Sunday, February 1, 2026
spot_img

मराठीत मोलिअर-गुरूबाजी

र. धों. कर्वे म्हटल्यावर आपल्या लक्षात येते ते समाजसुधारक कर्वे; पण याच समाजस्वाथ्यकार रघुनाथ धोंडो कर्वे यांनी फ्रेंच नाटककार मोलिअर यांच्या एका नाटकाचे रूपांतर मराठीत केले आहे. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल; पण आपल्याकडे अनेक समाजसुधारकांनी रंगभूमी आणि नाटकाचा वापर केलेला आहे. किंबहुना अनेक विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अशी कामे केलेलेली आहेत, ती महत्त्वाची आहेत.

र. धों. कर्वे यांनी मराठीत आणलेले मोलिअर यांचे नाटक फ्रेंच रंगभूमीवर १६६४मध्ये प्रथम आले. त्यानंतर र. धों. कर्वे यांनी स्वत: त्याचे रूपांतर मराठीत करून १९३७ साली प्रकाशित केले. या नाटकाच्या प्रस्तावनेत र. धों. कर्वे यांनी म्हटले आहे की, त्या नाटकाचे हस्तलिखित त्यांच्याकडे अठरा वर्षे पडून होते. कोणी तरी त्यांच्याकडे क्लबमध्ये करण्यासारखे एखादे नाटक आहे का, अशी विचारणा केली, तेव्हा त्यांनी ते हस्तलिखित पृच्छा करणाºयाला दाखवले. परंतु त्याचा प्रयोग झाला नाही; मात्र संबंधितांनी ते एखाद्या नाटक कंपनीने करण्याजोगे आहे असा अभिप्राय दिल्यामुळे ते छापून तरी काढावे या उद्देशाने कर्वे यांनी स्वत: ते प्रकाशित केले. त्यावेळी त्याची किंमत आठ आणे एवढी ठेवली होती. त्या नाटकाचे नाव ‘गुरूबाजी’.

खरंतर नाटकाच्या नावावरून ते दांभिक गुरूसंबंधी असावे, असा एक अंदाज आपण बांधू लागतो. अर्थात तसा तो चुकीचा नाही; पण ते नाटक रूपांतरित झाले ते मूळ लिहिल्यानंतर दोनशेपन्नास वर्षांनी व तेही फ्रेंच नाटकावरून असे लक्षात घेतले, तर मराठीमधील ‘बुवा तेथे बाया’ या नाटकातील गुरूच्या ठिकाणी त्या काळी चर्चमधील धर्मोपदेशक होता, हे सुसंगत वाटते.

अर्थात मराठीत बुवा तेथे बाया लोकप्रिय झाले; पण मोलिअर यांच्या नाटकाला फ्रान्समध्ये प्रचंड विरोध झाला. अर्थात तो त्यांच्या धर्मगुरूंकडून झाला; पण त्याही काळात मराठी माणूस किती प्रगल्भ होता, टीका सहजपणे घेणारा होता आणि पुरोगामी होता, याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल. आजच्या काळात साध्या सुध्या गोष्टींनी भावना दुखावल्या म्हणून कांगावा पिटणाºया लोकांनी हा आपला सहिष्णुतेचा गुण लक्षात घेतला पाहिजे.

मोलिअर यांची बहुतेक नाटके ही वादग्रस्त होती; पण मोलिअर यांच्या नाटकांपैकी सर्वात जास्त वादळ उठले ते त्या नाटकामुळे. त्यामुळे त्या नाटकाचे प्रयोग पहिली तीन वर्षे तुरळक होत असत. मॉलिअर यांनी संहितेत फेरफार १६६७ मध्ये केले – मूळ तीन अंकी असलेले नाटक पाच अंकी केले. कर्वे यांनी रूपांतर केले ते त्या दुसºया संहितेचे असावे असे दिसून येते.

या नाटकात केंद्रीय भूमिकेत एक गुरू आहे. एका सुखवस्तू जमीनदाराने त्याला त्याच्या घरी आणून बसवले आहे. जमीनदाराला सुस्वरूप अशी दुसरेपणावर आलेली बायको आणि पहिल्या बायकोची दोन मुले आहेत. जमीनदाराने त्यांपैकी त्याच्या मुलीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून देण्याचे वचन दिले होते, परंतु तो गुरूच्या नादी लागल्यावर त्याने त्याचे वचन बदलून तिचे लग्न गुरूशी लावून देण्याचा निर्णय जाहीर केला. मुलगी त्यासाठी अर्थातच तयार होत नाही, परंतु त्याच वेळी तिच्यात वडिलांच्या विरोधात जाण्याचे बळही नसते; पण घरची मोलकरीण जमीनदाराची कानउघाडणी करते, इतरही लोक तसा प्रयत्न करतात; पण व्यर्थ. गुरू जमीनदाराच्या पत्नीवरच नजर ठेवून असतो. पत्नी त्याचा पदार्फाश करते. जमीनदाराला त्याची चूक कळते; पण त्यासाठी फार उशीर झालेला असतो. कारण पर्दाफाश होण्यापूर्वीच, जमीनदाराने त्याची सर्व संपत्ती – घरासकट गुरूच्या नावे केलेली असते. गुरू जमीनदाराला घराबाहेर काढण्यासाठी बेलीफ आणतो. जमीनदाराने गुरूच्या हाती विश्वासाने एक कागद सोपवलेला असतो त्यावरून जमीनदाराचे संबंध बंडखोरांशी आहेत, असे राजाला वाटते (तो कागद गुरूनेच राजाला दिलेला असतो.) त्यामुळे शिपाई जमीनदाराला अटक करण्यास येतात. अखेर चमत्कार व्हावा तसे गुरूचे खरे रूप उघडकीला आल्याने राजा जमीनदाराची सुटका, त्याची अगोदरची राजनिष्ठा लक्षात घेऊन करतो. म्हणजे जे नाटक शोकांतिका होणे स्वाभाविक असे वाटते ते सुखांत होते.

अर्थात कर्वे यांना तो अनपेक्षित शेवट पटला होता की नाही, ते सांगता येणार नाही. तो त्यांनी स्वीकारला हे महत्त्वाचे. त्याच प्रमाणे त्यांनी मूळ नाटकाचे रूपांतर करताना शब्द इतके नेमके वापरले आहेत की, नाटक पाच अंकी असूनही कंटाळवाणे होत नाही. मोलकरणीने जमीनदाराचे मन वळवण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. तसेच, तिने जमीनदाराची मुलगी व तिचा प्रियकर यांचे मिलन घडवून आणण्यासाठी योजलेले स्वभावस्वरूपाचे ज्ञान लक्षणीय आहे. मूळ इंग्रजी संहिता वाचली की, कर्वे यांचे रूपांतराचे कौशल्य समजून येते. भाषेवरचे प्रभुत्व जाणवते. मूळ नाटकात असलेली जमीनदाराची आई, तीही गुरूचा पक्ष धरणारी रूपांतरातही आहे. तिचे मतपरिवर्तन जरा अचानकच झाले आहे, असे दिसते; पण त्याला रूपांतरकाराचा नाईलाज होता. रूपांतराचा एक उत्तम आविष्कार असे या नाटकाचे वर्णन करता येईल; पण रुपांतरित नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केलेला आहे. १८० वर्षांच्या या इतिहासात सातत्याने परकीय भाषांमधील रूपांतरित, अनुवादित नाटके मराठी रंगभूमीने स्वीकारलेली आहेत, हे महत्त्वाचे. याला सांस्कृतिक देवाण-घेवाण म्हणतात; पण तरीही मराठी रंगभूमीने आपला असा एक ठसा कायम ठेवलेला आहे.

– प्रफुल्ल फडके/तिसरी घंटा

9152448055\\

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी