Sunday, February 1, 2026
spot_img

अपोलो

काही शब्द आपण अनेकवेळा ऐकतो, वाचतो, बोलतो. आपल्या भाषेत ते रुळलेलेअसतात. ते आपण सतत उच्चारतही असतो. पण त्याचा आपल्याला नेमका अर्थ माहिती नसतो. तो शब्द कुठून आला हे आपण समजत नाही. अशापैकीच एक शब्द म्हणजे अपोलो. अपोलोबंदर, अपोलो11, अपोलो सिनेमा ही नावे आपल्या ओळखीची आहेत. पुण्यातले अपोलोटॉकीजमध्ये अनेक चित्रपट पाहिले असतील पण अपोला म्हणजे काय? चांद्रयान मोहिमेला अपोलो हे नाव दिले होते पण आपल्याला प्रश्न कधी पडला नाही की अपोलो म्हणजे काय? म्हणूनच अशा या अपोलोचा अर्थ आपण समजावून घेणार आहोत.

आपल्याकडे माणसाला असो वा संस्थेला देवदेवतांची नावे देण्याची प्रथा आहे. अशाचा नावापैकी एक म्हणजे अपोलो. अपोलो हा ग्रीक देवतांपैकी महत्त्वाचा आणि प्रसिद्ध देव मानला जातो. तो ज्यूस आणि लेटो यांचा डीलोस येथे जन्माला आलेला पुत्र होता. ज्यूसच्या पत्नीचा संशयी, मत्सरी आणि संतापी स्वभाव माहीत असल्याने त्याचे अपत्य पोटात असताना लेटोला आश्रय देण्यास कोणतीही भूमी तयार नव्हती. शेवटी तिला ओर्टिजिया नावाच्या प्रवाही बेटावर आश्रय मिळाला. त्याच बेटाला पुढे डेलोस असे नाव मिळाले.

आर्टेमिस या अपोलोच्या बहिणीच्या जन्मानंतर ते बेट स्थिर झाले. आर्टेमिस ही स्त्री शिकारी देवी त्याची जुळी बहीण आहे. तिनेच स्वत:चा जन्म झाल्यानंतर लेटोला अपोलोला जन्म देण्यासाठी मदत केली. अपोलोचे पोषण अमृतावर झाले आणि जन्म झाल्यानंतर लगेचच तो वाढू लागला व बाल्यावस्थेतून यौवनावस्थेला प्राप्त झाला. त्यानंतर त्याने आपल्या मातेला त्रास देणार्‍या पायथॉनला डेल्फी येथे ठार मारले. या कामामध्ये हेपेस्टस या धातुशास्त्रामध्ये प्रवीण असलेल्या देवाने त्याला शस्त्रे पुरविली. अपोलो आणि पायथॉन यांच्यातील या नाट्यमय संघषार्चे स्मरण पुढील काळात सेप्टेरिआ हा उत्सव साजरा करून जागविले जाई. या युद्धानंतर ज्यूसने अपोलोला शुद्धीकरणासाठी पाठविले. जिथून परतल्यावर त्याने डेल्फीमधील प्रार्थनास्थळावर जम बसविला.

ग्रीक पुराणकथाशास्त्रात डेल्फी येथील अपोलोशी संबंधित भविष्यसूचनाचा अनेकदा उल्लेख येतो. डेल्फी येथील अपोलो, सर्वतोपरी साहाय्यकर्ता असून, तो देवता आणि मानव यांच्यातील दुवा मानला गेला आहे. अगदी स्वजनांच्या रुधिराने कलंकित झालेल्यांनादेखील तो पावन करतो.

इतर ग्रीक देवांप्रमाणे याचेही अनेक स्त्रियांवर प्रेम होते. त्या सर्व स्त्रिया काही राजी नव्हत्या. त्यांपैकी डॅफने ही अप्सरा, कोरोनिस, प्रिअम राजाची कन्या कॅसेण्ड्रा तसेच क्रीनी नावाची आणखी एक अप्सरा या महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यापासून अपोलोला अपत्यप्राप्तीही झाली.

कोरोनिसपासून झालेला अ‍ॅस्क्लेपिअस नावाचा पुत्र पुढे वैद्यक विद्येचा अधिष्ठाता दैवत मानला गेला, तर क्रीनी या अप्सरेपासून अपोलोला झालेला अ‍ॅरिस्टेअस हा पुत्र पशू आणि शेतीबरोबरच विशेषकरून मधुमक्षिकापालनाचा रक्षक समजला जातो.

अपोलो हा काव्य, संगीत, धनुर्विद्या, ज्योतिषविद्या आणि औषधविद्या या शास्त्रांशी संबंधित आहे. तसेच हा देव पशू तसेच शेती यांच्या सुरक्षेची काळजी वाहतो. काही विद्वानांच्या मते अपोलो हे हेलिओस या सूर्यदेवाचे रूप असून, उत्तर ग्रीकमधील पशुपालक देवतेशी त्याचे एकीकरण झाले असावे. डॉल्फीन मासा आणि कावळा हे त्याच्याशी संलग्न केले आहेत. तसेच लॉरेल हा वृक्ष त्याचे प्रतीक मानला जातो.

सौंदयार्चे प्रतीक मानला गेलेला अपोलो हा ग्रीक देव चिरंतन यौवनात असल्याचे वर्णन येते. सोन्याच्या तंतुवाद्यावर वादन करून मने रिझवणारा, रुप्याचे धनुष्य असणारा, विवेकाचे व न्यायाचेही प्रतीक आहे. तसेच धार्मिक आणि नागरी कायद्याचा अधिष्ठाता दैवत आहे. अपोलो रोगनिवारणाची विद्या जाणणारा आणि ती लोकांनाही शिकवणारा देव आहे. अंधाराचा स्पर्शही नसणारा प्रकाशाचा आणि म्हणूनच सत्याचा दैवत मानला जातो. अपोलोचे व्यक्तिमत्त्व अत्यंत लोभस तसेच गुंतागुंतीचे असल्याने अपोलो हा चित्रकार तसेच मूर्तिकारांचा अतिशय आवडता विषय आहे.

कलाप्रांतात अनेक वास्तूंना त्यासाठीच अपोलोचे ना ंव दिलेलेआढळते. अपोलो अकरा या यानाने पहिली चांद्रयान मोहिम यशस्वी केली होती. अपोलो हॉस्पिटल, अपोलो टायर अशा अनेक संस्थांना आपण अपोलो या नावाने ओळखतो. पण हा मूळ शब्द कुठून आला हे आपल्याला माहिती नसते. आपल्याकडे देवी देवतांची नावे दुकाने, आॅफीस, कारखाने, विविध संस्थांना देण्याची प्रथा आहे तशी ती जगभरात आहे. बाहेरच्या देशातील या देवदेवतांच्या नावांपैकीच हे एक नाव आहे.

प्रफुल्ल फडके/ संस्कृती

9152448055

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी