Sunday, February 1, 2026
spot_img

नाटकाचा आनंद

मराठी माणूस हा नाटकप्रेमी आहे. मराठी माणसाला जिवंत कला, जिवंत अभिनय पहायला आवडतो. हा जो कलाकारांचा परकायाप्रवेश होत असतो तो पाहताना प्रेक्षक त्या नाटकात शिरत असतो. नाटकाचा पडदा म्हणजे चौथी भिंत असते. ही भिंत प्रेक्षकांची असते. त्यामुळे प्रेक्षकही नकळत त्या नाटकाचा एक भाग बनून जातात. आपल्या जवळच हे काहीतरी घडते आहे अशी अनुभूती त्याला मिळत जाते. त्यामुळे त्याला नाटकाचा आनंद मिळत असतो. म्हणूनच या चौथ्या भिंतीला आपलेसे वाटावे असे नाटक करणे ही कलाकारांची जबाबदारी असते. या चौथ्या भिंतीला जेव्हा खटकते, आपलेसे नाटक वाटत नाही तेव्हा ते नाटक पडते. म्हणूनच नाटकाचा प्रत्येक प्रयोग असतो. प्रयोग हा प्रत्येकवेळी यशस्वी होईलच असे नाही. म्हणजे तमाशाचा खेळ असतो, पण नाटकाचा प्रयोग असतो. हा प्रयोग यशस्वी करण्याची जबाबदारी नाटककारांची, कलाकार आणि तंत्रज्ञांची असते.

म्हणूनच माणूस जेव्हा एखादे नाटक पहायला जातो, तेव्हा तो अनुभव कसा असतो हे समजून घेण्याची गरज आहे. एकतर त्याने आधी त्या नाटकाची जाहिरात पाहिलेली असते किंवा कोणीतरी त्याला नाटकाविषयी सांगितलेले असते. अरे फार चांगले नाटक आहे. पहायलाच पाहिजे, मग असा विचार केला जातो. मग तो नाटक पहायला जायचे ठरवतो, कोणासोबत किंवा एकटेच. कदाचित त्या नाटकाचा भाग असलेल्या कोणीतरी त्याला नाटक पहायचे आमंत्रण दिलेले असते, नाहीतर मग तो तिकीट काढतो.

नाटकाच्या प्रयोगाच्या दिवशी ठरलेल्या वेळेला माणूस रंगमंदिरात पोहचतो. त्याच्याप्रमाणेच इतरही लोक नाटक पहायला आलेले असतात. नाट्यगृहाच्या आवारात त्या दिवशी सादर होणाºया तसेच काही आगामी नाटकांची माहिती लावलेली असते. या माहितीमध्ये प्रामुख्याने नाटक कधी, किती वाजता आणि कुठे सादर होणार आहे, नाटकाचे नाव काय आहे, नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार कोण आहेत हे लिहिलेले असते. क्वचित प्रसंगी नाटकाचा प्रकार (संगीत, कौटुंबिक, सामाजिक, वगनाट्य, विनोदी, फार्स इत्यादी) किंवा नाटकाचा विषय (महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणारे, भ्रष्टाचारावर भाष्य करणारे इत्यादी) देखील नोंदवलेले असते. कधी कधी नाटकातील कलावंतांची किंवा नाट्यप्रसंगांची छायाचित्रे असतात. ते वाचत, बघत असतानाच माणसाच्या नाट्यानुभवाला सुरुवात झालेली असते.

त्यानंतर माणूस तिकीट दाखवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो. बंद पडद्यासमोर अनेक खुर्च्यांच्या रांगा ओळीने लावलेल्या दिसतात. तो त्याच्या आसनावर जाऊन बसतो. त्याच्या आजूबाजूलाही लोक येऊन बसलेले असतात. मग तोपण या प्रेक्षकसमूहाचा एक भाग होतो. थोड्या थोड्या कालावधीने तीन घंटा होतात, प्रेक्षागृहातील दिवे मंद होऊ लागतात. आता, सादर होणाºया नाटकाविषयी सांगितले जाऊ लागते. समोरचा पडदा हळूहळू उघडू लागतो. नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होते.

रंगमंचावर हळूहळू प्रकाश येऊ लागतो आणि प्रेक्षक नाटकाच्या विश्वात प्रवेश करतो. कधी कधी मंचावर काही वस्तू मांडलेल्या असतात, त्यावरून त्याला हे नाटक कुठे घडते आहे याची कल्पना येऊ शकते. एखादे घर किंवा कार्यालय, महाल, रस्ता किंवा जंगल असे काहीही. मंचावर असलेले किंवा प्रवेश केलेले नट-नट्या त्याला व्यक्तिरेखांची प्रचिती देतात. या व्यक्तिरेखा त्याच्याच समाजातील आपल्या आजूबाजूला असणाºया माणसांसारख्या असू शकतात किंवा परक्या देशातल्या, इतिहासातल्या किंवा काल्पनिकदेखील असू शकतात. त्यांनी घातलेले कपडे, त्यांचे चालणे-बोलणे असे काही असते की, ज्या जगात ते राहतात त्याची प्रेक्षकाला कल्पना येऊ शकते.

हळूहळू नाटक पुढे सरकते. प्रेक्षकाला नाटकातील व्यक्तिरेखांमधले नातेसंबंध लक्षात यायला लागतात. कोणकोणत्या व्यक्तिरेखा एकमेकांच्या जवळ येताहेत, कोणकोणत्या एकमेकांशी फटकून वागताहेत. हळूहळू आपल्याला त्यांचा परिचय होऊ लागतो. काही व्यक्तिरेखा त्याला आपल्या अगदी जवळच्या वाटतात, तर काहींचा त्याला राग येतो. मंचावर जे काही घडते आहे त्यामुळे कधी त्याला गंमत वाटते, तर कधी तो गंभीर होतो. व्यक्तिरेखा जेव्हा स्वत:चीच चेष्टा करतात, तेव्हा तोपण त्यांच्यावर हसतो. जेव्हा त्यांच्यावर संकटे कोसळतात, तेव्हा त्याला त्यांची काळजी वाटायला लागते. त्यांच्या वेदनेने तोही दु:खी होतो. कधी नाटकातील थरार आणि रहस्य वाढत जाते, प्रेक्षक श्वास रोखून पहात राहतो. नाटक त्याच्या अत्युच्य बिंदूपाशी पोचते. हळूहळू प्रसंगांची उकल होते आणि शेवटी त्याला हायसे वाटते.

पडदा पडतो. नाटक संपते. प्रेक्षाघरातील दिवे उजळतात. नाटक बघायला आलेली माणसं टाळ्या वाजवतात. लोक हळूहळू प्रेक्षाघराबाहेर पडून काल्पनिक विश्वातून वास्तव विश्वात प्रवेश करतात. नाटकातले काही विचार, काही ठसे, काही भावना मात्र त्या प्रेक्षाकाच्या मनात नंतर बराच काळ रेंगाळत राहतात. हा अनुभव केवळ एखाद्यालाच नाही, तर अनेकांना येतो. याला नाटक पाहणे नाही तर नाटक अनुभवणे म्हणतात.

कधी नाटकातल्या गोष्टीत प्रेक्षक गुंगून जातो, तर कधी नाटकातील गोष्टीमुळे त्याला सभोवतालची जाणीव होते. कधी त्याला स्वत:सारख्याच व्यक्तिरेखा दिसतात, तर कधी आदर्श व्यक्तिरेखा दिसतात. काही नाटकांमधून त्याच्या भोवतालच्या समाजातील समस्या मांडल्या जातात, तर काही नाटके त्याला त्रिकालबाधित सत्याची जाणीव करून देतात; काही विचार करायला लावतात, तर काही केवळ अनुभव देतात. एखाद्या नाट्यप्रयोगाचा एकदा जो अनुभव येतो, तो एकदाच येतो. कारण नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा जरी एकसारखा असला तरी त्याचा अनुभव मात्र प्रयोगागणिक वेगळा असतो, कारण नाटक ही प्रयोगकला आहे. म्हणूनच त्यात मराठी माणूस रमत असतो.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी