Sunday, February 1, 2026
spot_img

जागृत नाटककार प्रेमानंद गज्वी

नाटक हे माध्यम करमणुकीचे आहे. नाटक हे खोटेच असते असा नाट्यशास्त्राचा नियम आहे. तरीही त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणारे जागृत नाटककार म्हणजे प्रेमानंद गज्वी. बोधी नाट्यचळवळीचे किंवा चिंतनशिल नाटकांचे लेखक म्हणून गज्वींकडे पहावे लागते. नाटक खोटे असले तरी त्या नाटकातून दांभिकतेवर आणि माणसांच्या प्रवृत्तीतील खोटेपणाचा बुरखा फाडणारे जागृत नाटककार म्हणूनच प्रेमानंद गज्वींकडे पहावे लागेल. सिद्धहस्त आणि प्रतिभासंपन्न असलेल्या या नाटककाराने आपल्या प्रचंड निरीक्षण शक्तीने वैचारिक नाटकांची परंपरा निर्माण केली आणि अभिव्यक्तीचा खºया अर्थाने आनंद घेतला. पैसे कमावण्यासाठी नाटक लिहिले नाही तर विचार मांडण्यासाठी या माध्यमाचा वापर केला. म्हणूनच स्पर्धेसाठी अतिशय उत्तम अशा नाटक आणि एकांकिका त्यांच्या लेखणीतून निर्माण झाल्या. किरवंत वगळता कोणत्या नाटकाला व्यावसायिक यश मिळाले नाही, पण गज्वींच्या नाटकाने विचारांची दिशा देणारा प्रेक्षकवर्ग निर्माण केला, हेच त्यांचे फार मोठे यश आहे.

प्रेमानंद गज्वींची लेखनशैली ही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारी आहे. त्यांच्या घोटभर पाणी या एकांकिकेचे १४ भाषांत अनुवाद झाले आहेत. साधारणपणे वेगळे काही लिहिले की, ते वादग्रस्त ठरते. अशा वादग्रस्तपणाचा अनुभव सर्वात जास्त तेंडुलकरांनी घेतला आहे, पण प्रेमानंद गज्वी यांनी वादग्रस्त न लिहिता कटूसत्य समोर आणून आपल्या नाटकातून बंडखोरी दाखवून दिलेली आहे. किरवंतमध्ये सिद्धेश्वर शास्त्रीचा धाकटा भाऊ हे या बंडखोरीचे प्रतीक आहे. या नाटकातून गज्वींचे क्रांतिकारी बंडखोर विचार हे या भावाच्या तोंडून बाहेर पडतात. देवीच्या नावाखाली होणारे अत्याचाराविरोधात ही देवीच हटवली पाहिजे असे विचार द्रौपदीच्या माध्यमातून व्यक्त होणारा शेवट देवनवरीमध्ये केला जातो. शोषणाचे मूळ कुठे आहे ते नष्ट केले पाहिजे, हा विचार देणारी त्यांची शैली अत्यंत सुंदर अशीच आहे.

काही वर्षांपूर्वी छावणी हे प्रेमानंद गज्वी यांचे नाटक चर्चेत आले होते. या नाटकाला सेन्सार बोर्डाने सुरुवातीला परवानगी दिली नव्हती. नंतर दिली गेली. हे नाटक संविधानविरोधी आहे असा ठपका कारण नसताना या नाटकावर ठेवण्यात आला होता. त्यावर देशभर अभिव्यक्ती स्वातंत्र्य-सेन्सॉर बोर्ड या अनुषंगाने चर्चा झाली. या नाटकावर ठेवलेला हा ठपका पूर्णपणे चुकीचा होता. कारण प्रेमानंद गज्वी हे संविधान मूल्ये जगणारे आणि या मूल्यांच्या रुजवणुकीसाठी आपली लेखणी झिजवणारे चळवळीतील लेखक आहेत. त्यांच्या सर्वच नाट्यलेखनातून मानवी मूल्यांची बुज राखली गेली आहे. त्यांनी लेखनातून शोषितांची बाजू घेतली आहे. छावणी हे नाटकही त्याला अपवाद नाही. छावणीच्या निर्मितीनंतरच्या वादासंबंधी मनोगतात आवश्यक ती माहिती गज्वी यांनी दिली आहे. या नाटकातून गज्वी यांनी थेट व्यवस्थेला प्रश्न विचारलेले आहेत. विषमतामुक्तीचा आशय घेऊन सामाजिक संघर्षाचे नाट्य यातून उभे राहते. जात-वर्गातून निर्माण झालेल्या विषमतेला नाकारत सामाजिक समतेचे सूचन या नाटकातून होते. देशात सामाजिक आणि आर्थिक पातळीवरील समता निर्माण झाली नाही, तर भविष्यात अराजक निर्माण होऊ शकते, हा इशाराही हे नाटक देते. या नाटकाचे प्रयोग सर्वत्र होणे गरजेचे आहे. ते सर्व जनतेसमोर आणण्याची जबाबदारी सरासरी पातळीवर घेतली पाहिजे.

भांडवली व्यवस्थेला नकार, जातिवंताचे संसूचन, धर्म व्यवस्थेतील ढोंगीपणा, शोषण, वर्गसमूहातील वाढलेली आर्थिक विषमता आणि आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे प्रकटीकरण या महत्त्वाच्या सूत्रांना केंद्रभूत ठेवून हे नाटक आकार घेते. वर्तमान समाजात ज्या विविध समूहांच्या-गटाच्या-विचारांच्या वा इतर स्वरूपाच्या संकुचित हितवादी छावण्या आहेत. त्या छावण्यांनाही छावणीमुक्तीचा संदेश हे नाटक देते.

प्रेमानंद गज्वी यांच्या नाटकातील, एकांकिकेतील भाषा ही अत्यंत सुस्पष्ट असते. लक्षात राहील अशी प्रतिभासंपन्न असते. त्याला एकप्रकारची लय असते, गेयता असते. त्यांच्यामध्ये एक कवी आहेच. तो कवी प्रत्येक नाटकातून प्रकट होत असतोच. देवनवरीमध्ये धाव घे यल्लमापासून सुरू होणारे भजन असो की, जमदग्नी, परशुराम, रेणुका यांच्यातील संवाद हा गेयरूपाने समोर येतो आणि रेणुकेची स्थापना कशी झाली हे कथानक सांगण्यासाठी गज्वींमधला प्रतिभासंपन्न कवी दिसून येतो.

किरवंतमध्येही जन्म इथे घेता, मरण अटळ नको हळहळ जिवालागी हा संदेश देत अंत्ययात्रा निघते. तुमच्या प्रेमाचा भुकेला हा जीव नका करू कीव येता जाता हे भीषण वास्तव कवितेतून शब्दबद्ध होते तेव्हा त्यातील गांभीर्य लक्षात येते. घोटभर पाणीमध्ये साखरेचे भाव कडकडले कडकडले कडकडले, सोन्याचे भाव गडगडले गडगडले गडगडले हे जे संवाद आहेत त्यामध्ये एक प्रकारची लय आहे, बिंबवण्याची ताकद आहे. ही नाटक एकांकिका चिरंतन अशी आहे. बेरीज-वजाबाकी, पांढरे बुधवार यातूनही दांभिकतेवर दंश केलेला आहे. गहाणमध्ये वेठबिगारीचा विषय घेतला आहे. गज्वींचे मोठेपण यातच आहे की, त्यांनी किरवंतसारखे नाटक लिहिले. तसे धाडस केले आणि ते यशस्वी करून दाखवले. साधारणपणे ब्राह्मण म्हटले की तो उच्चभ्रू आला, पण ब्राह्मणांमध्येही अस्पृश्य ब्राह्मण होते हे कटूसत्य त्यांनी किरवंतमधून दाखवून दिले. अंत्येष्ठी कर्म करणारे ब्राह्मण आणि शुभकार्य करणारे ब्राह्मण यांच्यातील भेद आणि स्पृश्य-अस्पृश्यता ठळकपणे दाखवून एक फार मोठी क्रांती तीस वर्षांपूर्वी गज्वींनी केली होती. समाजातील नाटकीपणा, ढोंगीपणा शोधणारी त्यांची अभ्यासू प्रवृत्ती यातून दिसून येते आणि त्यातून त्यांच्यासारख्या नाटककाराकडून नाटक तयार होते, हे गज्वींचे खास वैशिष्ट्य आहे.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा

9152448055

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी