Monday, February 2, 2026
spot_img

काळू-बाळूचा काळ

मराठी रंगभूमीवर लोकनाट्य तमाशा मंडळांनी आपली फार मोठी छाप पाडलेली आहे. त्यात काळू-बाळू या जोडीचा काळ हा एक अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर, विठाभाऊ नारायणगावकर आणि काळू-बाळू हे एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात धूमाकूळ घालत होते. प्रेक्षकांनी त्यांना चांगलेच डोक्यावर घेतले होते. यातील काळू-बाळू ही जोडगोळी अतिशय जबरदस्त होती. उपजत असलेली विनोद बुद्धी, निसर्गाने दिलेली जुळ्या भावंडांची किमया याचा योग्य वापर करत संपूर्ण महाराष्ट्राला काळू-बाळूंनी भारावून टाकले होते.

काळू आणि बाळू दोन जुळे भाऊ होते. काळू म्हणजे लहू संभाजी खाडे तर बाळू म्हणजे अंकुश संभाजी खाडे. वडिलोपार्जित तमाशाची परंपरा असणाºया संभाजी आणि शेवंताबाई कवलापूरकर या दाम्पत्यापोटी कवलापूर, जि. सांगली येथे १६ मे १९३३ रोजी या दोघांचा जन्म झाला. आधी काळूचा आणि मग बाळूचा जन्म झाला. काळू-बाळू सहा वर्षांचे असताना वडिलांचे अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले. शिवा-संभाचा तमाशा त्या काळी वर्तमान काळातील घडामोडींवर भाष्य करणारा एकमेव तमाशा होता. सामाजिक समस्यांना वाचा फोडणारा हा तमाशा संभाजी खाडे अचानक निधन पावल्याने मोडकळीस आला. पुढे तमाशाचा फड कसा चालवायचा हा पेच निर्माण झाला. तमाशा बंद पडण्याच्या मार्गावर असताना गावातील लोकांच्या मार्गदर्शनामुळे शिवाने तमाशाचा बोर्ड उभा केला. काळू-बाळू १५-१६ वर्षांचे असताना वडिलांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी तमाशा सुरू करायचा असा निश्चय केला. चुलती दुर्गाबार्इंच्या मदतीने तमाशा उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला. हलगी, ढोलकी, झांज, तुणतुणे ही वाद्ये आणि वेशभूषा घेण्यासाठी जनावरांसाठी आणलेले वैरण विकून काळू-बाळूला दुर्गाबार्इंनी मदत केली. कवलापुरातील मुले एकत्र करून तमाशाच्या तालमी सुरू केल्या. आणि त्यांच्या या कष्टाला यश आले. तमाशाचा फड उभे करणे सोपे काम नाही. पण हे आव्हान त्यांनी जिद्दीने पेलले. अशा लोकांच्या मग कथा होऊ न जातात इतकी त्यांची कामगिरी सुंदर बनत जाते.

खरंतर तमाशाचा आत्मा म्हणजे सोंगाड्या सरदार आणि नाच्या. यांच्याशिवाय तमाशा पूर्णच होत नसे. तमाशात काम करणारी माणसे तर मिळाली, पण नाच्या आणि नाचे काही मिळेना, तेव्हा बाळूने तमाशात नाचकाम करण्याचा निर्णय घेतला. कागलवाडी येथील शकुंतला या जोगतीणीची मुलगी नायकीण म्हणून मिळाली. शकुंतलेबरोबर काळू-बाळूचा तमाशा उभा राहिला. पुढे शामराव, रामराव, धृपदा, मारूती, भीमराव हे कलावंत काळू-बाळूला येऊन मिळाले. काळू-बाळूने तमाशाची बांधणी एकदम जबरदस्त केली होती. सामाजिक भान असलेला तमाशा कलावंत भाऊ फक्कड यांनी लिहिलेला प्रेमाची फाशी हा वग सादर करायचा ठरवला. शामरावाने सूत्र हाती घेऊन सर्व कलावंतांना कथानक समजावून सांगितले. पात्रांची वाटणी केली आणि काळू-बाळूचा पहिला वग तमाशाच्या बोर्डावर उभा राहिला.

काळू-बाळू दोघेही जुळे असल्यामुळे कोण काळू की कोण बाळू हे ओळखणे कठीण होते. दोघांचा चेहरा, रंगरूप आकारमान तंतोतत जुळणारे. एकाला लपवावे आणि दुसºयाला उभे करावे असे हे जुळे भाऊ सगळीकडे नावलौकिक मिळवत होते. त्यांच्या नावाचा गवगवा हा सुप्रसिद्ध ज्येष्ठ तमाशा कलावंत बाबुराव पुणेकर यांच्यापर्यंत पोहचला. वगसम्राट बाबुराव पुणेकरांना काळू-बाळूच्या कीर्तीची माहिती झाल्यानंतर काळू-बाळूचा तमाशा पाहण्याची इच्छा प्रकट केली आणि आर्यभूषण थिएटरमध्ये एक खेळ आयोजित केला. काळू-बाळू पुण्याला प्रथमच आले होते. त्यांनी त्या रात्री जहरी प्याला हा वग सादर केला.

जवळजवळ १५ वगनाट्य काळू-बाळू तमाशा मंडळाने सादर केली. त्यात कोर्टात मला नेऊ नका, भाऊ भावाचा खुण कुणाचा, इंदिरा ही काय भानगड, भिल्लाची टोळी, प्रेमाची फाशी, दगलबाज मित्र, सत्ता द्यावी सुनेच्या हाती, रक्तात रंगली दिवाळी, इंडियन पिनल कोड कलम ३०२, तुझ्यासाठी वेडा झालो, शेराला भेटला सवाशेर, जिवंत हाडाचा शैतान, आणि जहरी प्याला इत्यादी सामाजिक, राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी वगनाट्य सादर केली. या दोघांचे टायमिंग जबरदस्त होते. अंगातील लवचिकपणा आणि हजरजबाबीपणाही वाखाणण्यासारखा होता.

त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कला महोत्सव हैदराबाद, आदिवासी लोककला परिषद भोपाळ, अखिल भारतीय नाट्यसंमेलन, कलागौरव पुरस्कार पुणे, लोकशाहिर भाऊ फक्कड स्मृती पुरस्कार सातारा, कलेचे शिलेदार पुरस्कार सांगली आणि भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचा पठ्ठे बापुराव पुरस्कार, इत्यादी पुरस्कारांनी या जोडगोळीला सन्मानित केले. या दोघांचे वैशिष्ट्य हे होते की आजवरचे सर्व तमाशे चालले ते त्यातील नृत्यांगना, तमाशातील महिला कलावंत कोण आहे यावर. पण या दोन भावांच्या नावावर यांचा तमाशा चालत होता हे विशेष. जत्रेतून तमाशा होण्याची परंपरा आपल्याकडे असली, तरी तिकीट लावून हाऊसफुल्ल शो करण्याची ताकद या भावांमध्ये होती. आजही त्यांच्या लोकनाट्य तमाशाचे प्रयोग जुन्या प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात आहेत.

– प्रफुल्ल फडके/तिसरी घंटा

9152448055\\

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी