Wednesday, February 4, 2026
spot_img

मखमली आवाजाचे गायक अरुण दाते

अनेक दशके आपल्या भावमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे गायक म्हणजे अरुण दाते.  ४ मे रोजी त्यांचा जन्मदिवस. तर याच महिन्यात ६ मे या तारखेला त्यांचे निधन झाले. अरुण दाते हे एक मराठी भावगीत गायक होते. भावगीताला आपल्या मखमली आवाजाने त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यामुळे मराठी संगीतात अरुण दाते नावाचे एक सोनेरी मखमली पान आहे.

अरुण दातेंचे वडील रामूभय्या दाते हे इंदूरमधील प्रतिष्ठेचे गायक होते. त्यांच्या इच्छेनुसार अरुण दाते गायक झाले. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. दाते यांनी मुंबईमध्ये कापड अभियांत्रिकीचा अभ्यास सुरू केला. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत अरुण दाते नापास झाल्यावर वडिलांनी त्यांना गाणे शिकण्याचे प्रोत्साहन दिले.

अरुण दाते १९५५पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. १९६२ मध्ये शुक्रतारा मंदवारा या अरुण दाते यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे त्यांना आग्रह करीत. आपण हिंदी भाषिक प्रदेशातील असल्याने आपले मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाण्याचे टाळले. शेवटी एकदा ते ध्वनिमुद्रित झाले आणि अफाट गाजले. आजही त्या गाण्याची भुरळ संगीत रसिकांना पडते. कोणत्याही कार्यक्रमात नवे गायक ते सादर करतात, तेव्हा प्रत्येक जण अरुण दातेंची तुलना त्याच्याशी करतो. हेच त्या आवाजाचे आणि गायकीचे वैशिष्ठ्य आहे.

पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमातही शुक्रतारा गाऊ लागले. वयाच्या पन्‍नाशीत त्यांनी भावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले. २०१०पर्यंत अरुण दाते यांचे शुक्रतारा या नावाने होणाºया मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम झाले. त्यांचे ऊर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक अल्बमही लोकप्रिय आहेत.

मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत लोकप्रियता प्राप्त करून दिली होती. अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती, पुष्पा पागधरे यांबरोबर द्वद्वंगीते गायली आहेत; पण या सर्वांमध्ये अरुण दाते यांचा आवाज हा कायम वेगळा जाणवतो. त्यातील मखमली स्पर्श फक्त कानांना नाही, तर मनालाही आनंद देतो.

त्यांच्या गायनाची ताकद इतकी अफाट होती की, एक प्रख्यात डॉक्टर त्यांना आलेल्या वैफल्यावस्थेमुळे आत्महत्या करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना दूरवरून कुठे तरी स्वर ऐकायला आले होते की, ‘या जन्मावर… या जगण्यावर… शतदा… प्रेम करावे..’ त्या मखमली सुरांनी त्या डॉक्टरांच्या मनात सकारात्मकता निर्माण केली आणि त्यांनी मग प्रॅक्टीस सुरू केली आणि न भुतो न भविष्यती असे यश मिळवले. पण या यशाचे श्रेय ते डॉक्टर अरुण दातेंना देतात. त्या स्वरांनी मला मृत्यूपासून मागे वळवले, असा गौरव ते या गायकाचा करतात.

मनाला अत्यंत आनंद देणारा असा स्वर, भाव अरुण दातेंच्या गायकीत आहे. त्यांच्या लोकप्रिय झालेल्या गीतांवरून नजर मारली तरी मन सुखावून जाते. कधी डोळ्यांच्या कडा ओलावतात, तर कधी मनात प्रेम उत्पन्न होते; पण त्यांच्या गायनाने कायमच मनाला आनंद दिला आहे.

‘अखेरचे येतील माझ्या शब्द ओठी…’ हे मंगेश पाडगावकर यांचे गीत यशवंत देव यांनी अरुण दाते यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केले आणि ते अनेकांच्या आयुष्याच्या अखेरच्या उंबरठ्यावरचे कबुली देण्याचे गीत ठरले. ‘जपून चाल पोरी जपून चाल’ हे अल्लड अवखळ प्रेमगीत दाते म्हणतात, तेव्हा खरोखरच बघणाºया नाही, तर ऐकणाºया जीवांचे हाल होतात. ‘डोळे कशासाठी’ हे त्यांचे असेच सुंदर भावगीत आहे. मनापासून भावना पोहोचवणारी गायकी त्यांच्या गायनातून प्रकट व्हायची. किती भावपूर्ण गाणी त्यांनी आपल्या मखमली आवाजांनी गायली आहेत. डोळ्यांत सांजवेळी, दिल्या घेतल्या वचनांची, दिवस तुझे हे फुलायचे, भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणिक राणी, भेट तुझी माझी स्मरते, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, ही त्यांची अजरामर अशी गीते आहेत.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी