Sunday, February 1, 2026
spot_img

पडदा व्यापणारा बीग बी

मागच्याच आठवड्यात एक बातमी आली आणि त्यामध्ये अमिताभ बच्चन याच्या निवृत्तीचा विषय चर्चेत आला. कुठेतरी त्याने आपण थकलो असल्याच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याची बातमी झाली. एखादी व्यक्ती मोठी झाली की, त्याच्या प्रत्येक कृतीची बातमी असते. एवढा महानायक निवृत्त होणार याचे अनेकांना दु:ख झाले. कारण गेल्या पन्नास वर्षांत फक्त सुपरस्टार म्हणून नाही तर पडदा व्यापणारा अभिनेता म्हणून अमिताभ बच्चनचा उल्लेख करावा लागेल. वयाचा मान आणि कारकीर्द म्हणून अमिताभचा उल्लेख अहो, जाहो असा करायला हवा, पण कलाकारांच्या बाबतीत तसे नसते. एखादा अभिनेता कितीही मोठा झाला तरी त्याचे वय सोळाच असते. त्याला कधीही अहो, जाहो न म्हणता अरे, तुरेच करायचे असते. याचे कारण त्याच्यावर आपण प्रेम करत असतो. ज्याच्यावर आपण जिवापाड प्रेम करतो त्याला अहो, जाहो करत नाही. आईचा उल्लेख एकेरी करतो, देवाचा उल्लेख एकेरी होतो. तसाच महान कलाकाराचाही उल्लेख एकेरीच करायचा असतो. म्हणूनच तो अमिताभच राहणार.

खरंच केवढी मोठी कारकीर्द आहे. अमिताभ बच्चन. भारतीय सिनेमाच्या वैभवशाली इतिहासातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक. चार दशकांहून अधिकच्या कारकिर्दीत जवळपास दोनशे चित्रपटांत काम. बॉलिवूडचा शहेनशहा, महानायक, अँग्री यंग मॅन, स्टार आॅफ द मिलेनियम, बिग बी अशी अनेक विशेषणं. अभिनयासोबतच पार्श्वगायक, चित्रपटनिर्मिती आणि टीव्हीवरील कार्यक्रमाचे पथदर्शक सूत्रधार. कारकिर्दीचे वेगवेगळे टप्पे गाजवले. काळानुरूप वेगळ्या भूमिका केल्या. मसालापट ते कलात्मक चित्रपट अशा भूमिकांनी कायम पडदा व्यापणारा हा अभिनेता आता थकल्याचे ऐकूनच वाईट वाटले. सांगावेसे वाटते ‘अरे अमिताभ, तुला थकून कसे चालेल? काम केलेच पाहिजे’.

छोरा गंगाकिनारेवाला मुंबईत आला आणि समुद्रासारखा मोठा झाला. अमिताभ बच्चनचा जन्म अलाहाबादचा. अमिताभ याच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले, तरी बच्चन या टोपणनावाने तो कविता प्रसिद्ध करायचा. सिनेसृष्टीत प्रवेश करताना अमिताभनेसुद्धा हेच टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली. पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन आडनाव व्यवहारात रूढ झाले.

ऐन विशीत कोलकात्यातील एका जहाज वाहतूक कंपनीतील एजंटची नोकरी सोडून अमिताभने अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. उंचपुरा बांधा आणि दमदार आवाज ही पुढे या सुपरस्टारची वैशिष्ट्ये बनली. परंतु, सुरुवातीला यामुळेच त्याची हेटाळणी झाली होती.

के. ए. अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ (१९६९) या चित्रपटापासून अभिनयाची सुरुवात झाली. सुरुवातीच्या अपयशानंतर ‘जंजीर’पासून यशाची घौडदोड सुरू झाली आणि पुढे यशस्वी चित्रपटांची प्रदीर्घ मालिकाच जन्माला आली. त्यातूनच स्टार, सुपरस्टार आणि स्टार आॅफ द सेंच्युरी अशी विशेषणे लागत गेली. एक काळ असा होता १९७० च्या दशकाचा उत्तरार्ध आणि १९८० च्या दशकाचा पूर्वाध की या काळात वर्षात आठ ते दहा चित्रपट त्याचे येत होते. सतत कुठे ना कुठे तरी त्याचा चित्रपट झळकताना दिसायचाच. अमिताभ आहे म्हणजे चित्रपट चालणारच, ही खात्री निर्मात्यांना, वितरकांना असायची.

आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले तसेच त्याच्या आयुष्यात अनेक घटनाही संस्मरणीय घडल्या. त्यापैकीच एक म्हणजे कुलीच्या सेटवर झालला अपघात. या अपघातानंतर तो अक्षरश: जिवावरच्या संकटातून बचावला. त्यावेळी तो बरा व्हावा म्हणून देशभरातीलच नाही, तर जगभरातील चाहत्यांनीही प्रार्थना केल्या होत्या. तब्येतीत सुधारणा झाल्यावर अमिताभने जुहूच्या त्याच्या प्रतीक्षा बंगल्याच्या खिडकीतून चाहत्यांना रोज दर्शन देणे सुरू केले. अजूनही ही रीत कायम आहे. अर्थात गेल्या काही वर्षांपासून हे ‘दर्शन’ महिन्यातील एका रविवारपुरते मर्यादित झाले आहे.

सत्तरच्याच दशकात सिनेमांसोबतच अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांच्या जवळीकीबद्दल खूप चर्चा झाल्या. यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचेही सांगितले गेले. अभिनेत्री परवीन बाबीसोबतच्या त्यांच्या मैत्रीचीही अशीच चर्चा झाली. कालांतराने सगळे काही स्थिरस्थावर झाले, तरी आजही रेखा आणि अमिताभ एखाद्या कार्यक्रमात एकत्र किंवा समोरासमोर आले तर चर्चा होतात. जया बच्चनच्या चेहºयावरील भाव टिपले जातात. रेखाही अमिताभ बच्चन या विषयावर बोलण्याची संधी सोडत नाही, पण अमिताभ बच्चनच्या अनेक अभिनेत्रींबरोबर जोड्या जमल्या, पण सर्वात पसंतीची प्रेक्षकांची जोडी म्हणजे अमिताभ आणि रेखा हीच होती.

एखादा अभिनेता यशस्वी झाल्यावर त्याला आपणही निर्मिती करावी असे वाटते. त्यामुळे निर्मिती क्षेत्रात उतरण्याचे त्याने ठरवले, पण अभिनेता म्हणून जो नावलौकिक त्याने कमावला तो निर्माता म्हणून त्याला कमावता आला नाही. अमिताभ बच्चन कार्पोरेशन लिमिटेड या संस्थेद्वारे आणि स्वतंत्रपणेही त्याने चित्रपटांची निर्मिती केली. त्यात ‘तेरे मेरे सपने’, ‘मृत्युदंड’, ‘उल्लासम’, ‘सात रंग के सपने’, ‘मेजरसाब’, ‘अक्स’, ‘विरुद्ध’, ‘अंतरमहाल’, ‘फॅमिली’, ‘पा’, ‘विहीर’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘सप्तपदी’, ‘शमिताभ’ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. यापैकी बहुतेक चित्रपट चांगलेच चालले, पण प्रेक्षकांना तो अमिताभ अभिनेता म्हणूनच हवा होता. त्याला बघणे, त्याचे समोर असणे हेच प्रेक्षकांना आवडते हे वारंवार दिसून आले आहे.

अमिताभच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. १९८४ मध्ये मित्र राजीव गांधी यांना मदत करण्यासाठी त्यांनी राजकारणात पाऊल टाकले. अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून त्यांनी समाजवादी पक्षाकडून खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला, मात्र बोफोर्स प्रकरणात त्यांचे नाव समोर आले. त्यानंतर सिनेमेही फ्लॉप होऊ लागले. इतकेच नव्हे, तर एबीसीएल या त्यांच्या निर्मिती कंपनीला लाखोंचे नुकसान झाल्याने गाशा गुंडाळायला लागला होता. एकूणच आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. अशावेळी ‘कौन बनेगा करोडपती’च्या रूपात बिग बीने फिनिक्ससारखी भरारी घेतली. केबीसीच्या पहिल्याच भागापासून प्रेक्षकांची मनं जिंकली. हिंदी भाषेवरचे प्रभुत्व, सहभागींशी बोलण्याची शैली, संवाद साधण्याची कला यामुळे तो एकमेवाद्वितीय ठरला. हॉट सीटच्या माध्यमातून त्याने अनेकांना लखपती-करोडपती बनवले. यामध्ये त्याची बोलण्याची नम्रता, सभ्यता ही प्रेक्षकांना खूपच भावली. त्यामुळे नंतर अनेकांनी हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. शाहरूख खाननेसुद्धा. परंतु अमिताभची सर कोणालाच आली नाही. येणारही नाही.

खरं तर अमिताभच्या कारकिर्दीत दिग्दर्शकांचा वाटाही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यात मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, हृषिकेश मुखर्जी, रमेश सिप्पी, यश चोप्रा, रमेश बहल या दिग्दर्शकांचा तसेच सलीम-जावेद, कादर खान, प्रयाग राज या लेखकांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. अमिताभ युग सुरू होण्यापूर्वी आपल्याकडे एक नायक आणि त्याच्याबरोबर विनोदी सहनायक असायचा. तो फॉर्म्युलाच ठरलेला होता. दिलीप कुमार, जॉनी वॉकर, राजेश खन्ना, असरानी, जितेंद्र, मेहमूद, अगदी अलीकडे गोविंदा-शक्ती कपूर, गोविंदा-जॉनी लिव्हर अशाही जोड्या होत्या, पण अमिताभने पडदा व्यापल्यानंतर विनोदी सहनायकाची जागाही घेतली होती. अँग्री यंग मॅन इतक्याच विनोदी अमिताभच्या भूमिकाही तेवढ्याच गाजल्या होत्या. अमिताभला स्वत:लाच विनोदाची जबरदस्त जाण असल्याने वेगळा विनोदी सहनायक महत्त्वाचा ठरला नाही.

कोणत्या वेळी काय करायचे हे नेमके माहिती असल्याने अमिताभची कारकीर्द बहरत गेली. भारदस्त झाली. दशकामागून दशके कधी गेली आणि पडदा, छोटा पडदा, जाहिराती या माध्यमातून तो सगळ्यांच्या जीवनाचा भाग झाला. अगदी कोरोनाकाळातही मोबाइलवर त्याचा आवाज येत राहिला. शौचालयापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या प्रत्येक उत्पादनाच्या जाहिराती करून तो सतत समोर राहिला. मग थकणं साहजिकच आहे. त्यामुळे निवृत्तीचा विचार केला तरी त्यात गैर काही नाही, पण त्याचे दर्शन तर सतत होत राहणारच इतकी कामगिरी त्याने केलेली आहे. अर्थात ही खरीच निवृत्ती आहे की, नव्या काही रूपात तो समोर येतो हे पहावे लागेल. कदाचित एखादी वेबसीरिज घेऊन येईल. काय सांगता येत नाही, पण या भूमिकेचेही आपण स्वागत करायला हवे.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी