Saturday, January 31, 2026
spot_img

शिष्यांची लक्षणे अंतरी बाणवली पाहिजेत

  पाचव्या दशकातील तिसर्‍या समासात समर्थांनी शिष्यांनी कोणती लक्षणे अंतरी बाळगावीत याबाबत विवेचन केले आहे. सद्गुरु जर मिळाला नाही तर सत्शिष्य वाया जातो. सत्शिष्य मिळाला नाही तर सद्गुरुला शिष्याला सत्शिष्य बनविण्यास बरेच श्रम घ्यावे लागतात. समजा, उत्तम जमीन आहे. तिच्यांतील खडे गोटे तण काढून ती चांगली साफ केली. पण तिच्यांत किडके बीज पेरले. किंवा उत्तम बीज खडकाळ जमीनींत पेरले. या दोन्ही ठिकाणी चांगले पीक येत नाही. तसेच सत्शिष्य आहे पण त्याला मंत्र-तंत्र सांगणारा गुरु भेटला तर ना प्रपंच ना परमार्थ अशी अवस्था होऊन हाती कांहींच लागत नाही. किंवा सद्गुरु ब्रह्मज्ञानी, पूर्ण कृपा करणारा व कृपाळू असला परंतु त्याचा शिष्य जर अनधिकारी, अपात्र, परमार्थाला अयोग्य भेटला तर एखाद्या भाग्यवान बापाचा मुलगा दरिद्री निघावा अशी अवस्था होते. यासाठी शिष्याने काही गुण आपल्या अंतरी बाळगणे आवश्यक असते. सद्गुरु व सत्शिष्य अशी जोडी जेथे असते तेथे सद्गुरुला कष्ट न होता सत्शिष्य तयार होतो. दोघांची हौस एकदम पुरविली जाते. आपलें ज्ञान दान योग्य ठिकाणी होते म्हणून सद्गुरु समाधानी तर आपल्याला उत्तम ज्ञानी सद्गुरु भेटला म्हणून सत्शिष्य पण समाधानी होतो. सत्शिष्याने साधना केली नाही तर सर्व फुकटच जाते. जोपर्यंत शेतांतील पीक घरी येऊन पडत नाही, तोपर्यंत सर्व गोष्टी करुन निगा राखावी लागते. पीक घरी आल्यावरही त्याची काळजी घ्यावी. थंडपणे बसून राहू नये.  त्याप्रमाणे आत्मज्ञान झाल्यानंतरसुद्धा साधकाने सद्गुरुने सांगितलेले साधन चालू ठेवले पाहीजे. अविद्येच्या अमंमलाने ते ज्ञान मंद होता कामा नये. जसे एकदा पोटभर जेवले तरी परत जेवण बनविण्यासाठी  सामुग्रीजवळ ठेवावीच लागते. म्हणून साधना, अभ्यास, सद्गुरु, सत्शिष्य, सत्शास्त्र विचार, सत्कर्माचार, सद्वासना  या  सगळ्या गोष्टी सातत्याने एकत्र राहील्या तरच निर्मळ आत्मज्ञान उदय पावते. आणि सत्शिष्य संसारांतून पार पडतो. नाहींतर लोकांमधे पाखंडाचा प्रचार होतो. म्हणून समर्थ याठिकाणी शिष्याच्या अंगी जी लक्षणे असावीत ते वर्णन करतात. ते म्हणतात, सत्शिष्याचे मुख्य लक्षण म्हणजे सद्गुरुच्या वचनावर उपदेशावर त्याचा पूर्ण विश्वास हवा. सद्गुरुला तो अनन्यभावाने शरण असला पाहीजे. तोच खरा उत्तम शिष्य होय. शिष्य निर्मळ, आचारशीळ, अगदी विरक्त व चुकीबद्दल वाईट वाटणारा असावा. शिष्य निष्ठावंत, शुचिमंत आणि सर्व बाबतींत नियमाने वागणारा असावा. शिष्य मोठा उद्योगी तत्पर व अतींद्रिय लक्ष्यावर लक्ष केंद्रित करणारा असाना. अशा सामर्थ्यानेच आत्म्याचे अनुसंधान साधते. शिष्य मोठा धीराचा व उदार व परमार्थाविषयीं अति तत्पर असावा. शिष्य परोपकारी असावा. तो निर्मत्सरी हवा. ग्रंथाचा अभ्यास करताना शब्दार्थाच्या अंतरगांत शिरणारा असावा. ग्रंथकर्त्याचा आशय आकलन होणारा असावा. शिष्य अति शुद्ध, अति सावध आणि उत्तम गुणांचा असावा. शिष्य स्वतंत्र विचारशक्ति असलेला, तो प्रेमळ भक्त असावा. तो नीतीवंत व नीति मर्यादा सांभळणारा असावा. शिष्य मोठ्या युक्तीचा असावा. शिष्य मोठा बुद्धिवंत हवा. चांगल्या वाईटाचा विचार करणारा असावा. शिष्य धाडसी, निश्चयानें व्रत सांभाळणारा असावा. तो उत्तम कुळांतील व पुण्यशील असावा. शिष्य सात्विक, भगवंताला भजणारा आणि मनापासून साधन करणारा साधक असावा. शिष्य विश्वास ठेवणारा असावा. शरीराचे कष्ट सोसणारा असावा. परमार्थ कसा वाढेल याचे ज्ञान असणारा असावा. शिष्य स्वतंत्र, जगाचा मित्र असावा. तो सर्व गुणांनी संपन्न असलेला सत्पात्र असावा. भगवंतावर खरा भाव असलेला असावा. तो शुद्ध अंतःकरणाचा असावा.  शिष्य अविवेकी नसावा. तो गर्भश्रीमंत नसावा. तो संसारांतील दुःखाने दुःखी झालेला, पोळलेला असावा. संसारांतील दुःखाने जो पोळलेला आहे, जो शारिरीक व मानसिक आधिव्याधींनी पोळलेला आहे, तोच परमार्थ साधण्याच्या दृष्टीने योग्य ठरतो. ज्यानें संसारांत पुष्कळ दुःख भोगलेले असते, त्याच्या अंगी परमार्थ बाणतो. अति दुःख भोगल्याने त्याच्या मनांत वैराग्य येते. ज्याला संसाराचा त्रास वाटूं लागतो, त्याच्या अंतरी परमार्थाबद्दल विश्वास निर्माण होतो. तो सद्गुरुची कास घट्ट धरतो. कांहीं कारणाने विश्वास उडून मधेंच सद्गुरुची साथ सोडणारे लोक, परत संसारांत बुडतात. संसारांतील सुखदुःखानी ते तसेच मरुन जातात. सद्गुरु व देव यांची जो बरोबरी करतो, तो शिष्य दुराचारी समजावा. त्याच्या  मनांत भ्रामक खोट्या कल्पना बसलेल्या असतात त्यामुळे खरे तत्व काय आहे ते त्याला कळत नाही. ज्याच्यावर सद्गुरुकृपा असते त्याच्यावर इतर कोणाचीही सत्ता चालत नाही. आपल्या ब्रह्मज्ञानाच्या सामर्थ्यानें तो सार्या वैभवाला तुच्छ मानतो. सद्गुरुच्या कृपेने व सामर्थ्याने सत्शिष्याला आत्मसाक्षात्कार होतो. त्यामुळे मायेसह सारें विश्व त्याला दिसत नाही. खोट्या दृश्याचा आत्मज्ञानामुळे लोप होतो. उत्तम शिष्याचे वैभव व ज्ञान अशा प्रकारचे असते. सद्गुरुच्या वचनावर त्याचा दृढ विश्वास असतो. त्यामुळें तो सत्शिष्य ईश्र्वरस्वरुप बनुन जातो.  सत्शिष्याचे अंतःकरण पश्चातापाच्या आगीने पोळतें ते निर्मळ व शुद्ध होते. ते पोळलेले अंतःकरण सद्गुरुच्या बोधाने शांत होते. सत्शिष्य हा असा असतो. सद्गुरुनें सांगितलेल्या मार्गाने साधना करीत असतां सारें ब्रह्मांड पालथे झाले तरी सद्गुरुच्या वचनावर असलेला सत्शिष्याचा अढळ व शुद्ध विश्वास कमी होत नाही. अशा रीतीनें जे खरे सद्गुरुला शरण जातात तेंच सत्शिष्य म्हणुन निवडले जातात. त्याच्यांत अंतरबाह्य बदल होऊन ते ईश्वर स्वरुप बनतात. सत्शिष्याच्या चित्तामधे सद्गुरुबद्दल अशी अढळ श्रद्धा असते. तोच मोक्षाचा अधिकारी होतो. बाकीचे शिष्य नुसते पोशाखीच असतात. एखाद्या शिष्याला स्मशानवैराग्य येते म्हणुन तो गुरुला शरण येऊन त्याच्यापुढें लोटांगण घालतो. पन ते वैराग्य फार वेळ टिकत नाही. त्यामुळे त्याला आत्मज्ञान होत नाही. थोडावेळ टिकेल एवढा भाव आणुन सद्गुरुकडून मंत्र घेतला त्या मंत्रपुरते तात्पुरते शिष्यत्व घेतले. अशा पद्धतीने पुष्कळ गुरु केले तरी परमार्थाचे ज्ञान होणार नाही. अशा शिष्याला लोकांत मिरवायला शब्दज्ञान पुष्कळ येते. तो अति बडबड्या, शिरजोर आणि दुष्ट तर्कवादी बनतो. जे लोक बिचारे मदोन्मत्त असतात त्यांना भगवंताची भेट होत नाही. पूर्वीं केलेल्या पापकर्मांमुळे त्यांची बुद्धि भगवंताकडे वळत नाही. असे अवगुण ज्यांच्यांत नाहीत असे सत्शिष्य वेगळेच असतात. त्यांची श्रद्धा बळकट  असते. भाव शुद्ध असतो. त्यामुळें त्यांना आत्मज्ञान होते व ते आत्मानंदाची मजा चाखतात. शिष्याने हे गुण आपल्या अंगी बाणावेत आणि आपल्या गुरूची कृपा प्राप्त करावी असे समर्थ सांगतात.॥ जय जय रघुवीर समर्थ॥

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी