा नव्हतीच. घरात कोणी नाही, असं कधी व्हायचंच नाही. त्यामुळे नणंदा-भावजया दोघी जणी घरात आहेत, तिसरे कोणीही नाही, असे चित्र या गाण्यात आहे. त्यामुळे शिंकाळ्यावर टांगून ठेवलेले लोणी खाल्लं कोणी, असा प्रश्न पडल्यावर ती धाकटी नणंद म्हणते, मी नाही खाल्लं. वहिनीनं खाल्लं.
आता यावरून दादाकडं तुझी तक्रार करेन, अशी ती धमकावतेआहे. आता खरंतर हे लोणी त्या नणंदेनेही खाल्लेले असू शकतं; पण ती तर घरातील आहे. वहिनी ही बाहेरून आलेली आहे. घरातल्यांनी खाल्ले, तर तो तीचा हक्क आहे. त्याला चोरी केली म्हणता येणार नाही; पण बाहेरच्यांनी खाल्ले, तर ती चोरी होईल, म्हणजे लग्न होऊन घरात आलेल्या सुनेला अजूनही तिला आपलेसे केलेले नाही. तिला तिथे खाण्याचा अधिकार नाही, हे या ठिकाणी अधोरेखित होते.
नणंद आपल्या भावाकडे वहिनीबद्दल तक्रार करत आहे, दादा तुझी बायको चोरटी आहे, जरी ती गोरी गोमटी असली, तरी ती चोरटी आहे. ती लाडाने आपल्या दादाच्या मांडीवर बसून त्याचे कान भरणार आहे की, वहिनीला चांगली शिक्षा कर. तिनं लोणी पळवले आहे, तिला चांगले काठीने बदडून काढ. घे काठी, लाग पाठी घराची लक्ष्मी मोठी, असं म्हणून उपहासात्मक वर्णन या ठिकाणी होते. सूनबाई म्हणजे घरची लक्ष्मी म्हणायचं आणि तिला तिच्या हातानं काही खाण्याचा अधिकार मात्र नाही. हे या गाण्यातून सांगून नणंदेचा होणारा जाच या बंडखोर गीतातून व्यक्त होतो.
हे भोंडल्यातील गाणे तसे बडबड गीताप्रमाणेच आहे. तशी बरीचशी गाणी यमक जुळवायचा म्हणून जुळवलेली आहेत. आपल्याकडे खेळाच्या माध्यमातून अशी अनेक गाणी आहेत की, ज्याचा वापर घरगुती भांडणं, संघर्ष त्यातून दाखवला जातो. मग ती भोंडल्याची गाणी असतील नाही, तर मंगळागौरीची गाणीही असतील. ग्रामीण भागात लग्नात उखाणे घालून वहिनी वहिनींमधली भांडणं करण्याची प्रथाही होती. रुखवत नाचवताना दोन्ही घरातील उणीदुणी काढण्याची प्रथा या लोकसंस्कृतीतून दाखवून दिलेली आहेत. हा सगळा वर्षभरातील राग कुठेतरी व्यक्त होत असतो आणि त्याला वाट करून देण्यासाठी ही भोंडल्यातील बंडखोरी होते.
प्रफुल्ल फडके/ जागर