Thursday, February 5, 2026
spot_img

तांबूलदान, तांबूल सेवन

आपल्याकडे कोणत्याही धार्मिक विधीमध्ये, पूजेमध्ये विड्याच्या पानांचे महत्त्व खूप आहे. कोणत्याही देवाला गेल्यावर तुळजापूर, अंबाजोगाई या देवी मंदिरातून आपल्याला तांबुलाचा प्रसाद मिळतो. हा विडा, तांबुलदान, तांबूल सेवन याचे आपल्याकडे फार महत्त्व आहे. असे म्हणतात की, पूर्ण जेवण देण्याइतके पुण्य नुस्त्या विड्याने मिळते. पान, विडा, तांबूल अशी वेगवेगळी नावे असली, तरी त्याचा आपल्या जीवनाशी, संस्कृतीशी, धर्माशी, इतिहासाशी फार जवळचा सातत्यपूर्ण असा संबंध आहे.

नागवेलीच्या म्हणजे विड्याच्या पानाचा विडा. नागवेलीची पाने, चुना, कात, सुपारी, वेलदोडा, जायपत्री, कस्तुरी, कापूर, कंकोळ, लवंग इ. तांबुलाची घटकद्रव्ये असतात. तरी साधारणत: पहिले तीन-चार पदार्थ सर्वसामान्य जनता वापरते.

ज्या नागवेलीपासून रुचकर पाने मिळतात, त्या वेलीस स्कंदपुराणात अमृतोद्‌भव असे म्हटले आहे. तांबुलसेवनाची प्रथा भारतात दोन हजार वर्षांपासून रूढ असल्याचे सांगण्यात येते. आयुर्वेदाच्या चरक संहिता, सुश्रुत संहिता आदी ग्रंथांत तांबुलाचे गुणधर्म सांगितले आहेत; पण ही प्रथा गुप्त कालात ३२१ ते ५५० जावा, सुमात्रा इ. आग्नेयकडील द्वीपांतून भारतात आली असावी, असे कित्येकांचे मत आहे.

तांबूल हा शब्द आॅस्ट्रो-आशियाई भाषासमुहातील समजला जात असल्यामुळे या मतास दुजोरा मिळतो. मांदसरच्या (मंदसौर) रेशमी विणकरांच्या इ. स. ४७३च्या कोरीव लेखावरून हेच दिसून येते. इसवी सनाच्या थोड्या पूर्वी किंवा आरंभकाळी दक्षिण भारतात तांबुलाचा वापर सुरू झाला असावा व तेथून तो उत्तरेकडे प्रसृत झाला असावा, असे डॉ. पां. वा. काणे यांनी आपल्या संशोधनात म्हटले होते.

वात्स्यायनाचे कामसूत्र, वराहमिहिराची बृहत्संहिता या जुन्या वाङ्‌मयात जो तांबूल विषयक उल्लेख आला आहे, त्यावरून तांबूल सेवनाची प्रथा खास करून भारतीयच दिसते. भारताप्रमाणे जावा, सुमात्रा, मलाया, मालदीव, निकोबार, दक्षिण अरबस्तान या प्रदेशातही प्राचीन काळापासून तांबूल सेवनाची प्रथा दिसून येते. पाश्चिमात्य देशांत, विशेषत: यूरोप-अमेरिकेत ही प्रथा दिसून येत नाही.

तांबूल हा किंचित तिखट, कडवट, उष्ण, मधुर, खारट, तुरट, वातकफहारक, दुर्गंधीनाशक, उद्दीपक, सुगंधी, सौंदर्यवर्धक व मुखशुद्धीकारक आहे. त्यास रसिकतेचे तसेच मंगलतेचेही प्रतीक मानण्यात येते. लग्नादी समारंभात पानसुपारी देण्याचा प्रघात आहे. सन्मान वा स्वागत करताना किंवा निरोप देतेवेळीही तांबूल देण्याचा शिष्टाचार आहे. एखादी गोष्ट पैजेने करण्याचा निर्धार व्यक्त करण्याकरिता विडा उचलण्यास शपथ घेण्याइतकेच महत्त्व आहे. पितरांना द्यावयाच्या पिंडांना अक्षता, गंध, पुष्पादीबरोबरच पानाचा विडा देणेही धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. तांबुलाचा समावेश आठ भोगांमध्ये केला आहे. पूर्वी राजा-महाराजांकडून विडा मिळणे बहुमानाचे समजण्यात येई. नियमित पण मर्यादित स्वरूपात केलेले तांबूल सेवन आरोग्याला हितावह असते.

अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, तसेच तांबुलाचे अतिरेकी सेवन हे इतर अतिरेकी सेवनासारखेच हानिकारक आहे. पानाबरोबर तंबाखू खाणाºयाला बहुधा हे अतिसेवनाचे व्यसन जडते. त्यातून मग नाना प्रकारचे रोग निर्माण होणे शक्य असते. तांबूल खाऊन कोठेही थुंकण्याने रस्ते, चांगल्या इमारतींच्या भिंती, सार्वजनिक ठिकाणी घाण केली जाते. थुंकण्याची आवश्यकता पडल्यास पिकदाणीचा उपयोग करण्यात येतो वा यावा. सार्वजनिक जागेवर पिंक टाकणे अनिष्ट आहे.

खरंतर तांबूल केव्हा सेवन करावा, याचेही संकेत आहेत. प्रात:काळी, जेवल्यानंतर, स्त्री समागमाच्या पूर्वी व शेवटी, त्याचप्रमाणे विद्वत्‌सभेत व राजसभेत तांबूल सेवन करण्याचा संकेत आहे. झोपेतून उठल्यावर, जेवणानंतर, स्नानानंतर, ओकारीनंतर पान खाणे हितावह असते, असे वाग्भटाचे म्हणणे आहे. व्रतस्थाच्या जीवनात तांबूल सेवन निषिद्ध मानण्यात आले आहे. स्मृतिप्रकाश या धार्मिक ग्रंथात यती, ब्रह्मचारी, विधवा, रजस्वला यांनी तांबूल किंवा तांबूलसंबंधी कोणतेही पदार्थ म्हणजे सुपारी सेवन करणे, निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. उपवासाच्या दिवशीही तांबूल सेवन वर्ज्य मानण्यात येते.

भारतात विभिन्न भागांत निरनिराळ्या प्रकारची विड्याची पाने आढळतात. त्यांपैकी काही कडक वा मऊ, लहान वा मोठी, रुक्ष किंवा बेचव, नरम किंवा लवचिक असतात. चवीलाही ती भिन्नभिन्न असतात. औषधी गुणधर्मांच्या दृष्टीनेही त्यांच्यात भिन्नता असते. गोविंद विडा किंवा त्रयोदशगुणी विडा प्रसिद्ध आहे. देश, गंध इत्यादींवरून त्यांचे गुणधर्म दाखविणारी नावेही प्रचलित आहेत, उदा. बंगाली, रामटेकी, बनारसी, जगन्नाथी सांची, कपुरी, मालवी, मद्रासी, मगही, मंगेरी इत्यादी.

पानाचा भारतात होत असलेला वापर आणि त्याला दैनंदिन जीवनात प्राप्त झालेले महत्त्व यामुळे तांबूल सेवन हे भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण अंग झाले आहे. आपल्याकडे अनेक चित्रपट गीतांमध्येही पानाचा उल्लेख आहे. खैके पान बनारसवाला, पान खायो सय्या हमारा…अशी असंख्य गाणी लोकप्रिय आहेत. पण पान किंवा तांबूल हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे.

धार्मिक ठिकाणी म्हणजे देवस्थानाच्या ठिकाणी वाहिलेले विडे हे प्रसाद म्हणून देताना ते कुटून भाविकांना वाटले जातात. आपल्याकडच्या बहुतेक देवीच्या मंदिरात, साडेतीन पिठांच्या मंदिरात असा तांबुलाचा प्रसाद भाविक मोठ्या श्रद्धेने घेत असतात.

प्रफुल्ल फडके/ संस्कृती

9152448055\\

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी