Monday, February 2, 2026
spot_img

नामस्मरणाची ताकद दाखवणारे संत गोंदवलेकर महाराज

 

 

नामस्मरणाने सर्वकाही साध्य होते आणि रामनामावर विश्‍वास ठेवून कार्यरत झाल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे सांगणारे एकोणीसाव्या शतकातील संत म्हणजे ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकीं  गोंदवलेकर महाराज हे एक होते. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशीला म्हणजे इसवी सन १८४५ ला गोंदवले बुद्रुक या गांवी झाला. गोंदवलेकर महाराजांच्या घराण्यांत विठ्ठलभक्ति आणि पंढरीची वारी होती. त्यांचे पूर्वज सदाचार संपन्न आणि लौकिकवान होते. ते घरी थोडी शेती करून कुलकर्णीपणाचें काम करीत.आज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांचे स्मरण महत्वाचे आहे.      श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचे मूळ नांव गणेश रावजी घुगरदरे असे होते. स्मरणशक्ति, चलाख बुद्धि, पुढारीपणा, निर्भय वृत्ति, एकांतप्रियता, रामनामाची आवड ह्या गोष्टी श्रीमहाराजांमध्यें लहानपणापासूनच होत्या. ते नऊ वर्षांचे असतांना गुरु शोधार्थ घर सोडून गेले. पण त्यांच्या वडिलांनी ते कोल्हापुरास आहेत असे कळल्यावर त्यांनी श्रीमहाराजांना घरी परत आणले. तत्कालीन रूढीनुसार त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षीं लग्न करण्यांत आले होते. परंतु त्यांचे प्रपंचांत चित्त रमेना. ते लवकरच गुरुशोधार्थ पुन्हां घर सोडून निघून गेले.    त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी भेतल्या. पण त्यांच्या मनाचें समाधान झाले नाही. ते विशेषतः उत्तर भारतात गुरुशोधार्थ हिंडले. शेवटी श्रीरामदासस्वामींच्या परंपरेंतील एक थोर सत्पुरुष श्रीरामकृष्ण यांनी श्रीमहाराजांना दर्शन दिले आणि त्यांना नांदेड जवळील येहळेगांव या गावी श्रीतुकारामचैतन्य यांचेकडे जाण्याचा आदेश दिला. या आदेशानुसार श्रीमहाराज श्रीतुकामाईंकडे गेले. तेथे नऊ महिने राहून त्यांनी एकनिष्ठेनें गुरुसेवा केली. त्यानंत ते देहबुद्धिविरहित आणि पूर्ण ज्ञानी झाले. श्रीतुकामाईंनी त्यांचे ब्रह्मचैतन्य असे नांव ठेवलें.  गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली.  सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्रीमहाराजांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावलें. त्यांचे शिष्य-प्रशिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र -कर्नाटकांत बहुसंख्येने आहेत. त्यांची प्रथम पत्नी वारल्यानंतर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केलें. त्यांनी आपल्या घरीं आणि इतरत्र अनेक ठिकाणीं श्रीराममंदिरांची स्थापना करून उपासनेची केंद्रें निर्माण केली.  ब्रह्मचैतन्य महाराजांनी असंख्य लोकांना व्यसनें, दुराचरण, दुरभिमान, संसारचिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन यांचा उपयोग केला. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता. त्यांनी गोरगरीबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. गोरक्षण, अन्नदान, भावी काळांत मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठानें, नामजप, भजनसप्ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावलें. आधुनिक सुशिक्षितांमधील अश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येंही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न केला.   नामस्मरण हें सर्वश्रेष्ठ साधन आहे असें त्यांनी कळकळीनें व बुद्धीला पटेल अशा रीतीनें सांगितलें. लोकांना नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मीलन कसें करावें हें शिकविण्यासाठीं त्यांनी आमरण खटाटोप केला. आजच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ गोंदवलें मुक्कामी त्यांनी देह ठेवला. गोंदवलेकर महाराजांनी सांगितले आहे की, रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. नामस्मरण समजून करावे. समजून म्हणजे राम कर्ता या भावनेत राहून करावे. महाराजांच्या उपदेशानुसार परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना? मग तू प्रपंच अतिदक्षतेने कर. प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस. पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे. ते तुला सर्व रोगांतून मुक्त करील. ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम हे आहे. महाराज आपल्या प्रवचनात सांगत की, व्यवहारदृष्टया माझ्यामध्ये एकच दोष आहे की, मला कुणाचे दु:ख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच. मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणार्‍या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे. तो परत जातांना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे. दुसर्‍याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात. पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या वागण्यामध्ये, नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. प्रेम करायला गरीबी आड येत नाही. श्रींमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. नाम हे प्रेम स्वरुप आहे. नाम घेतले की, भगवंताचे प्रेम येईलच. महाराज म्हणतात की, ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात; मग सुख कशात आहे ? पैसा सुख देतो का? पैसा मिळवणे कठीण, मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे. सर्वसुखी असा प्रपंचात कोण आहे ? प्रत्येकाचे काही ना काही तरी गार्‍हाणे आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईल. तो कधी पूर्ण सुखी होत नाही, त्याचे गार्‍हाणे कधी संपत नाही. मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे, आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही; मग आपण दु:ख का करावे? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना, की सर्व काही साधते. नाम अभिमानाचा नाश करते. नामाने हवे-नको-पणाची बुद्धी होत नाही.

 

———

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी