Tuesday, February 3, 2026
spot_img

प्रभाकर पणशीकर आणि नाट्यसंपदा

गेल्या सहा दशकांत मराठी रंगभूमीच्या इतिहासात ज्या व्यावसायिक नाट्यसंस्था नामांकित म्हणून ओळखल्या जातात त्यामध्ये नाट्यसंपदा हे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. नाट्यसंपदा म्हणजे अर्थातच प्रभाकर पणशीकर हे नाव येते. प्रभाकर पणशीकरांनी अनेक नाटके केली असली, तरी त्यांचे सर्वप्रथम नाव येते ते ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील पंचरंगी भूमिका करणारे श्रेष्ठ अभिनेते म्हणूनच. प्रल्हाद केशव अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. त्याचप्रमाणे ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकातील औरंगजेबाची भूमिका त्यांनी अजरामर अशीच केली. ही सगळी नाटके त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेमार्फत सादर केली होती. यातीलच एक अत्यंत वेगळे आणि यशस्वी नाटक म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीतनाटक.

प्रभाकर पणशीकरांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत नाटकांचे सुमारे ८००० च्या वर प्रयोग केले. मराठीबरोबरच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी अभिनय केला होता. पणशीकरांचा जन्म मुंबईत फणसवाडी येथे वेदविद्यासंपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. पंतांचे वडील विष्णुशास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण होते, तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृत प्रकांड पंडित होते. त्यामुळे पणशीकरांची वाणी ही अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट होती. शब्दोच्चार आणि आवाज हे त्यांच्या अभिनयाचे बलस्थान होते. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे, तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे लहान असतानाच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. १९५५ साली राणीचा बाग या नाटकाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक मो. ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतन या संस्थेत प्रवेश केला आणि कुलवधू, भूमिकन्या सीता, वहिनी, खडाष्टक अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर १९६२ साली रांगणेकरांनी जेव्हा अत्र्यांचे तो मी नव्हेच हे नाटक सादर करायचे ठरवले तेव्हा अत्र्यांनी सुचवलेली अन्य नटांची नावे धुडकावून रांगणेकरांनी पंतांनाच मुख्य भूमिका करण्याची गळ घातली. पंतांनी ती अर्थातच मान्य केली आणि १५ आॅगस्ट १९६२ ला तो मी नव्हेचचा मुहूर्ताचा प्रयोग झाला. या नाटकात पंतांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या भूमिका, काही क्षणांत भूमिकाबदलांसह साकारायचे शिवधनुष्य लीलया पेलले. रसिकांचे पराकोटीचे प्रेम आणि कीर्ती पंतांना तो मी नव्हेचने मिळवून दिली.

पुढे मो. ग. रांगणेकरांशी मतभेद झाल्यानंतर पणशीकर नाट्यनिकेतनमधून बाहेर पडले आणि अत्रे थिएटर्समधून तो मी नव्हेचचे प्रयोग सादर करू लागले. आपले स्नेही मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर यांच्या मदतीने त्यांनी १९६३ साली नाट्यसंपदा या संस्थेची स्थापना केली. विद्याधर गोखले लिखित अमृत झाले जहराचे आणि वसंत कानेटकर यांचे मोहिनी अशी दोन नाटके नाट्यसंपदेने रंगमंचावर आणली, पण दुर्दैवाने ती फारशी चालली नाहीत.

मात्र त्यानंतरच्या मला काही सांगायचंय आणि विशेषत: इथे ओशाळला मृत्यू या नाटकांच्या निर्मितीने नाट्यसंपदेला स्थैर्य, आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली. कट्यार काळजात घुसली या सुप्रसिद्ध संगीत नाटकाने तर इतिहास घडवला. १९७० मध्ये तो मी नव्हेचचे हक्क नाट्यसंपदेने विकत घेऊन पुढे या नाटकाचे पंतांनी २००० हून अधिक प्रयोग केले. त्यानंतर नाट्यसंपदा या संस्थेने कधी मागे वळून पाहिलेच नाही. नाट्यसंपदाने त्यांची अश्रूंची झाली फुले, कट्यार काळजात घुसली आणि संत तुकाराम ही तीन नाटके एकाच दिवशी तीन नाट्यगृहांत लावून एक न मोडण्यासारखा विक्रम प्रस्थापित केला.

नाट्यसंपदाची नाटके म्हणजे प्रभाकर पणशीकर यांची संवादफेक बघायला, अनुभवायला मिळणार यासाठी प्रेक्षक रंगमंचाकडे वळत होते. बेईमान या नाटकात पणशीकरांनी साकारलेला चंदर अजूनही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर तरळतो. स्वामीजींनी जाता जाता केलेल्या उपदेशानंतर आपण एका कामगाराचे पुत्र आहोत, मालकांनी पाळलेल्या कुत्र्याप्रमाणे आपली अवस्था आहे हे वास्तव समजल्यावर चंदरमध्ये होणारा बदल आणि मालकांना सोडून कामगारांचे नेतृत्व करत असताना भूमिका बदलल्यावर भूमिकेचा अर्थ बदलतो हे बिंबवणे अप्रतिम होते. कानेटकरांच्या शब्दांना खºया अर्थाने न्याय देणारे काम या नटश्रेष्ठाने केले होते.

पणशीकरांनी केलेल्या नाटकातील काही भूमिका या अजरामर अशाच झाल्या आहेत. इथे ओशाळला मृत्यूमध्ये नमाज पढण्यापासून ते टोप्या विणेपर्यंत, मध्येच थोडं बोबडं बोलून सादर केलेला औरंगजेब लाजवाब असाच होता. काशिनाथ घाणेकर असोत, कुलदीप पवार असोत किंवा किरण भोगले या तिघांनी संभाजीराजांची भूमिका केली होती, पण त्या तिघांची या औरंगजेबाशी फारमोठी जुगलबंदी बघायला मिळायची. ही सगळी नाट्यसंपदेची संपन्नता होती.

नाट्यसंपदाची बस शहरात, नाट्यगृहाबाहेर दिसली, की पणशीकरांचे नाटक आहे अशी संपूर्ण राज्यात ख्याती होती. त्या बसवर लावलेला नाट्यसंपदा हा फलक पाहिल्यावर वेगळी जाहीरात करायला लागायची नाही इतकी ती बसही फेमस होती. पणशीकरांनी आपल्या संस्थेवर आणि संस्थेत काम करणाºया कलाकार, पडद्यामागचे कलाकार यांच्यावर मनस्वी प्रेम केलं होतं. त्यामुळे त्यांची नाट्यसंपदा ही संस्था एक कुटुंबच होतं. मराठी रंगभूमीच्या इतिहासात हे स्थान ध्रुवताºयाप्रमाणे अढळ राहणार आहे.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी