Tuesday, February 3, 2026
spot_img

तमाशाप्रधान चित्रपटांचा बादशहा अनंत माने

     मराठी चित्रपटसृष्टीतील तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास, साठ आणि सत्तरचे दशक ओळखले जाते. हा काळ खर्‍या अर्थाने गाजवला तो अनंत माने यांनी. त्या काळात ऐतिहासिक चित्रपट काढण्यात भालजी पेंढारकर, सामाजीक चित्रपटात व्ही शांताराम, राजा परांजपे आदी निर्माते दिग्दर्शक आघाडीवर होते. तर तमाशाची पंढरी सांभाळली तरी अनंत माने यांनी. त्यामुळे मराठी चित्रपटांना ग्रामीण प्रेक्षक दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचे काम अनंत माने यांनी केले होते.

या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर चित्रपट रसिकांसमोर सादर केले. विशेष म्हणजे वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत.
दिग्दर्शक अनंत माने यांनीच निर्मित केलेल्या सांगत्ये ऐका, या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवला होता. अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. त्या चित्रपटाला ’चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान’ असे मानतात. इतक्या महान दिग्दर्शकाचा आज जन्मदिवस आहे. मराठी ग्रामीण प्रेक्षकांची नाडी समजलेला हा दिग्दर्शक मराठी चित्रपटाला समृद्ध बनवून गेला.
तमाशापट काढणारे अनंत माने असा शिक्का त्यांना बसला. तमाशाप्रधान चित्रपट म्हटले की अनंत मानेंना पर्याय नाही हेच समिकरण बनले होते. मराठी चित्रपटात अनेक लाटा आल्या होत्या. म्हणजे विनोदी चित्रपटांची लाट, रडुबाई कौटुंबिक चित्रपटांची लाट. पण या लाटात सर्वात मोठी त्सुनामीसारखी लाट निर्माण केली ती तमाशाप्रधान चित्रपटांची लाट, त्याचे श्रेय अनंत मानेंनाच जाते. त्यांनी उत्कृष्ट तमाशापट तर दिलेच पण मराठमोळा तमाशा रजतपटावर आणून त्यांनी या अस्सल मराठी मनोरंजनाला एक दर्जा प्राप्त करुन दिला.
तमाशापटांचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असल तरी त्यांनी आपल्यातील वैविध्य कायम दाखवून दिले होते. पौराणिक, ग्रामीण, संतपट, ऐतिहासिक, शाहिरांच्या जीवनावरील, सामाजिक विनोदी चित्रपटही त्यांनी निर्माण केले.
कोल्हापूरच्या मराठी मातीचा गंध घेऊन अनंत माने जन्मले. तो दिवस होता आजचाच म्हणजे 22 सप्टेंबर 1915 हा. त्यांचे काका ज्ञानोबा माने हे पैलवान या नावाने ओळखले जात. ते ‘प्रभात फिल्म कंपनी’त नट म्हणून काम करत. त्यांच्याबरोबर बाल अनंता बर्याचवेळा स्टुडिओत जाई. तिथले मोहमयी वातावरण पाहून त्यालाही आपण सिनेमात जाऊन नट व्हावे असं वाटे. सातवीची परीक्षा देण्यापूर्वीच आपल्या काकांबरोबर एक दिवस तेे ‘प्रभात’मध्ये जाऊन तिथे काम करू लागले. तिथे रसायन खात्यात हरकाम्या म्हणून त्यानी आपल्या उमेदवारीला सुरुवात केली. तो काळ होता 1930 चा. त्यावेळी ‘प्रभात’मध्ये व्हेअर इज बॉम्बे हा मूकपट तयार होत होता.
रसायन खात्यात त्यावेळी फिल्मवरील सर्व रासायनिक प्रक्रिया म्हणजे फिल्म धुणे व वाळवणे हे सारं हातानेच करावं लागे. त्याकरिता पन्नास गॅलनच्या आठ टाक्यात पाणी वाहून भरावे लागे. तसेच तापमानासाठी पहाटे शंभर पौंडी बर्फाच्या दहा लाद्या फोडून ते बर्फ टाकीतील पाण्यात टाकावे लागे. तशा पाण्यात आठ आठ तास उभे राहून फिल्म धुण्याचे काम करावे लागे. अनंत माने ही सारी कामे कमीपणाची न मानता मनापासून करीत असत. कारण चित्रसृष्टीने त्याला झपाटून टाकले होते. सुरुवातीची दीड वर्षे बिनपगारी काढल्यावर त्याला पुढे दरमहा दहा रुपये पगार मिळू लागला. ‘प्रभात’मध्ये त्यावेळी सर्वच खात्यांमध्ये सर्वांना काम करावे लागे. संकलन, छायाचित्रण, ध्यनिमुद्रण या सर्व खात्यातून वावरताना अनंत मानेंच्या व्यक्तिमत्वात कलात्मकतेचे अंकुर फूटू लागले. योगायोगाने लवकरच ‘नट’ होण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली. ती म्हणजे भारतातल्या पहिल्यावहिल्या ‘सैरन्ध्री’ या रंगीत चित्रपटात अनंत मानेंनी विष्णूची भूमिका केली.
1933 साली ‘प्रभात’चे कोल्हापूरहून पुण्याला स्थलांतर झाले. काकांबरोबर अनंत मानेही पुण्याला आले. शांतारामबापूंच्या कलात्मक व तांत्रिक ज्ञानाचा अनंत मानेंवर एवढा जबरदस्त पगडा होता की त्यांनी त्यांना विनंती करून जिथे दिग्दर्शनाचा श्रीगणेशा गिरवता येतो त्या संकलन खात्यात बदली करून घेतली. वर्षभरात त्यांनी संकलनाची सारी तांत्रिक अंग आत्मसात करून शांतारामबापूचा विश्वास संपादन केला.
‘आल्हाद चित्र’च्या बाळा जो जो रेच्या वेळी अनंत माने आणि ग. दि. माडगूळकर यांच्यात अंगाई गीतावरून खटका उडाला. माडगूळकरांनी लिहिलेले अंगाई गीत ऐकून माने म्हणाले, ‘तुमचे गीत साहित्याच्या दृष्टीने उत्तम आहे. पण सामान्य प्रेक्षकांना ते बोजड होईल. तुमचं गीत घराघरातून प्रत्येक स्त्रीने म्हटले पाहिजे किंबहुना घरकाम करणार्‍या मोलकरणीच्यासुद्धा ते तोंडात बसले पाहिजे.’ यावर माडगूळकर मान्यांवर भडकले व गीताचा कागद टराटरा फाडून त्यांच्या अंगावर फेकत म्हणाले, ‘मी हे तुमचे गीत लिहिणार नाही.’ यावर माने खोलीतून निघून गेले. थोडा वेळ गेल्यावर माडगूळकरांनी मान्यांना हाक मारली व म्हणाले, ‘या बसा’ आणि नवीन लिहिलेले अंगाई गीत त्यांनी ऐकवले. हे गीत होतं-
..बाळा जो जो रे पापणीच्या पंखात झोपू दे, डोळ्यांची पाखरे.. हे गाणं ऐकून मान्यांचा चेहरा खुलला. माडगूळकरही खूष होऊन म्हणाले, ‘कसं आहे?’ माने म्हणाले, ‘एकदम बेस्ट!’ पुढं हे अंगाई गीत विलक्षण लोकप्रिय झाले. माने-माडगूळकर यांची तर तेव्हापासून गट्टीच जमली, ‘आल्हाद चित्र’ने चार वर्षे अतिशय उत्तम चित्रपट निर्माण केले. व्ही शांताराम यांनी पिंजराची निर्मिती केली आणि तो व्ही शांताराम यांचा चित्रपट असला तरी त्याची सगळी जबाबदारी ही अनंत मानेंचीच होती. त्यातला तमाशा, ठसका यावर स्पष्टपणे अनंत मानेंची छाप दिसून आली होती. मराठी चित्रपटसृष्टीतील तमाशाचा बादशहा असा नावलौकीक मिळवलेले अनंत माने 1995 साली हे जग सोडून गेले, पण त्यांचे चित्रपट आजही तितक्याच आवडीने सगळेजण पहात असतात. त्यांच्या चित्रपटातील गाणी अजरामर आहेत.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी