Sunday, February 1, 2026
spot_img

परिपूर्ण तोरडमल

नाटकासाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट येणारे परिपूर्ण नाटककार म्हणून प्राध्यापक मधुकर तोरडमल यांचे नाव घ्यावे लागेल. रंगकर्मींमध्ये ते मामा तोरडमल म्हणून ओळखले जात. मराठी लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माता, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेता अशा सर्व अष्टपैलू गुणांनी त्यांची कुंडली परिपूर्ण होती.

मामा तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात ही मुंबईतून शाळेपासूनच झाली. तिथे त्यांच्यातील नाटककाराची बिजे रुजली होती. ते दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे काका मुंबईत सांताक्रुझ पोलीस ठाण्यात अधिकारी होते. काकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईत आणले. शेठ आनंदीलाल पोद्दार ही त्यांची शाळा. शाळेत पहिल्या दिवशी ओळख करून देताना त्यांनी नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे वर्गशिक्षिका जयकर बार्इंना सांगितले. बार्इंनी ते लक्षात ठेवून गणेशोत्सवात एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी मामांवरच सोपविली. चिं. वि. जोशी लिखित प्रतिज्ञापूर्ती हे नाटक त्यांनी बसविले. यात त्यांनी दिग्दर्शन व अभिनयही केला. पुढे शाळेचे स्नेहसंमेलन व अन्य कार्यक्रमांतून नाटक बसविण्याची जबाबदारी ओघानेच तोरडमलांकडे आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पारही पाडली.

शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मधुकर तोरडमल कुर्ला येथील प्रीमियर आॅटोमोबाइल कंपनीत काही काळ कारकून होते. त्यानंतर ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक झाले. या काळात भोवरा, सैनिक नावाचा माणूस आदी नाटके त्यांनी केली. राज्य नाट्य स्पर्धेतूनही ते सहभागी झाले. स्पर्धेत त्यांनी एक होता म्हातारा हे नाटक सादर केले होते. या नाटकात त्यांनी साकारलेल्या बळीमामा या भूमिकेमुळे त्यांना मामा ही बिरुदावली मिळाली आणि पुढे सगळेजण त्यांना मामा म्हणायला लागले आणि अवघ्या मराठी नाट्यसृष्टीचे मामा झाले.

राज्य नाट्य स्पर्धेतून नाव झाल्यामुळे व्यावसायिक रंगभूमीकडून त्यांना विचारणा होऊ लागली. प्राध्यापक म्हणून नोकरी करत असल्याने नोकरी सांभाळून ते नाटक करत होते. ही कसरत महाविद्यालयाचे प्राचार्य थॉमस यांनी पाहिली. त्यांनी तोरडमलांना व्यावसायिक रंगभूमीवर जायचे असेल तर जरूर जा. एक वर्षभर काम करून बघ. नाही जम बसला, तर पुन्हा इकडे महाविद्यालयात शिकवायला ये, असे सांगितले आणि तोरडमल मुंबईत आले आणि तिथे रंगभूमी क्षेत्रात नावलौकिक मिळवला. तोरडमलांना लोक मामा म्हणत असल्याने त्यांनी आपल्या उत्तर-आयुष्यातल्या आठवणी उत्तरमामायण नामक पुस्तकात सांगितल्या आहेत. मामांची स्वत:ची रसिकरंजन नावाची नाट्यसंस्था होती.

तोरडमलांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाचे ५००० हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल, त्या नाटकात प्रोफेसर बारटक्क्यांची भूमिका करत. एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये, पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले. समीक्षकांच्या टीकेचा फायदाच झाला. या नाटकाचे एकाच नाट्यगृहात एकाच दिवशी तीन प्रयोग झाले. ही गोष्ट त्या काळात आश्‍चर्य समजली गेली. पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी १९७२ रोजी सकाळ, दुपार, रात्र असे हे ३ प्रयोग झाले. बालगंधर्वच्या त्या प्रयोगांना येणाºया प्रत्येक पुरुष रसिकाला गुलाबाचे फूल आणि महिलांना गजरे, तसेच तीळगूळ देण्यात आला होता. सकाळच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुपारी ग. दि. माडगुळकर आणि रात्रीच्या प्रयोगाला वसंत देसाई ही दिग्गज मंडळी सहकुटुंब हजर होती. या नाटकातील मामांची ह ची बाराखडी ही हास्याचा कडेलोट करणारी होती. तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक व्यावसायिकबरोबरच हौशी रंगकर्मींनीही तुफान डोक्यावर घेतले. कित्येक वर्ष प्रत्येक केंद्रावर राज्य नाट्य स्पर्धेत हे नाटक कुठे ना कुठेतरी असायचेच. याशिवाय कामगार कल्याण, एसटी नाट्य स्पर्धा, एमएसईबी नाट्य स्पर्धा, महाविद्यालयीन गॅदरिंगमध्येही या नाटकांचे शेकडो प्रयोग झाले आणि एका अजरामर विनोदी नाटकाला एक उंची प्राप्त झाली.

आपल्या नाट्यसंस्थेबरोबरच तोरडमल यांनी नाट्यसंपदा, नाट्यमंदार, धि गोवा हिंदू असोसिएशन या आणि प्रामुख्याने चंद्रलेखाच्या नाट्यसंस्थेतर्फे सादर झालेल्या नाटकांतून कामे केली. अखेरचा सवाल, गुड बाय डॉक्टर, गोष्ट जन्मांतरीची, घरात फुलला पारिजात, चांदणे शिंपीत जा, चाफा बोलेना, बेईमान, म्हातारे अर्क बाईत गर्क आदी अनेक नाटके केली. म्हातारे अर्क बाईत गर्क हे तरुण तुर्क म्हातारे अर्क चे पुढचे पाऊल होते. सिनेमाचा सिक्वल असतो तसा नाटकाचा सिक्वल त्यांनी केला होता. विनोदी फार्सिकल नाटकाचा अशाप्रकारे सिक्वल येणे हाही चमत्कारचा होता. याशिवाय संगीत मत्स्यगंधा या नाटकात त्यांनी साकारलेला भीष्मही गाजला. याशिवाय प्रा. मधुकर तोरडमल यांनी ऋणानुबंध, किनारा, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, प्रीती परी तुजवरती, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे.

मधुकर तोरडमल यांच्या अन्य नाटकांतील भूमिकाही तुफान गाजल्या होत्या. यामध्ये आबा (बाप बिलंदर बेटा कलंदर), इंद्रसेन आंग्रे (काळे बेट लाल बत्ती), डाकू (संघर्ष), डॉक्टर (गुड बाय डॉक्टर), डॉक्टर विश्वामित्र (गोष्ट जन्मांतरीची), दीनानाथ (चांदणे शिंपीत जा), धनराज (बेईमान), प्रोफेसर (आश्चर्य नंबर दहा), प्रोफेसर बारटक्के (तरुण तुर्क म्हातारे अर्क), बहादूरसिंग (सैनिक नावाचा माणूस), बॅरिस्टर देवदत्त (अखेरचा सवाल), भीष्म (मत्स्यगंधा), मामा (सौभाग्य), रामशास्त्री (मृगतृष्णा), लाल्या (घरात फुलला पारिजात), सर्जन कामत (चाफा बोलेना) या भूमिका तुफान गाजल्या. तरीही त्यांचे स्वत:चे असलेले नाटक तरुण तुर्क म्हातारे अर्कमधील बारटक्के ही विनोदी, तर चांदणे शिंपीत जा मधील करारी भूमिकेने ते कायम लक्षात राहिले. महाराष्ट्र राज्य शासनाचा २००९-१० चा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता. रंगभूमीवर दीर्घकाळ योगदान देणारे परिपूर्ण कलाकार, सर्वगुणसंपन्न कलाकार अशी ओळख मामांनी कायम ठेवली आहे.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा

9152448055

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी