Monday, February 2, 2026
spot_img

तेंडुलकरांची नाटके

मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांना घसरण लागत असताना बॉक्स सेटमधील कौटुंबिक तीन अंकी ताई माईची नाटके गाजत असताना वेगळ्या विषयांवरील नाटक आणणारे नाटककार म्हणजे विजय तेंडुलकर. मानवी स्वभावातील वैविध्य, विकृती, विचित्रपणा यांचा वेध घेत येणारी नाटके म्हणजे विजय तेंडुलकरांचे नाटक असे एक समीकरणच झाले होते. त्यामुळे हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या रंगभूमीवर तेंडुलकरांचे नाव गाजत होते.

विजय तेंडुलकरांचा जन्म कोल्हापूर येथे झाला होता. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वत: लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि. बा. मोकाशी, वि. वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातून त्यांनी प्रेरणा घेतली होती. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. त्यांचे वास्तव्य पुण्यात आणि मुंबईत असे. त्यांनी त्या काळात भेटलेल्या माणसांचा, विचारांचा अभ्यास करून त्याला नाट्यमयता देत ती वास्तवाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता.

‘गृहस्थ’ हे तेंडुलकरांनी लिहिलेले पहिले नाटक. हेच नाटक नंतर ‘कावळ्यांची शाळा’ या नावाने त्यांनी १९६४ साली आणले, मात्र ‘श्रीमंत’ हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्‍न दिसून येतो. त्यामुळे अनेकवेळा अशी नाटके पाहिल्यावर मन सुन्न होते, माणसं शांत मनाने बाहेर पडतात. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणा‍ºया विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. ‘सखाराम बार्इंडर’मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि ‘घाशीराम कोतवाल’मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली. स्पर्धा, प्रायोगिक रंगभूमीला तर तेंडुलकर आपले वाटू लागले.

‘माणूस नावाचे बेट’, ‘मधल्या भिंती’, ‘सरी गं सरी’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘अशी पाखरे येती’, ‘गिधाडे’, ‘छिन्न’ आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्रता यांचे भेदक, पण वास्तववादी उग्रकठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन संघर्ष झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्यातल्या त्यात ‘अशी पाखरे येती’ हे नाटक सर्वसामान्यांना आपल्या जास्त जवळचे वाटले. त्यात अचानक घरात आलेला तो हा नक्की कोण आहे, कुठून आला, याचा शोध फार महत्त्वाचा असतो. प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या तरी वळणावर अशी पाखरे येत असतात. काम संपले की निघून जातात.

मानवी मनाचे, त्यातही त्याच्या कुरूपतेचे चित्रण करून अशा व्यक्तिरेखांना समजून घेण्यात, त्यांचे जीवन मांडताना घडते-बिघडते संबंध, त्यातील ताण, त्या अनुषंगाने व्यवस्थांचे बंदिस्तपण टिपण्यात त्यांची लेखणी रमते, काव्य-कारुण्य, व्यक्ती-समाज, वास्तव-फॅन्टसी यांची कलात्मक सरमिसळ त्यांच्या नाटकांत आढळते. नवनाट्य, वास्तववाद यांच्याशी त्यांच्या लेखनाचे आंतरिक नाते दिसते. तरीही त्यांच्यावर कोणताही शिक्का मारता येत नाही इतकी प्रयोगशीलता दिसते.

‘कमला’, ‘कन्यादान’ या नाटकांनी तर कमाल केली होती. भारतातल्या कोणत्या तरी मागास अशा एका राज्यात स्त्रियांची बिनधास्त विक्री होते याची बातमी करणाºया पत्रकाराला ही बातमी सनसनाटी वाटते. त्यासाठी स्वत: जाऊन कमला या मुलीला तो खरेदी करून आणतो. पत्रकार परिषद घेतो, पण कळत-नकळत झालेला तोही गुन्हाच असतो. राजकारण आणि पत्रकारितेतील नव्या-जुन्या प्रवाहातील संघर्ष, जनरेशन गॅप यातील आशय फार महत्त्वाचा आहे. आजकाल स्ट्रिंग आॅपरेशनच्या नावाखाली वाटेल ते करणाºया माध्यमांना तेंडुलकरांनी ५0 वर्षांपूर्वी चिमटा घेतला होता.

माणूस वाईट नसतो, तर वाईट असतो तो त्याचा विचार हे सिद्ध करताना आंतरजातीय विवाह केल्यावर फसलेली सुशिक्षित चांगल्या घरची मुलगी आणि व्याख्यानातून आपला प्रभाव पाडणाºया बापाचा बुरखा फाटल्यावर समोर येणारे वास्तव यातून उभे राहिलेले कन्यादान हे नाटक तुफान गाजले होते. डॉ. श्रीराम लागू, सुहास जोशी, सदाशिव अमरापूरकर आणि प्रिया तेंडुलकर या चार खांबांनी हे नाटक जोरदार पेलले होते. प्रेक्षकांना ते आवडले होते. हीच तेंडुलकरांच्या नाटकांची खासियत होती.

वेगळ्या दृष्टीने विचार करून त्यातील नाट्यमयता शोधणारे नाटककार म्हणजे विजय तेंडुलकर. त्यांच्या प्रत्येक नाटकाने इतिहास रचला. ‘घाशीराम कोतवाल’ने एकाचवेळी असंख्य म्हणजे ६५ कलाकार रंगभूमीवर आणून महानाट्यच उभे केले होते. ते जगभरात गाजले. घाशीराम या प्रवृत्तीवर त्यांनी केलेला प्रहार वादग्रस्त ठरला होता, पण त्या वादातून ते यशस्वीपणे सुटले. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे तर संपूर्ण देशात गाजलेले नाटक होते. अनेक भाषांमध्ये त्याची रूपांतरे झाली, पण तेंडुलकरांची नाटके नेहमीच चर्चेत राहिली आणि गाजली. त्यांना यशही मिळाले आणि कीर्तीही लाभली, हे मान्यच करावे लागेल.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा

9152448055

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी