Tuesday, April 29, 2025
spot_img

निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी

 

प्रस्थापित मान्यता प्राप्त शिक्षण नसतानाही निसर्गाने दिलेल्या शिक्षणाचा आपल्या कवितेतून अविष्कार दाखवणाºया कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. म्हणूनच त्यांना निसर्गकन्या असेच म्हटले जाते. आपल्या चार ओळीतील कडव्यातून जीवनाचा सिद्धांत सांगण्याची ताकद ज्या कवितेत आहे ती कविता बहिणाबार्इंची. त्यामुळे स्वत: शिकलेल्या नसतानाही आज बहिणाबार्इंच्या कवितांवर अनेकांनी पीएचडी केलेली दिसते, ही निसर्गाची देणगी होती की चमत्कार? अशा या बहिणाबार्इंची आज पुण्यतिथी आहे.

बहिणाबार्इंचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदेया गावी झाला. माहेरच्या त्या महाजन होत्या. तत्कालीन प्रथेप्रमाणे बालवयातच म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबार्इंचा विवाह झाला. नथुजी आणि बहिणाबार्इंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमचे अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबार्इंना वैधव्य आले. बहिणाबार्इंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबार्इंचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर, १९५१ रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे लेवा गणबोलीतील ओव्या व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. बहिणाबार्इंनी ज्या वस्तूंवर काम करता करता या कविता लिहिल्या आहेत. त्यातल्या काही वस्तू, तसेच त्यांचे घर बहिणाबार्इंचा मुलगा (ओंकार चौधरी) यांच्या सुनबाई पद्‌माबाई पांडुरंग चौधरी (बहिणाबार्इंच्या नातसून) यांनी जिवापाड जतन करून ठेवलेल्या आहेत.

आज जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबार्इंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट, असे नाव देण्यात आले आहे. आज बहिणाबार्इंच्या रोजच्या वापरातली शेतीची अवजारे, स्वयंपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचे साहित्य यांची जपवणूक होत आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे. अरे संसार संसार, म्हणत संसारातील सुख-दु:खांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबार्इंच्या वस्तूंचे, आठवणींचेच संग्रहालय नाही, तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाºया, कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा आहे. जळगावात जेव्हा लेखक कवी येतात, तेव्हा ते आवर्जून या वाड्याचे दर्शन घेतात. बहिणाबार्इंच्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकवतात, धन्य होतात आणि मनोमन बहिणाबार्इंशी नातं जोडतात. त्यांच्या याच आठवणी चिरकाल टिकतील हेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने पहावे, असे आहे हे बहिणाबार्इंचे संग्रहालय.

बहिणाबाई चौधरींच्या नावावरूनच जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, असे ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबार्इंचे पुत्र. बहिणाबार्इंच्या मृत्यूनंतर बहिणाबार्इंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबार्इंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, अहो हे तर बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबार्इंची गाणी १९५२मध्ये प्रकाशित झाली आणि धरत्रीच्या आरशामधी सरग (स्वर्ग) पाहणाºया या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. या काव्यसंग्रहात बहिणाबार्इंच्या फक्त ३५ कविता आहेत, परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखननिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबार्इंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.

बहिणाबार्इंच्या कविता खान्देशातील त्यांच्या मातृबोलीत, रचलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी अशा कृषी जीवनातील विविध प्रसंग, अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे, काही परिचित व्यक्ती, असे आहेत. लेवा गणबोली (खान्देशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे. खान्देशातील आसोदे हे बहिणाबार्इंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खान्देशी/लेवा गणबोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकºयांची सुख-दु:खे, त्यातले चढ-उतार, झाडे, प्राणी, निसर्ग – या साºयांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मियता होती, असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.

तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुख-दु:खांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. मृत्यूचे किती सहज वर्णन बहिणाबार्इंनी केलेले आहे, म्हणजेच अगदी सहजपणे त्या बोलून गेल्या आहेत की, आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर! त्याचप्रमाणे एका साधूच्या प्रश्नाला उत्तर देताना बहिणाबाई सांगतात की, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदत, म्हणजे अगदी किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द म्हणजे बहिणाबार्इंची कविता. अरे संसार-संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके – तव्हा मीयते (मिळते) भाकर. किती सहजपणे येणारे हे गीत आहे, पण त्याचा मतीतार्थ कसला जबरदस्त आहे. देव कुठे देव कुठे – आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे – तुज्या बुबुयामझार. अत्यंत अवघड तत्त्वज्ञान किती सोप्या भाषेत त्यांनी सांगून टाकले आहे. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत. हे फार कमी जणांना जमू शकते.

कोणत्याही वयाच्या माणसाला आवडतील, अशा कवितांची निर्मिती बहिणाबार्इंनी केलेली होती. निसर्गाने दिलेल्या शक्तीचा अफाट ताकदीने वापर करून या निसर्गकन्येने मराठी साहित्याला अक्षरश: वेड लावले आहे.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी