Monday, February 2, 2026
spot_img

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

 दासबोधातील पाचव्या दशकातील सहाव्या समासात समर्थांनी शुद्ध ज्ञान निरूपण केलेले आहे. यामध्ये उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास कसा करावा याचे नेमके मार्गदर्शन समर्थांनी केले आहे. समर्थ म्हणतात, मुख्य देव जो ईश्वर त्याला जाणावे. आपल्यांतील खरा मी तो आपलें खरें स्वरुप. तें ओळखावेआणि टिकणारे काय व तात्पुरते काय हे नक्की करावे. याला ज्ञान म्हणतात. मला ज्ञान आहे ही जाणीव अज्ञान समजलें जाते, असें अत्यंत मलरहित, शुद्ध जें स्वरुपभान त्याला ज्ञान म्हणतात.  दृश्यरहित शुद्ध स्वरुप जाणणें याचें नाव आत्मज्ञान होय.    आत्मज्ञानमध्ये संपूर्ण अद्वैत असते. तुर्येमध्ये तर प्रत्यक्ष द्वैत आढळतें. म्हणून शुद्ध आत्मज्ञान स्वतंत्र आहे. निराळेच आहे.  शुद्ध ज्ञानाचें लक्षण म्हणजे जें शुद्ध परमात्मस्वरुप आहे, तेंच आपण आहोत असा जो साक्षात अनुभव येतो, त्याचें नांव शुद्ध स्वरुपज्ञान होय. हे सांगतान यातील महावाक्यांचा उपदेश उत्तमच आहे. पण त्यांचा जप करण्यास सांगितलेला नाही. साधकानें महावाक्यांच्या अर्थाचा विचार करणें आवश्यक आहे. म्हणून या महावाक्यांवर समर्थांनी सविस्तर सांगितले आहे. महावाक्यांमध्यें परमार्थाच्या उपदेशाचे सार आहे. हे निःसंशय पण त्यांचे मननच केले पाहिजे. जप केल्यानें अज्ञानाचा अंधकार नाहीसा होत नाही. महावाक्यांचा नुसता अर्थ घेतला, तरी आत्मा ब्रह्मस्वरुप किंवा परमात्मस्वरुप आहे. आणि आपण वास्तविक आत्मस्वरुप आहोत. या महावाक्यांचा जप केल्याने कांहीं आत्मज्ञान होत नाही. उगाचच शीण मात्र होतो. माहावाक्यांचे उपदेश असा आहे. मी देह नसून आत्माच आहें, आणि आत्मा ब्रह्मस्वरुप असल्यानें मी ब्रह्मस्वरुप आहे. असा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणे समजावे. हा आपला आपणालाच होणारा लाभ आहे. हें आत्मज्ञान फार दुर्लभ आहे. जें आधी व नंतरही स्वतः स्वरुपच असते. ज्या ठिकाणाहून हे प्रगट होते व जेथे सर्व नाहीसे होते, ते ज्ञान झाल्यावर सर्व बंधनांपासून सुटका होते.   जेथेसर्व मते व मतांतरे निर्विकार होतात आणि सूक्ष्मत्वाने विचार केल्यावर सर्व एकच आहे हे पटते. तेच आत्मज्ञान होय. वेदांच्या मताप्रमाणे जें या चराचराचे मूळ आहे. ते केवळ शुद्ध, निर्मळस्वरुप आहे. यालाच ज्ञान म्हणतात. वेदांच्या मते आपण कोठून आलो, याचा शोध घेता घेता सहजच अज्ञान नष्ट होते. हेच ते मोक्ष मिळवून देणारे ब्रह्मज्ञान होय.  आपल्यामधील खरा मी कोण आहे याचा विचार करता, आत्मज्ञान होते. आत्मा सर्वव्यापी असल्यानें आपण आत्मज्ञानामुळें सर्वज्ञ होतो. सर्व ठिकाणी मीच व्यापून आहे असा अनुभव आल्याने देहापुरताच मी आहे ही आकुंचित वृत्ती लोप पावते. मी कोण आहे  असा हेतु मनांत बाळगुन जर आपण शोध घेऊ लागलो तर खरा मी देहाच्या पलीकडे आहे असा अनुभव येतो. देहाच्या पलीकडे असलेल्या मीला पाहता पाहता आपण निश्चितपणे आत्मस्वरुपच होतो. पूर्वीचे खरे थोर पुरुष ज्या ज्ञानाने संसारांतून पार पडले त्याची माहिती समर्थांनी याठिकाणी नमूद केलेली आहे. ज्या ज्ञानाच्या आनंदाने महादेवही निरंतर डोलत असतो. जें आत्मज्ञान वेदशास्त्रांचे तात्पर्य आहे, जें योग्य प्रमाणांनी निश्चित केलेले आहे, जें साक्षात् अनुभवाला येते. आणि जें अति सूक्ष्म विचारांती योग्य ठरतें,  तें आत्मज्ञान श्रद्धावंतांना त्याच्या भाग्याप्रमाणे प्राप्त होते. पूर्वी होऊन गेलेले, सध्या हयात असलेले, व पुढें होणारे सर्व साधुसंत आणि सज्जन यांचें  गुप्त असलेले असें जें आत्मज्ञान समर्थांनी वर्णन केले आहे. तीर्थयात्रा, व्रतें, तप, दान, धुम्रपान, पंचाग्नि साधन, गोरांजनें या साधनांनी आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आत्मज्ञान हेंच सगळ्या परमार्थसाधनेचे फळ आहे. तेंच ज्ञानाची परमावधि आहे. त्यामुळें संशयवृत्तीचे मूळच नष्ट होते. पुराणांचा अभ्यास करुन आत्मज्ञान प्राप्त होत नाही. तें ज्ञान सांगतांना वेद थकले. असें आत्मज्ञान आतां या क्षणीं गुरुकृपेने समजावून देतो, असे श्री समर्थ सांगतात की, संस्कृत ग्रंथांत काय आहे ते आपण पाहिले नाही. मराठी ग्रंथांत आपला प्रवेश नाही. पण आपल्या हृदयांत सद्गुरुस्वामीची कृपामूर्ति मात्र स्थिरपणें राहिली आहे. वेदांतावरील ग्रंथ सर्व श्रेष्ठ आहेत. वेदान्तापेक्षां दुसरें कांहीं श्रेष्ठ नाही. कारण वेदांचे सारें रहस्य वेदान्तामध्ये प्रगट झाले आहे. अशा वेदान्ताचा जो तात्पर्यार्थ आहे. तसेच अति गहन जो परमार्थ आहे, तो पण याठिकाणी समर्थांनी सांगितला आहे. अतिशय खोल व अर्थगंभीर असें फक्त सद्गुरु वचनच आहे. या वचनाने निश्चित समाधान मिळते. सद्गुरुवचन म्हणजेच खरा वेदान्त व तोच सिद्धान्तही आहे. तें वचन हेंच प्रत्यक्ष अनुभविलेले ज्ञान होय.समर्थ म्हणतात, अहं ब्रह्मास्मि  हें महावाक्य आहे. मी ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ आहे. या अर्थाचे रहस्य तर्काने समजणार नाही. त्या अर्थामध्यें गुरु व शिष्य दोघे एक होऊन जातात. विश्व निर्माण होते तेव्हा पंचमहाभूतें क्रमाने निर्माण होतात. विश्वाच्या कल्पान्ती तीही त्याच क्रमाने नष्ट होतात. इतकेंच नव्हे तर उरणारी प्रकृति आणि पुरुष तीं देखिल परब्रह्मांत विलीन होतात. अशा रीतीने सर्व दृश्य वस्तु नाश पावल्या म्हणजे वास्तविक मी पणाने वावरणारा मी देखील उरत नाही. कारण मुळांतच परमात्मा एकरुप असल्यानें एकरुप होण्यास निराळें कांहीं करावेंच लागत नाही. सर्व सृष्टी मूळ स्वरुपांत विलीन झाल्यावर मग ते एकस्वरुप ब्रह्मच तेवढें उरते. त्यामध्ये पिंड व ब्रह्मांड यांना पहावयाचे म्हटले तरी ते आढळणार नाहीत. ज्ञानाचा वन्ही पेटला म्हणजे दृश्याचा केरकचरा संपूर्ण जळून नष्ट होतो. ज्ञाता स्वतः ज्ञानरुप झाल्यावर वेगळेपणाचें मूळच जळून जातें. आपल्या इंद्रियांना दिसणारे दृश्य विश्व हें खोटे आहे हे पटले की वृत्ती पालटून हृदयांतील आत्म स्वरुपाकडे धांव घेऊ लागली कीं, दृश्य असुनही नसल्यासारखें होते व आपोआपच आत्मनिवेदन होते.खरा मी आत्मरुप आहे. म्हणून  मी  स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या चार देहांहून वेगळा आहे. तो भ्रम आहे व त्यानें लोक भुलले आहेत. मी देहच आहे हा देहाभिमान घट्ट धरुन ठेवल्यानें मी बांधलेला आहे हा भ्रम निर्माण होतो. परमार्थाचे अखंड स्मरण व श्रवण करीत राहीले तरच समाधान मिळते. अज्ञान संपूर्णपणे नाहीसे होऊन ब्रह्मज्ञान पूर्णतेला पोहोचते. अंगांत वैराग्य भरुन जाते. दृश्याबद्दल थोडीही वासना मनांत उरत नाही. इंद्रियांचे भोग समाधान देत नाहीत. हे उमजून ज्याचे मन विरक्त बनते तेव्हां पूर्ण आत्मज्ञान प्राप्त होते. जो जागा असतो त्याला स्वप्न खोटें असतें. जो झोपलेला असतो त्याला तें सर्व बाजूनीं वेढून टाकते. तोच माणूस जागा झाला म्हणजे त्याला भीति उरत नाही. ज्यावेळी अविद्यारुप झोप जीवाला भुलवून झोपच घालते त्यावेळी दृश्याची वाईट स्वप्ने त्यास पडतात, त्यामुळें तो घाबरतो व भयाने त्याचें सर्व शरीर कांपू लागते. या अविद्यारुप झोपेंतून संपूर्ण जाग येण्यास सारखें श्रवण व मनन केल्यास दृश्याचे भय नाहीसे होते. ज्याला संपूर्ण विरक्ति साधली नाही त्याला साधक असे म्हणतात. ज्याला साधन करावेसे वाटत नाहीं तो सिद्धपणाच्या अभिमानानें बांधला जातो. अशा अहंकारी सिद्धापेक्षां मुमुक्षु केव्हांही चांगला कारण त्याला ज्ञानाची तळमळ असल्यानें तो ज्ञानाचा अधिकारी असतो.
॥ जय जय रघुवीर समर्थ॥

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी