Friday, July 11, 2025
spot_img

चारचौघीचे वादळ

१९९० च्या दशकात मराठी रंगभूमीवर जी नाटके आली त्यात चारचौघी या नाटकाने अक्षरश: धुमाकूळ घातला. सर्व ताकदीचे कलाकार आणि त्यांनी आपल्या भूमिकांना इतक्या उंचीवर नेऊन ठेवले होते की, त्यातून निर्माण होणारा नाट्यानुभव हा प्रेक्षकांना विचार करायला लावणारा होता. या नाटकाच्या निर्मात्या लता नार्वेकर होत्या. अत्यंत स्पष्टवक्त्या आणि बंडखोर अशा स्वभावाच्या लताबार्इंनी हे नाटक रंगभूमीवर आणण्याचे धाडस केले होते, पण त्या धाडसाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

लता नार्वेकर यांच्या श्री चिंतामणी या नाट्यसंस्थेने हे नाटक रंगमंचावर आणले होते. वंदना गुप्ते, दीपा लागू अशा दिग्गज चार महिला कलाकारांची अभिनयाची जुगलबंदी या नाटकात बघताना प्रेक्षक सुखद सहजसुंदर अभिनयाची अनुभूती घेत असे. यातील वंदना गुप्तेंच्या प्रदीर्घ टेलिफोनिक संवादाची आठवण रंगभूमीच्या इतिहासात कायम राहील अशी आहे. किंबहुना तो प्रवेश अनेकांना एकपात्री अभिनयात करण्याचा मोह आवरला नव्हता. नाहीतर एकपात्री अभिनय स्पर्धा असल्या की, फुलराणीशिवाय मुलींना दुसरा संवाद सापडत नव्हता, ती उणीव या नाटकातील या प्रवेशाने भरून काढली होती. या नाटकाचे पुढे जवळपास हजाराच्या घरात प्रयोग झाले. अनेक पारितोषिकं मिळाली आणि एक वादळच निर्माण केले. नाटक बघून बाहेर जाताना प्रेक्षक विचार करत बाहेर पडायचा हेच या नाटकाचे यश होते.

चारचौघी हे नाटक कल्पनेच्या पलीकडचे होते. या नाटकानं जणू एक चळवळच उभी राहिली होती. किंबहुना चळवळीनं ते आपल्याशी जोडून घेतलं. अनेक परिसंवाद, चर्चा या नाटकावर झाल्या. म्हणूनच रंगभूमीच्या इतिहासात या नाटकाचे आकर्षण हे कायम राहणार हे नक्की.

प्रशांत दळवी या लेखकानं लिहिलेल्या नाटकाला चंद्रकांत कुलकर्णी यांनी खºया अर्थाने न्याय दिला आणि कलाकारांनी त्या परिस्पर्शाने सोने केले असे म्हणावे लागेल. म्हणजे एकीकडे दोन अंकी नाटक स्थिरावत असताना त्याच काळात पुन्हा तीन अंकी नाटक आलं होतं. अर्थात यातील प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याच्या हेतूने ती व्यापकता होती. म्हणजे चार स्त्री-व्यक्तिरेखा, त्यांच्या आयुष्यातले प्रत्यक्ष रंगमंचावर येणारे तीन पुरुष आणि विंगेतली अनेक पात्रं असा विस्तार या नाटकात होता. म्हणजे स्त्रीमुक्ती ते स्त्री-पुरुष समानतेच्या प्रवासातल्या १९९० च्या दशकात उभारत असलेल्या चळवळीतील स्त्री-व्यक्तिरेखा कळत नकळत इथं अवतरल्या होत्या.

मुख्याध्यापक असलेली एक खंबीर आई आणि याच मोकळ्या वातावरणात वाढलेल्या तिच्या तीन मुली असं हे जगावेगळं कुटुंब होतं. संपूर्ण घरात फक्त स्त्रियांचा वावर असल्यामुळे घराची रचना, मांडणी, वस्तू, फर्निचर, बसण्या-उठण्याच्या जागा यांचा वेगळा विचार करून हे नाटक उभारलं होतं. यातील दिग्दर्शकाची कमाल दिसत होती. नेपथ्य रचना तर अत्यंत प्रभावी होती. म्हणजे बैठकीची खोली आणि किचनमधली सर्व्हिस विंडो, मध्यभागी झोक्याची खुर्ची, बेडरूममधला बेड, ड्रेसिंग टेबल, साइड टेबल यांमुळे हालचाली हे अत्यंत नैसर्गिक आणि सहजपणे दिसत होतं. उलगडत जात होतं. विशेष म्हणजे या नाटकाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर पात्रांच्या विशिष्ट हालचालींसाठी त्यांना अक्षरश: सोफ्यांना टेकून कधी जमिनीवर बसवलं गेलं होतं. जसे आपण आपल्या घरात सहज वावरतो तसा प्रत्येकाचा सुंदर सहज वावर हे या नाटकाचे वैशिष्ट्य होते.

या नाटकात वंदना गुप्तेंचा फोनवरच संवाद पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा पुन्हा येत असत. वंदना गुप्तेंचा वीस मिनिटांचा एकतर्फी टेलिफोनिक संवाद.. स्वगत.. जणू एक मोठ्ठा एकपात्री प्रवेशच. अजून घटस्फोट घेतलेला नाही, परंतु विभक्त राहणाºया, दुखावलेल्या एका शिक्षित, स्वतंत्र बाण्याच्या, प्राध्यापक विद्याचा तथाकथित नवºयाबरोबरचा तो संवाद अभिनेत्री-दिग्दर्शकासाठी प्रचंड आव्हानाचा होता. तो कुठेही कंटाळवाणा होऊ न देता वंदना गुप्ते जेव्हा जीव ओतून करतात तेव्हा तो प्रवेश अविस्मरणीय असाच असायचा. भावना, विचार, आवेगाचे खूप उतार-चढाव होते, आरोप-प्रत्यारोपांची सरमिसळ होती. जेव्हा या दृश्यामध्ये विद्या फोनवर बोलते तेव्हा आई, विनी ही पात्रं संकोचून नि:शब्द होतात हे पाहणेही तितकेच सुंदर असायचे. फोनच्या एक्स्टेन्शनचा केलेला वापर ही कलात्मकता आणि दिग्दर्शकीय कौशल्य यात वापरले होते. म्हणजे अगदी नवºयाबरोबर खासगी बोलताना विद्याला बेडरूममध्ये जायला लावून तिला प्रायव्हसी देणे आणि या सगळ्या प्रचंड ताणाचा शेवट टेलिफोनची वायर तुटून निर्माण होणाºया एका पराकोटीच्या क्षणाचा अनुभव फारच सुंदर असायचा. हा प्रसंग प्रेक्षक विसरूच शकत नाहीत.

हे नाटक उभारताना लता नार्वेकरांनी आपली ताकद पणाला लावली होती. आक्रमक जाहिरातींपासून बेधडक प्रयोग लावण्यापर्यंत त्यांनी सगळी ताकद पणाला लावली. अक्षरश: अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी हे नाटक पोहोचवलं. रंगमंचावरच्या त्या चौघी खंबीर होत्याच; पण विंगेतल्या या बाईही तशाच न डगमगणाºया होत्या. वेगळी बाई, कणखर आई म्हणून चारचौघीत दीपा श्रीराम लागू यांच्याशिवाय कुणाचाही विचारसुद्धा करणं शक्य नाही. दीपा लागूंनी ही भूमिका विलक्षण केली. खणखणीत, स्पष्ट आवाज, शब्द उच्चारण्याची त्यांची विशिष्ट ढब, भेदक डोळे, कणखर देहबोली यामुळं त्यांच्या आईच्या भूमिकेला वजन प्राप्त झालं.

वंदना गुप्तेंनी कुटुंबातली मोठी मुलगी हे नातं अक्षरश: आचरणात आणून चारचौघीचं कुटुंब घट्ट उभारलं. वंदना गुप्तेंनी अनेक अजरामर भूमिका केल्या तरी त्यांचा हा टेलिफोनवरचा सीन अक्षरश: मास्टरपीस आहे. आसावरी जोशीचा नैसर्गिक स्वर, खळखळून हसणं, प्रसन्न वावर जणू या नाटकातील वैजूसाठीच बनवलाय, इतकी ती भूमिका तिनं मन:पूर्वक केली. तिच्या वाट्याला आलेला गंभीर सीनही ती सणसणीत करायची. प्रतीक्षा लोणकरची विनी ही खूप सीमारेषेवरची भूमिका होती. नाटकातल्या खंबीर आईच्या तरुण मुलीनं असा बंडखोर निर्णय घेणं खरं असलं, तरी प्रेक्षकांच्या तात्काळ प्रतिक्रियेला सामोरं मात्र प्रतीक्षाला जायचं होतं. हे फार मोठं धाडस रंगभूमीवर या बंडखोर नाटकानं आणलं होतं.

दोन बायका एकत्र आणणे अवघड असते, पण या चारचौघी. अत्यंत नामांकित, बुद्धिमान यांना घेऊन असे नाटक उभारणे सोपे नव्हते, पण दीपा लागू, वंदना गुप्ते, आसावरी जोशी आणि प्रतीक्षा लोणकर यांनी फार मोठे योगदान दिले आणि लताबार्इंनी आपले हे शिवधनुष्य पेलून एक अजरामर असे नाटक मराठी रंगभूमीला दिले होते.

स्त्रीप्रधान असणाºया नाटकात वाव नसला तरी एक चांगले नाटक आपल्या नावावर राहील या भूमिकेतून दिग्गज पुरुष कलाकारांनी यात भूमिका केल्या होत्या. सुनील बर्वे, प्रबोध कुलकर्णी यांचे त्यासाठी कौतुक करावे लागेल. सुनील बर्वे चक्क दुसºया अंकात वीरेनच्या रूपात रंगमंचावर जायचा, पण सगळ्यांइतकाच भाव खाऊन जायचा. वीरेनचा निरागस भाव, सच्चेपणा, मनमिळावूपणा त्याने उत्तमरीत्या दाखवला होता. या नाटकात प्रबोध कुलकर्णीचं पात्र फक्त रिलीफ देणारं, विनोदी नव्हतं, तर आपल्या भोवताली खरं तर असे श्रीकांतच वावरताना आपल्याला दिसत असतात. त्याला लेखकानंही भरपूर वाव दिला असला, तरी प्रबोधनंही त्यात धमाल आणली होती.

चांगलं नाटक दिलं की, कोणताही विचार असला तरी प्रेक्षक तो स्वीकारतात हे या नाटकाने दाखवून दिले होते.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा

9152448055

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी