Sunday, February 1, 2026
spot_img

सिद्धहस्त नाटककार विद्याधर गोखले

विद्याधर गोखले हे नाव घेतले की, समोर येते मंदारमाला ते बावनखणी असा संगीत नाटकांचा प्रवास. मराठी संगीत नाटकातील मरगळ झटकून खºया अर्थाने संजीवनी देणारे नाटककार म्हणून विद्याधर गोखले यांच्याकडे पहावे लागेल. हाडाचे पत्रकार असलेल्या गोखले यांनी पत्रकारितेतील लेखनात नाट्यमयता आणून रंजकता निर्माण केली होती, तर नाटकात वस्तुस्थितीचे भान सांभाळत प्रेक्षकांना आवडतील असे विषय दिले होते. ते खºया अर्थाने सिद्धहस्त लेखक होते. त्यांच्या या लेखणीचा सन्मान १९९३ ला झालेल्या सातारच्या ६६ व्या साहित्य संमेलनात झाला. या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर गेल्या २८ वर्षांत इतके सुंदर साहित्य संमेलन झाले नाही. नंतर साहित्य संमेलने ही वादाची झाली, पण या साहित्य संमेलनात खºया अर्थाने लेखक, कलाकार, साहित्यिक यांचा मेळा होता. तो विद्याधर गोखले यांच्या नावाचा दबदबा होता, आदर होता. कधी साहित्य संमेलनाला न जाणारे व. पु. काळे एकीकडे व्यासपीठ गाजवत होते, तर एकीकडे शांताबाई शेळके. हृदयनाथ मंगेशकर, लतादीदी यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम, अशी पर्वणी या संमेलनात मिळाली ती नंतर कधीच नाही. ते साहित्य संमेलन विद्याधर गोखले यांच्या नावावर नोंदवले आहे.

अमरावतीहून मुंबईत आल्यावर काही काळ ते शिक्षक म्हणूनही काम करत होते. न. चि. केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, शि. म. परांजपे यांच्या लेखनाचा त्यांनी खास अभ्यास केला होता. विद्याधर गोखले यांचे लेखन मात्र गांभीर्यापेक्षा रंजकतेकडे अधिक झुकणारे होते. राजकीय लेखनही ते साहित्यिक शैलीने नटवत. लेखन सालंकृत करण्यावर त्यांचा अधिक भर असे. संस्कृत व उर्दू साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. भाषेच्या व शब्दांच्या नेटक्या वापराकडे त्यांचा अधिक कटाक्ष होता. त्यांनी झंझावात या कादंबरीशिवाय अनेक नाटकांचे लेखन केले. त्यामध्ये संगीत अमृत झाले जहराचे, इब्राहिमखान गारदी, संगीत चमकला ध्रुवाचा तारा, संगीत जय जय गौरीशंकर, जावयाचे बंड, संगीत पंडितराज जगन्नाथ, बरसते सूर्यातून चंद्रिका, बावनखणी, संगीत मदनाची मंजिरी, संगीत मंदारमाला, संगीत मेघमल्हार, रूपरंजनी, राणी रूपमती, साक्षीदार, सुंदरा मनामध्ये भरली, संगीत सुवर्णतुला, संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकांचा समावेश आहे. ही सर्वच नाटके अतिशय सुंदर आहेत, पण यातील मंदारमाला हे नाटक संगीत रंगभूमीसाठी मैलाचा दगड म्हणून ओळखले जाते. जय जय गौरीशंकर या नाटकाने कमाल केली, पंडितराज जगन्नाथ, सुवर्णतुला, स्वरसम्राज्ञी या नाटकांनी संगीत नाटकांना ऊर्जा दिली तर बावनखणी या संगीत नाटक आता बंद होणार की काय अशा परिस्थितीत, विनोदी फार्सिकल नाटकांच्या लाटेत प्रेक्षकांना संगीत नाटकांकडे खेचले. त्यामुळे विद्याधर गोखले यांच्या नाटकांनी दोन दशके संगीत रंगभूमीला सोनेरी दिवस दिले होते.

विशेषत: १९५५-६० या काळात मरगळलेल्या अवस्थेत असलेली मराठी संगीत रंगभूमी, नाटककार विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ आणि सुवर्णतुला या दोन लागोपाठ आलेल्या संगीत नाटकांनी पुन्हा जागृत केली, मात्र त्या रंगभूमीला विद्याधर गोखले यांच्या संगीत मंदारमालाने खºया अर्थाने नवसंजीवनी दिली.

संगीत मंदारमालाचे कथानक सतराव्या-अठराव्या शतकात राजपुतान्यात घडले, अशी मध्यवर्ती कल्पना आहे. आपल्याकडे जे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक, बंदिशकार, नायक, विद्वान पंडित होऊन गेले त्यांच्यापैकीच काहींच्या जीवनातील मोजक्या प्रसंगांना विद्याधर गोखले यांनी कल्पनेची जोड देत या नाटकाचे कथानक लिहिले. या नाटकाद्वारे, मंदार या कमालीचा स्त्रीद्वेष्टा असलेल्या, जीवनाला विटलेल्या, मात्र सप्तसुरांच्या नादब्रह्मात कायम रमणा‍ºया आणि संगीत भक्तीच्याच बळावर मनपरिवर्तन झालेल्या अवलिया वनवासी संगीतकाराचा जीवनप्रवास रसिकांसमोर आला. त्याला रसिकांनी उदंड साथ दिली. १९६३ च्या गुढीपाडव्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या भारत नाट्य प्रबोधन संघाने हे नाटक रंगभूमीवर आणले. दादर येथील रंगमंदिरात नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग झाला. पहिले शंभर प्रयोग रंगमंदिरतर्फे झाल्यावर नाट्यनिर्माते राजाराम शिंदे यांच्या नाट्यमंदारने हे नाटक चालवायला घेतले आणि ४०० प्रयोगांचा पल्ला कधी ओलांडला हे रसिकांनाही समजले नाही. संपूर्ण देशभर प्रयोग झाले. अडीच-अडीच महिने सलग दौरे होत. कधी कधी नाटकाचे दिवसाला तीन-तीन प्रयोग होत. या नाटकाचे असे एकूण १२०० हून अधिक हाऊसफुल्ल प्रयोग झाले. या नाटकाद्वारे विद्याधर गोखले यांनी मोठ्या आणि आळवून आळवून म्हणावयाच्या नाट्यपदांच्या परंपरेला छेद दिला. लागोपाठ पदे येणार नाहीत अशी नाटकाची सुरेख मांडणी त्यांनी केली. चटपटीत संवादांदरम्यान ही रसाळ पदे गुंफली होती. पंडित राम मराठे आणि प्रसाद सावकार यांच्यातील बसंत की बहार आयी ही अजरामर जुगलबंदी ऐकण्याला प्रेक्षक उत्सुक असत. त्यासाठी नाटक साडेचार तास चालले, तरी प्रेक्षक जागचे हलायचे नाहीत.

सोऽहम हर डमरू बाजे ही या नाटकातील तोडी रागावर आधारित बंदिश आजही लोकप्रिय आहे. नाटकातील इतर पदांमध्येही पं. राम मराठे यांनी अनेक राग-रागिण्यांचा वापर केला. ज्योतकंस, अहिरभैरव, गौडमल्हार, बसंत बहार, बैरागी भैरव, तोडी, मालकंस, बिहाग, हिंडोल, भैरवी असे अनेक राग रामभाऊंनी चपखलपणे वापरले.

एकूणच नाट्यकलेचं दैवत म्हणजे नटराज अर्थात नटेश्वर भगवान शंकर. शंकराचं गुणगान करूनच संगीत नाटकाची सुरुवात होते. डमरूच्या निनादातूनच आद्य संगीताची निर्मिती झाली, असं मानलं जातं. विद्याधर गोखले यांनी त्यांच्या सर्वच नाटकांत शंकराचं गुणगान करणारी अनेक नाट्यपदं लिहिली होती. परंतु संपूर्ण नाटकच भगवान शंकर आणि पार्वती अशा कथानकावर लिहिण्याचे त्यांच्या मनात घोळत होते. हे नाटक शिवलीलामृतातील १४ व्या अध्यायाच्या आधारे लिहिलं आहे. कैलासाचा रम्य परिसर आणि गोमंतकीय निसर्गसौंदर्य अशा पार्श्वभूमीवर हे नाटक घडत जातं. किंबहुना भगवान शंकराच्या आणि पार्वती अर्थात गौरीच्या गोमंतकीय वास्तव्यामुळे मंगेशी आणि शांतादुर्गा ही जागृत देवस्थानं गोमंतकात स्थापन झाली, त्याचंच हे कथानक. या नाटकासाठी भव्यदिव्य वास्तववादी नेपथ्य, त्या काळातील नंदी, शृंगी, भगवान शंकर, पार्वती यांची अत्यंत अभ्यासपूर्ण वेशभूषा, रंगभूषा, निसर्गातील संगीताचा चपखल वापर केला गेला. तसेच या नाटकासाठी आगळंवेगळं संगीत देणारा संगीतकार, कुशल नृत्यदिग्दर्शक आणि यातील सात व्यक्तिरेखा निवडणे हे सर्वच शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. गौरीशंकरच्या तालमी सुरू झाल्या. ललितकलादर्शचे वाचिक आणि आंगिक अभिनयात अतिशय मातब्बर असे नटवर्य मामा पेंडसे यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी होती. मुळात पौराणिक नाटक आणि अण्णा गोखल्यांची संस्कृतप्रचुर ओघवती भाषा असल्यामुळे नाटकाच्या वाचनाला मामांनी महत्त्व दिले होते.

संगीत नाटक असूनदेखील या नाटकातली मुख्य नायिका अर्थात पार्वती ही गाणारी नाही, तर ती भिल्लिणीच्या वेशात बहारदार नृत्य करते आणि शंकराला पुनश्च वश करून कैलासावर परत आणते. आजच्यासारखा विविध प्रसारमाध्यमांचा वापर त्या काळी नसतानाही रसिकांमध्ये या नाटकाचा प्रचंड बोलबाला झाला होता. १४ आॅगस्ट १९६६ रोजी बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये शुभारंभाचे सकाळ, दुपार, रात्र असे तीन प्रयोग दणक्यात हाऊसफुल्ल सादर झाले. नाटककार विद्याधर गोखले यांच्याबद्दल लिहिण्यासारखं बरंच आहे, पण संगीत रंगभूमीला त्यांचे योगदान इतके मोठे आहे की, त्यासाठी जागा कमी पडते, त्यामुळे थांबावे लागते.

प्रफुल्ल फडके/तिसरी घंटा

9152448055

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी