Sunday, February 1, 2026
spot_img

तडजोडीचा संसार गोडीचा

संसार म्हणजे तडजोड ही आलीच. प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल, असे नाही. त्या तडजोडीच्या खेळालाच तर संसार म्हणतात. ज्याला तडजोड करता येते त्याचा संसार सुखाचा. तडजोड करायची नसेल, तर काडीमोड नक्की होणार. भोंडल्याच्या आतापर्यंतच्या गाण्यांमधून भांडणं, रुसवेफुगवे, कुरघोड्या, बंडखोरी पाहिली; पण ही बंडखोरी कुठपर्यंत? तर चूक समजेपर्यंत. एकदा चूक समजली की, ती दुरुस्त करता येते आणि त्यातून नवनिर्मिती होते. हेच सांगणारे हे आहे पुढचे भोंडला गीत. ते म्हणजे हरीच्या नैवेद्याला.
या गीतात म्हटले आहे,
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली।
त्यातलं उरलं पीठ त्याचं केलं थालीपीठ।।
नेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली।
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली।।
त्यातलं उरलं दही त्याचं केलं श्रीखंड बाई।
नेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली।।
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली।
त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभात।।
नेऊनी वाढला पानात, जिलबी बिघडली।
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली।।
त्यातलं उरलं थोडं तूप त्याच्या केल्या पुºया छान।
नेऊनी वाढल्या पानात, जिलबी बिघडली।।
देवासाठी काही केलं आणि ते बिघडलं म्हणून काही बिघडत नसते, त्यातला भाव महत्त्वाचा असतो. त्यामुळे देव ते कसेही असले, तरी गोड मानूनच घेतो. त्याचा तर हा आवडीचा खेळ. म्हणून सासरी त्या सासुरवाशिणीला हरीच्या नैवेद्याला जिलबी कर म्हणून सांगितले; पण जिलेबी करणं तसे सोपे नसते. त्याचे पीठ चांगले भिजावे लागते, ते आंबावे लागते, त्याची छान तार आली तरच ती तळणीसाठी सोडता येतात. नाहीतर जिलेबी बिघडणार हे नक्कीच. जिलेबी करणं हे काही येरागबाळ्यांचे काम नव्हे; पण सासूने सांगितली, म्हणून तिने जिलेबी करण्याचा प्रयत्न केला.
पण जिलेबी बिघडली; पण म्हणून सासू रागावली नाही, इथे तर तिला याची तडजोड कशी करायची हे सांगितलं. हाच भोंडल्यातील गोडवा आहे. जिलेबीचं पीठ बिघडलं, त्यामुळे जिलेबी काही होईना; पण त्याचे थालीपीठ करून खमंगपणे वाढण्याचेकाम इथे केले जाते. आता खरंतर थालीपीठापेक्षा त्याची चांगली धिरडी होतील; पण या गाण्यात त्या बिघडलेल्या जिलेबीची भजी न करता थालीपीठाची तडजोड केली जाते.
हे पीठ भिजवण्यासाठी दही लागते. त्यातलं दही उरलं, म्हणून त्या दह्याचे चक्क श्रीखंड केलं आणि जिलबी बिघडली, तर गोड म्हणून श्रीखंडाने बाजू सावरून घेतली; पण खंत मनात राहिलीच की, जिलेबी बिघडली. एक अंदाज चुकला की, सगळं बिघडतं; पण त्यातून दहा नवे पदार्थ होतात, हे या गाण्यातून शिकता येते. जिलेबी नाही तर थालीपीठ झालं. त्यातून श्रीखंड बनवता आलं. ही तडजोडही आनंददायी आहे. जमलं नाही, म्हणून ते फेकून दिलं असं नाही इथं घडत, म्हणूनच हे गाणं तडजोडी शिकवणारं आहे.
जिलेबी तळून झाली की, ती लगेच पाकात टाकायची. यासाठी पाक आधीच करून ठेवला होता; पण जिलेबी न जमल्याने पाक शिल्लक राहिला. त्या पाकाचा वापर साखरभातासाठी केला आणि नवे पकवान्न तयार झाले. एक बिघडलं, तर चार घडतं हे लक्षात आणून देणारे हे गीत आहे. ही जिलेबी तुपात तळायची होती. आता ते तूप उरलं तर काय करायचं? मग त्या तुपात पुºया तळून घेतल्या आणि छान श्रीखंड पुरी, थालीपीठ, साखरभात असा बेत झाला. चौरस आहार तयार झाला. त्यामुळे बिघडलं, म्हणून रडत न बसता त्या बिघडण्यातून सावरायचं कसं हे शिकवणारं हे गाणं आहे.
शेवटी लग्नात मंगलाष्टकातच म्हटलेआहे की, ‘भार्येने पतीच्या सुखास जपणे,कर्तव्य आहे तिचे। तैसेही पतीने तिला सहचरी समजोनी वागायचे।। संसारी तडजोड ही करूनीया मतभेद दुरी करा।। क्रोधा काबुमध्ये सदैव असुद्या होवो सदा मंगलम्।। हे या मंगलमय संसाराचे सार आहे. ती तडजोड शिकवणारे हे गाणे म्हणजे हरीच्या नैवेद्याला केली जिलेबी बिघडली.
प्रफुल्ल फडके/ जागर

आणखी वाचा

5 COMMENTS

  1. Heard some buzz about 6789club. Had a look, and it’s not bad! They’ve got some unique things going on. Worth poking around if you’re bored with the usual suspects. Good site all in all, here’s their link btw: 6789club.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी